सौ. सुचित्रा पवार

?  विविधा  ?

☆ ओंजळ… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

दोन तळहात जोडून झालेला हा खोलगट भाग म्हणजे ओंजळ, एक हाताने जेव्हा काही स्वीकारता – घेता येत नाही तेंव्हा आपण ओंजळ वापरतो, लहानपणी इवल्याश्या हातात गोळ्या, चिंचोके, गोट्या, फुलं मावत नाही तेव्हा ओंजळ पुढे येते, न चुरगळता, न गळता अलवार ओंजळीत धरलेली फुले हात सुगंधी करून जातात. खरे प्रेम असेल तरच ओंजळीत प्राजक्त ताजा रहातो म्हणे !

तहानेने व्याकुळ झालेला जीव जेव्हा रानावनात भटकतो, तेव्हा झर्यातले, ओढ्यातले, विहिरीचे, नदीचे पाणी पिण्यासाठी ओंजळ पुढे येते थंडगार पाण्याने मन तृप्त होते.

शालेय जीवनात गोट्या घेण्यासाठी, शेंगा घेण्यासाठी ओंजळच उपयोगी पडते.ओंजळीत  बोरे, चिंचा  मावत नसतात.लपाछपी खेळताना ओंजळीत चेहरा लपवला जातो.लहानपणी गजगे बिट्ट्याचा डाव खेळताना ओंजळीचाच उपयोग होत असे.चिंचा झेलायला, फुले वेचायला, देवाला फुले वहायला ओंजळच उपयोगी पडते आणि हो! त्याची न तिची नजरानजर होताना…इश्श!…नकळत ओंजळीत चेहरा झाकला जातो.

कोणतीही वस्तू  दान देताना ओंजळीचा उपयोग होतो.

जी वस्तू आपण ओंजळीत धरतो तिच्या अस्तित्वाचा गन्ध ओंजळीला लागतो.पाण्याचे अर्ध्य दिलं तर ओंजळ ओली होते.फुले असली तर गन्ध लागतो,फुलपाखरांचे रंग अन वाळू असेल तर रेती !

दान देणाऱ्याची  ओंजळ तर ईश्वर कधीच रिकामी ठेवत नाही.भरलेली दानाची ओंजळ मनाची समृद्धी दाखवते अन ओंजळीत दुवा साठतो.आपल्या ओंजळीत आपण काय भरायचे हे आपली सद्सद्विवेक बुद्धीच ठरवते नाही का ??

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments