श्री अरविंद लिमये
विविधा
☆ काळजी हवीच… पण..! ☆ श्री अरविंद लिमये ☆
काळजातून उमटते ती काळजी.ती वाटत असते. दडपणापोटी निर्माण होते तीही काळजीच.पण ती नकारात्मक छटा असणारी.मनाला लागून रहाणारी आणि मग हळूहळू मन:स्वास्थ्यच पोखरु लागणारी.काळजातली काळजी त्या त्या प्रश्नाचं उत्तर शोधून ते प्रश्न निर्माण करणाऱ्या कारणांचं निराकरण करण्यासाठी आवश्यकच असते आणि मदतरुपही ठरते.पोखरणारी काळजी मात्र उत्तरंच दिसू नयेत इतका मनातला अंधार वाढवत रहाते आणि त्या अंधारात स्वत: मात्र ठाण मांडून बसून रहाते.या उलट काळजातली काळजी स्वत:च प्रकाश होऊन मनातली रुखरुख कमी करणाऱ्या प्रकाशवाटेचा मार्ग दाखवते.
काळजी निर्माण करणारी कारणं असंख्य आणि त्या कारणांचे प्रकारही वेगवेगळे.इथे समतोल मनाने परिस्थितीचा विचार करुन योग्य निर्णय घेणे आणि ते अंमलात आणणे या प्रोसेसमधे ‘वाटणारी काळजी’ सहाय्यभूत ठरते,आणि ‘पोखरणारी काळजी’ अडसर निर्माण करते.त्यामुळे कितीही बिकट परिस्थिती असली,तरी काळजी करण्यात वेळेचा अपव्यय न करता काळजीपूर्वक निर्णय घेणेच हितावह ठरते.
काळजी वाटायला लावणारी अनेक कारणे बऱ्याचदा अपरिहार्य असतात.वृध्दांच्या बाबतीत आणि विशेषत: त्यांच्या एकाकी वृध्दापकाळात निर्माण होणारे प्रश्न काळजी इतकेच विवंचना वाढवणारेच असतात. अशावेळी नेमका प्रश्न समजून घेऊन एखादा सक्रिय आपुलकीचा, प्रेमाचा,आधाराचा स्पर्शही त्या प्रश्नांची तिव्रता कितीतरी पटीने कमी करु शकतो.त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सपोर्ट सिस्टीमचा आपणही एक भाग होण्यासाठी आवश्यक आहे फक्त थोडी माणूसकी आणि सहृदयता.
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈