श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ विविधा ☆ कुर्यात् सदा मंगलम्….भाग 1 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई☆

विवाहाची सुरुवात वाँगनिश्चयाने होते. त्यावेळचे मंत्र असे आहेत. वधुपिता वरपित्याला म्हणतो,

“वाचा दत्ता मया कन्या पुत्रार्थ स्वीक्रुता त्वया।

कन्यावलोकन विधी निश्चितस्त्ंवं सुखी भव॥”

अर्थ — मी अंतःकरणपूर्वक तुम्हाला अर्पण केलेली कन्या तुम्ही मनःपूर्वक स्वीकारली आहे. तिचं यथायोग्य अवलोकन करून कोणताही दोष नाही याची खात्री करुन, सुखी व्हा.

वरपिता वधुपित्याला म्हणतो,

“वाचा दत्ता त्वया कन्या पुत्रार्थ स्वीक्रुत मया ।

वरावलोकनविधौ निश्चितंस्त्ंव सुखी भव ॥

ह्या मंत्रामध्येही तुम्ही वराचं अवलोकन करून तुम्ही खात्री करून घ्या व सुखी  व्हा. असं वचन दिलेलं आहे. वधुवरांना समान महत्व दिलेलं इथे दिसून येतं.

कन्यादान करतानाच्या मंत्राने तर वधुपित्या वराला शब्दाने बांधून घेतलेलं आ… करुण वातावरणात थोडी हास्याची खसखस पिकावी म्हणून काही गमतीदार विधी समारंभात छान रंगत आणतात. ‘लाजाहोम’ च्या वेळी मुलीचा भाऊ मेहुण्याचा चक्क कान पिळतो. “माझ्या बहिणीला नीट संभाळ बरं, नाही तर मी आहे नि तू आहेस.” अशी तंभी देतो. वर त्याला कानपिळीचा मान देऊन शांत करतो.

लग्न  वधूच्या घरी करायची जुनी प्रथा आहे. हेही विचार पूर्वक ठरविलेलं आहे. मुलगी आता कायमची परग्रही जाणार. तिच्या प्रेमाचे आप्तेष्ट, शेजारी, मैत्रिणी, गायीगुरं, झाडं वेली आणि प्रत्यक्ष ते घर तिला प्रेमाने निरोप देणार. पुन्हां पुन्हां आलिंगन, प्रेमालाप, गुजगोष्टी होणार. मायबाप तिला मिठीत घेणार, तिला ही सर्वांना भेटायचय्, स्पर्शायचय, साऱ्यांना मनात साठवायचय, ह्यासाठी मायघरातला मोकळेपणाच हवा. हा घनव्याकूळ विधी माहेरीच होणं इष्ट. सीमांत पूजन, वराकडील मंडळींना अहेर करणं ह्यातही मुलीच्या हिताचाच विचार केलेला आहे. वरमायेला जरा जास्तच मान देण्याची पध्दत आहे हे खरं आहे, पण गौरिहराच्या वेळी वरमाय वधूच्या आईची ओटी भरून तिचा  सन्मान करते. पोटची पोर तिने आपल्याला दिलीय्, तिच्या पोटात दुःखाने खड्डा पडला असेल म्हणून वरमाय तिला साडी देऊन तिचं पोट झाकते नि दिलासा देते. हे किती काव्यमय आहे!

सूनमुख पहाणे ह्या विधीत वरमाय  मुलगा आणि सून यांच्या मध्ये बसते. तुम्ही दोघंही मला सारखीच हा भाव त्यात असतो.सुनेच्या तोंडात साखर घालून तिचा नि स्वतःचा चेहरा ती आरशात पहाते. आपण दोघी एकरुप होऊन आनंदाने राहू असं आश्वासन त्यात आहे. ऐरणीदान ह्या विधीच्या वेळी सुपं, वेळूची डाली, दिवे असा संभार मुलीचे मातापिता  सासरच्या प्रत्येकाच्या डोक्यावर ठेवतात. “आमच्या ह्या प्राणप्रिय कन्येची जबाबदारी आता तुमच्या शिरावर बरका.” अशी भाकच घातली जाते. मग काय बिशाद तिला कोणी सासुरवास करण्याची!

सप्तपदी हा आपल्या विवाह संस्कारातला सर्वात महत्त्वाचा विधी. यामध्ये  अग्नीच्या साक्षने वधुवर एकमेकांचे हात हाती घेऊन समान पावलं टाकतात. वधू अश्मारोहण करते व जोडिदाराला म्हणते, “मी ह्य दगडाप्रमाणे तुझ्या संसारात स्थीर राहीन.” तर नक्षत्रदर्शन ह्या विधीत वर वधूला ध्रुवतारा  दाखवतो नि म्हणतो, “मी त्या ध्रुवाप्रमाणे स्थीरपणे तुझ्याशी संसार करीन.”  दोघांच्याही  मुखातून येणारा ‘नातिचरामि’ हा उद्गार म्हणजे तर दोघांनी एकमेकांना दिलेलं प्रेमाचं अभिवचन.

ब्रह्म-माया, प्रकृति-पुरुष, यांच्या अद्वैतातून विश्वाचा हा चैतन्य पसारा सतत पसरत राहिला आहे. मानव त्यातलाच एक घटक. त्याची वैचारिक पातळी इतर प्राण्यापेक्षा  खूप वरची. त्याने स्वतःची एक आखिव रेखिव संस्कृती निर्माण केली. अनिवार्य अशी कामप्रव्रुत्ती त्यातून वंशसातत्य हा निसर्गाचा हेतू याचं उन्नयन त्याने विवाह संस्था रचून केलं. स्थल, काल, व्यक्ती सापेक्ष अशा वेगवेगळ्या प्रथा निर्माण झाल्या. त्यातली एक आपली हिंदु विवाह पध्दती. तिच्यातले बोचणारे सल आपण काढू शकतो.

वधू वरांच्या सहजीवनाचा आरंभ कोर्टकचेऱ्यातल्या रुक्ष वातावरणात होण्यापेक्षा आनंदी, मंगल वातावरणात होणंच चांगलं नाही का? मंगलाक्षता टाकून आपण म्हणुया. “कुर्यात सदा मंगलम्।”

  क्रमशः…

© श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments