सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ?

☆ एका टिंबाचा फरक… भाग -2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

नावामागे जास्त डिग्र्या आहेत, एवढ्याचमुळे स्वतःला “ सु “ शिक्षित म्हणवून घेणाऱ्यांना तरी, नात्यातलं अंतर वाढवणाऱ्या या लहानशा टिंबाची  अनावश्यक लुडबूड जाणवायला हवी, अशी अपेक्षा करावी की नाही हा संभ्रम पडतो. प्रत्यक्षात मनातच  नसलेली जवळीक लोकांना दाखवण्यासाठी, हल्ली सासूला “ ए आई “ अशी हाक मारतांना दिसतात बऱ्याच जणी. बहुतेकवेळा सासूच तसा आग्रह धरत असणार, कारण ती एकेरी हाक सासूला खूप हवीहवीशी वाटते — त्या “ए” मध्ये, तिची सासरी गेलेली,  किंवा फक्त स्वप्नातच पाहिलेली मुलगी भेटल्यासारखे मनापासून वाटते तिला. पण—” मला माझी आई आहे. दुसऱ्या कुणाला आई म्हणण्याची काय गरज? “ असं सुनेला स्वाभाविक वाटू शकतं. म्हणूनच त्या “ई ”मध्ये दडलेल्या  टिंबाचं मनातलं स्थान अढळ कसं राहील, याची खबरदारी सूनही, नकळत का होईना, घेतच असावी, असंही बरेचदा जाणवतं.

आणि मग नकळतपणेच विचार येतो की, आयुष्यभरासाठी म्हणून नव्याने जुळलेल्या / जुळवलेल्या या नात्यामुळे लावलं जाणारं,  आईमधल्या  “ ई “ वरचं  हे इवलंसं टिंब मनातून आधीच कायमचं बेदखल करणं  दोघींसाठीही खरंच इतकं अवघड असतं का? या प्रश्नाचं उत्तर “ खरं तर नाही “ हेच असायला हवं. पण यासाठी टाळी एका हाताने वाजत नाही, हा त्रिकालाबाधित नियम दोघींनीही जाणीवपूर्वक लक्षात घ्यायला हवा. “ते  टिंब कशाला हवंय आमच्यात लुडबुड करायला? “ असं दोघींनाही मनापासून वाटायला हवं. त्याचा मनापासून तिरस्कार करण्याची दोघींचीही मानसिकता असायला हवी — मानसिकता बदलता येते  असा विश्वास हवा.आई हे फक्त एका  नात्याचे नाव नाही, तर ते एक ‘तत्त्व’ आहे हे समजायला हवं. म्हटलं तर फारसं अवघड नाही हे —नव्या सुनेने सासरी येतांना –” बाप रे, आता सासूबरोबर किती काय ऍडजस्ट करावं लागणार आहे कोण जाणे “ असा नकारात्मक विचार डोक्यात पेरूनच  माप ओलांडण्यापेक्षा,  “ चला, आता इथेही एक छान आई असणार आहे माझ्यासाठी “– असा विश्वास बाळगत, आनंदात माप ओलांडायला हवं. आणि नव्या सासूनेही — “ आता जन्मभर आमच्या घरात  हिने आमच्या पद्धतीनेच राहायला -वागायला पाहिजे “ हा धादांत अव्यवहार्य  विचार, सुनेने माप ओलांडण्याआधीच मनातून कायमसाठी पुसून  टाकायला हवा. — ते टिंब पुसण्याची ही पहिली पायरी ओलांडताना, स्वतःची सासरी गेलेली मुलगी आठवायला हवी, आणि स्वतःला मुलगीच नसेल तर  सुनेच्या रूपात मला माझी मुलगी मिळाली असं मनापासून  म्हणत आनंदी व्हायला हवं.आता या “ आनंद “ शब्दातलं टिंब मात्र कमालीचं सकारात्मक आहे– नाही का? ते पुसायचा प्रयत्न केला तर काय उरणार? -’आ -नद’—वेगळ्या शब्दात — “ आ बैल मुझे मार “सारखी अवस्था. त्यामुळे हे टिंब मात्र प्रत्येकाने सतत जपायलाच हवं असं.

पण माणूस, आणि “ तशाच दुसऱ्या माणसामुळे त्याला मिळू शकणारा “ आनंद “ यात अडथळा निर्माण करणारी जी  “एकमेव “ गोष्ट असते, ती म्हणजेही एक टिंबच. दोन माणसांमधल्या कुठल्याही नात्यात आडमुठेपणाने आड येण्याइतकं  ते समर्थ असतं. स्नेहभावाचा, आपुलकीचा, प्रेमाचा हात आधी कुणी पुढे करायचा— हा म्हटलं तर अगदीच निरर्थक, नगण्य ठरवता येण्यासारखा — किंबहुना पडूच नये असा प्रश्न, प्रत्येकाला, अशा प्रत्येकवेळी हमखास पडतो, ज्याला कारणही एक टिंबच असतं — आणि ते म्हणजे — “ अहंकार” या शब्दाला जन्म देणाऱ्या “ अहं “ ची मिजास,  विनाकारण कुठेही वाढवणारं “ ह “वरचं टिंब. हे  टिंब जर कायमचं पुसता आलं— म्हणजे ते पुसून टाकणं आवश्यक आहे की नाही, या प्रश्नाचं “हो “ असं उत्तर आधी स्वतःचं स्वतःला खात्रीपूर्वक सापडलं, तर मग प्रश्नच संपतो –मुळात मग तो पडतच नाही. रांगोळीतलं जास्तीचं टिंब ज्या सहजतेने पुसता येतं, त्या सहजतेने हे टिंब पुसायला नाही जमणार कदाचित — पण एखादी गोष्ट करण्याचा ठाम निश्चय केला, की मग अवघड अशक्य असं कुठे काय असतं?  इतर प्राण्यांपेक्षा अगदी वेगळेपणाने माणसाला मिळालेली हीच तर ईश्वरी देणगी आहे. त्यापुढे त्या इवलुश्या टिंबाची काय मजाल? “ह”वरचं ते टिंब चिमटीने अलगद उचलायचं, आणि आनंदामध्ये पूर्णपणे मिसळून टाकायचं, की झालं — मिळालं त्या टिंबाला मौल्यवान आणि हवंसं अढळ स्थान.पटतंय ना?

समाप्त

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments