सौ. अर्चना सुरेश देशपांडे
विविधा
☆ एक सोंगटी गेली तरी…. ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆
अलीकडे एक पोस्ट वाचली. एकट्या राहणाऱ्या चिनी आजी बाईंनी नर्सिंग होम मध्ये कायम राहायला जाण्यापूर्वी लिहिलेली. तिने आता आपल्या आयुष्याच्या कटू सत्याचा स्वीकार केला आहे. आपली मुले त्यांच्या आयुष्यात गर्क आहेत आणि त्यांच्यावर त्यांची मुलं मोठी करण्याची जबाबदारी असल्यामुळे आपल्या आईची काळजी घ्यायला ते असमर्थ आहेत हे पटल्यावर तिने आपले उरलेले आयुष्य जगण्यासाठी सर्व सोयींनी युक्त अशा नर्सिंग होम मध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. तिथं जाऊन राहणं महाग आहे म्हणून तिला स्वतःचे राहते घर विकावे लागणार आहे आणि ते तिच्या मुलांना मान्य आहे.
नर्सिंग होम मध्ये तिच्यासाठी एक छोटी खोली असणार आहे त्यात पलंग, एक छोटे कपाट टेबल फ्रिज मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन वस्तू असणार आहेत.
तिच्या आयुष्यभराचा संसार कपडे, हौसेने घेतलेले फर्निचर, स्वयंपाकाची भांडी, आवडीच्या वस्तू, घेतलेली पुस्तके यामधून फक्त कपाटात मावेल एवढेच ती बरोबर नेऊ शकणार आहे उरलेल्या सामानाचे काय करायचे हा तिच्यापुढे प्रश्न आहे.
तिच्याकडे या सर्व वस्तू विकून टाकण्यासाठी वेळ आहे ना शक्ती आहे… महागड्या वस्तू द्यायचा तर कोणाला देणार? तिच्या मुलांना, नातेवाईकांना कोणाला त्यातले काहीच नको आहे.
नर्सिंग होम मध्ये जाताना फक्त जरूरीपुरते कपडे भांडी स्वत:च्या महत्वाच्या वस्तू म्हणजे ओळख पत्र, हेल्थ इन्शुरन्स कार्ड, बँकेचे कार्ड, जेष्ठ नागरिक कार्ड एवढेच नेणे गरजेचे आहे. आता तिला जाणवते की आयुष्यभर खूप प्रसिद्धी, मानपान, यश, बंगले, बक्षिसे मिळवली पण आयुष्याच्या शेवटच्या दिवसासाठी तुम्हाला राहायला एक खोली आणि झोपायला बिछाना एवढेच लागते.आणि जगातून जाताना अक्षरश: रिकाम्या हाताने जावे लागणार आहे. ही पोस्ट वाचली आणि क्षणभर काहीच सुचेना, घशाशी आवंढा दाटून आला. सगळ्या गोष्टी बद्दल अनासक्ती वाटू लागली. सगळं फोल वाटू लागले. पन्नास वर्षे गोळा केलेला संसार डोळ्या पुढे आला. गेल्या पन्नास वर्षात खूप सामान गोळा झाले आहे. मुली लग्न होऊन गेल्या, त्या त्यांच्या वस्तू, कपडे घेऊन गेल्या तरी घरातली कपाटे भरलेली होती.
आता मी एकटी उरले आहे मागे. ना दुकानात जाण्याची इच्छा ना नवीन खरेदीची आवड तरीपण कपाट रिकामी पडलेली नाहीत.
ही पोस्ट वाचली तेव्हा घरातला पसारा डोळ्यापुढे आला. माझ्या मुली आपल्या देशात असत्या तर प्रश्न नव्हता. दहा फेऱ्या मारून त्यांनी घर आवरले असतं पण दोघी परदेशात. मी गेल्यावर एकदा येतील, नंतर त्या येणार कोणासाठी? आल्या एखाद्या खेपेस तर काय काय करतील? सगळं भंगारवाल्याला देऊन टाकतील कदाचित. पणआईची आठवण म्हणून काय घेऊन जातील,.? मला एकदम सासुबाई गेल्या तेव्हाची आठवण झाली. खूपवर्ष झाली त्यांना जाऊन. त्या गेल्या तेव्हा मी त्यांचा चष्मा आठवण म्हणून घेतला होता व तो आता कुठे गेला आठवत नाही. अगदी आई अण्णांच्या कितीतरी वस्तू मी जपल्या आहेत..? अण्णांचीएक वही ठेवली होती जपून. पण ती सुद्धा हवी तेव्हा सापडणार नाही बहुतेक.
मग माझ्या मुली काय नाही तर आईची आठवण म्हणून फारतर एखादी साडी घेऊन जातील बरोबर आणि ती कपड्यांच्या ढिगात तळाशी जपून ठेवतील. आठवण होईल तेव्हा बाहेर काढतील, तीच्या वरून हात फिरवतील आणि बघता बघता आपल्या संसारात गुंतून जातील.आई वडिलांची आठवण येणार नाही असं नाही पण आठवण मनातल्या मनात असेल. हळू हळू साडी घडीतच जीर्ण होऊन जाईल.
पाणी नेहमी पुढे पुढेच वहात जाते ना..? वाहताना खूप गोष्टी, आयुष्याच्या वळणावळणाच्या प्रवाहात कुठल्यातरी तीरावर मागे सुटून जातात आणि शेवटी काही आंबटगोड चवी शिल्लक राहतात.
आपल्याला कदाचित आपले शेवटचे दिवस वृद्धाश्रमात किंवा नर्सिंग होम मध्ये नाही घालवावे लागणार पण आपल्याला शेवटच्या प्रवासाला जाताना सर्व धनदौलत, घरदार, जपलेल्या वस्तू, नातीगोती, राग रुसवा, माया ,मोह सर्व इथेच सोडून जायचं आहे. आपली मुलं नातवंड प्रियजन त्यांच्यात अडकलेला जीव हे शरीर सोडून बाहेर पडेल तेव्हा आपण सर्वापासून दूर वेगळ्या जगात जाणार आहोत आणि थोड्या काळानंतर सर्व जण आपल्याला विसरून जीवनात नव्याने रमुन जाणार आहेत. “जन पळभर म्हणतील हाय हाय”हा जगाचा नियमच आहे.
या खेळातले खेळाडू बाद झाले की कायमसाठी आपल्या आयुष्यातून, आठवणीतून नाहीसे होतात हे त्रिकालाबाधित सत्य प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे. एक गोष्ट स्वतःला बजावत राहायच आहे
ठाउक आहे मला
न काही मज वाचुनि अडणार
एक सोंगटी बाजूस सारून
खेळ पुन्हा सरणार…!!!
© सौ. अर्चना सुरेश देशपांडे
पुणे
मो. ९९६०२१९८३६
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈