☆ विविधा ☆ एक उनाड दिवस ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆
एका रम्य पहाटे जाग आली, हो पहाट रम्यच होती पण मन मात्र अस्वस्थ होते, बेचैन होते, उठून काही करावे असे मुळीच वाटत नव्हते.
बाहेर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकु येत होता . झाडावर बसुन ते ऐटीत झोके घेत होते. आपल्याच विश्वात मग्न होते जस काही एक उनाड दिवस साजरा करत आहेत. अगदी हेवाच वाटला मला त्यांचा, अस वाटले आपल्यालाही त्यांच्यात सामील होता आले असते तर?
इकडे माझ्या मनात सुरू होते आता उठून न्याहरी ला काय करायचे ह्याचे कॅलक्युलेशन. पुढे काय उठले तशीच मनात नसतानाही. खर तर अजून थोडं पडून रहायचे होते मला, शांत पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत.
पण उठले फ्रीझ उघडला तर काय त्यातुन पडवळ, कारली डोकावत होती जणू विचारत होती जेवायला काय करणार आहे. तेव्हा परत चरफड झाली मनाची आणि आता मात्र पक्क ठरवले खूप झाले आता आज मनाचेच ऐकायचे. आज साजरा करायचाच एक उनाड दिवस.
छान गरम शॉवर घेतला, खूप दिवसानी चक्क जिन्स चढवली आणि स्वतः च्याच धुंदीत गाणी गुणगुणत गाडी बाहेर काढली.
बाहेर पडले ते थेट रम्य उद्यान गाठले. रम्य सूर्यकिरण किरण अंगावर घेतले, फुलांवरुन प्रेमाने हात फिरवला, फुलपाखरू धरायचा प्रयत्न केला. चक्क झोक्यावर बसुन उंच झोके घेतले. छान गप्पा मारल्या पक्ष्यांशी, गुणगुणली काही गाणी आणि तेवढ्यात आठवण झाली भुकेची. मग छान गाडी वळवली माझ्या आवडत्या रेस्टॉरंट कडे. ऐटीत ऑर्डर केली मसाला डोसा आणि दही वड्याची. वरती मस्त कोल्डकॉफी घेतली आणि मन प्रसन्न करून पुढच्या प्रवासाला निघाले. घड्याळात पाहिले दहा वाजले होते म्हणले चला आता विंडो शॉपिंग करावे. माझ्या आवडत्या मल्टिप्लेक्स मधे गेले छान विंडो शॉपिंग केले. आणि चक्क एक उनाड दिवस हा पिक्चर पाहिला. छान पॉप कॉर्न खाल्ले, पिझा ही घेतला होता. पुढे काय करायचे ते पिक्चर पाहतानाच ठरवले होते, तिथून बाहेर पडले ते थेट पोहोचले माझ्या बालसखी कडे. खूप दिवस नाही वर्षे झाली होती तिला भेटून. तिच्याशी खूप गप्पा मारायची इच्छा आज पूर्ण होणार होती. छान टवटवीत फुलांचा गुच्छ घेतला होता तिच्या साठी आणि पोचले की तिच्या दारात. मला पाहून दोघींचेही नेत्र वाहू लागले आनंदानी. घट्ट मिठी मारली चक्क दारातच आणि मन तृप्त होईपर्यंत गप्पा मारल्या.
गप्पांच्या ओघात कधी संध्याकाळ झाली हेच कळले नाही. तिथून फुलपाखराच्या मनानी बाहेर पडले ते थेट एका रम्य टेकडीवर जाऊन पोहोचले. रम्य, शांत, सुंदर निसर्गाने भरलेल्या अश्या ठिकाणी. शांत बसुन राहिले तिथे बराच वेळ मनाला शांती लाभे पर्यंत.
मैत्रिणीशी मारलेल्या गप्पांमुळे आणि ह्या रम्य निसर्गामुळे मन तृप्त झाले होते.
ह्याच प्रसन्न मनाने गाणी गुणगुणत गाडी घराच्या दिशेला वळवतच होती की तेवढ्यात हाक ऐकु आली अग उठते आहेस ना, जायचे आहे ना आज ऑफिसला !!! ब्रेक फास्ट नाही का बनवायचा ? आणि दचकून जागी झाले की हो म्हणजे हे सगळे स्वप्नच होते तर…
पण आज ह्या क्षणी एक निश्चयच करून उठले की हे पडलेले स्वप्न सत्यात आणायचेच तेही लवकरच
काय हे सारे तुम्हाला पण वाटत असेल नाही का?
तर मग होऊन जाऊदे,
असाच एक उनाड दिवस
सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️
© सौ. श्रेया सुनील दिवेकर
मो 9423566278
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
स्वप्न सत्यात उतरो.??
खूप छान