सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ?

☆ उत्तरायण… लेखिका : सुश्री धनश्री लेले   ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

उत्तरायण… 

नवीन वर्ष सुरु होताना आनंद तर असतोच मनात पण

काळाच्या माळेतला एक एक वर्षरुपी मोती घरंगळत चाललाय…हाही विचार मनात येतो… . खरंतर रोजच दिवसाचा मोती घरंगळतो….  मावळणारा सूर्य रोजच एक मोती घेऊन जातो… आयुष: खंडं आदाय रवि: अस्तं गमिष्यति || हे जितकं खरं तितकंच रवींद्रनाथ म्हणतात तसं, रोजचा सूर्य नवीन, त्याचा लालिमा नवीन, त्याच्या दिशेने आकाशात झेपावणारी पक्ष्यांची रांग नवीन…..

 

जगातली प्रत्येक गोष्ट नवीन आहे , क्षणाक्षणाला बदलणारी आहे,

नाविन्य हा जगाचा प्राण आहे. आकाश जुनं आहे पण त्यावर येणारे मेघ नवीन आहेत. समुद्र शतकानुशतकं तोच आहे पण त्यावर येणारी प्रत्येक लाट नवीन आहे. वृक्ष तेच आहेत पण पालवी नवीन आहे. आणि अध्यातामातलं उदाहरण द्यायचं तर आत्मा तोच आहे , देह मात्र नवीन आहे. हा जुन्या नव्याचा संगम आहे..

 

शायरा संगीता जोशी यांची ओळ आठवते …

तू भेटशी नव्याने …. बाकी जुनेच आहे …

 

सगळं तेच आहे पण दररोज आपण नवीन आहोत का नाही? आपलं मन नवीन आहे कि नाही? आपला उत्साह नवीन आहे का नाही?

 आपण नव्या दमाने नवीन दिवसाचं स्वागत करायला तयार आहोत का नाही?

आपण नवीन होऊन या जगाला भेटायला तयार आहोत का नाही?  हे तपासून पाहायला हवं ….

 

नवीन वर्षाचं स्वागत नव्या उत्साहाने, नवीन आशेने, नवीन स्वप्नांनी आणि नवीन संकल्पांनी करायला हवं …. जणू मागचं विसरून पुन्हा नवीन  होण्याची संधी. . नवीन संकल्पांची नवीन संधी …

 

उत्तरायण सुरु झालंय… या उत्तरायणाचा महिमा केवढा .. इच्छामरणी भीष्म थांबले होते प्राण सोडायचे.

 उत्तरायणात मरण आलं तर चांगली गती मिळते म्हणे … मरणानंतर कशाला ? जगताना हि चांगली गती मिळण्यासाठी उत्तरायणच हवं…

 

 हे उत्तरायण भोगोलिक नाही तर मानसिक हवं. उत्तर किती सुंदर शब्द .. तृ म्हणजे तरणे आणि उद् म्हणजे वरच्या दिशेला वरच्या दिशेने तरुण जाणे म्हणजे उत्तर आणि असा कायम वरच्या दिशेने चालायचा मार्ग {अयन) म्हणजे उत्तरायण सतत वरच्या दिशेने, सतत प्रगतीशील, सतत आपल्यात सुधारणा करीत उच्च ध्येयाच्या उत्तर दिशेने एक एक पाउल टाकणे म्हणजे मानसिक उत्तरायण ! असं उत्तरायण दर दिवशी , दर क्षणी ही होऊ शकतं.

 

मानसिक उत्तरायण घडलं की चैतन्याच्या नद्या प्रवाहित होतात, निरुत्साहाचं बर्फ वितळतं, हिरव्यागार विचारांची पालवी फुटते… आणि मुख्य म्हणजे आनंदाचा सूर्य उगवतो….

 

आनंद हा आपला स्थायीभाव आहे. कारण आपल्या अध्यात्म संकल्पनेनुसार आपल्यात वास करणारं ते चैतन्य म्हणजे सत् चित् आनंद आहे …

आपण आहोत म्हणजे सत्, आपण चैतन्ययुक्त आहोत म्हणजे चित् … आणि आपल्या सगळ्यांना हवा असतो तो आनंद …

 प्रत्येकाच्या आनंदाचं कारण वेगळं, त्याचं प्रमाण वेगळं…. पण सगळ्यांना आपली ओंजळ आनंदाने भरून जावी असंच वाटत आणि .

.हा आनंद आपला आपल्यालाच मिळवायला लागतो… छोटे छोटे खडे भरलेल्या माठात पाणी घातलं तर आधी ते पाणी खाली जातं आणि मग खड्यांच्या फटीतून वाट काढत काढत ते हळूहळू पृष्ठभागावरती येतं.. आनंदाचंही असंच आहे..

 प्रश्न, समस्या, शंका, अडचणी, अडथळे या सा-या खडकांच्या फटीफटीतूनच तो शोधावा लागतो..

मग तो आपसूक मनभर पसरतो, चेह-यावर दिसतो… स्वानंद हाच खरा आनंद …

आपल्या अंगणातलं आनंदाचं झाड सतत बहरात राहो हि शुभेच्छा … नवीन वर्षाच्या शुभेच्छांसहित!

लेखिका सुश्री धनश्री लेले

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments