सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ कैकयी, रामायणातील एक महत्त्वाची व्यक्ती…. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

रामायण, महाभारत ही महाकाव्ये आपल्या हिंदू संस्कृतीचे भूषण आहेत. लहानपणापासून रामायण-महाभारतातील कथा वाचून आपल्या मनात त्यातील व्यक्तिरेखा विषयी एक विशिष्ट प्रतिमा डोळ्यापुढे उभी राहते. रामायण वाचताना रामाचे आदर्श जीवन, सीतेचे पातिव्रत्य,  लक्ष्मणाचा बंधुभाव तसेच त्या अनुरोधाने येणाऱ्या इतर अनेक व्यक्तिरेखांचे चित्रण आपल्या मनामध्ये ठसले गेलेले असते. कैकयी  ही अशीच रामायणातील महत्त्वाची व्यक्तिरेखा! कैकयी आणि मंथरा या दोघी आपल्या दृष्टीने  रामायणातील खलनायिका, ज्यांच्यामुळे रामाला बारा वर्षे वनवास भोगावा लागला. प्रत्यक्षात कैकयी रामावर नितांत प्रेम करणारी, मनाने अतिशय चांगली अशी आई होती.

  कैकेय देशाचा राजा अश्वपती आणि राणी शुभलक्षणा यांची कन्या म्हणजे कैकयी!  रघुकुल वंशातील राजा दशरथाच्या तीन राण्यांपैकी ही एक! दिसायला अत्यंत देखणी आणि हुशार अशी ही राणी होती! दशरथाची ही प्रिय राणी युद्धावरही त्याच्याबरोबर जात असे. देवदानवांच्या युद्धात देवांच्या सहाय्यासाठी ती दशरथा बरोबर गेली होती, तेव्हा दशरथाच्या रथाचा दांडा तुटला असताना त्या दांड्याला हाताने तोलून धरून तिने रथ तुटण्या-कोसळण्यापासून  वाचवला. युध्द झाल्यावर जेव्हा दशरथाला हे कळले तेव्हा त्याने आनंदित होऊन तिला दोन वर मागण्यास सांगितले. तेव्हा कैकयी ने  ते वर मी योग्य वेळी मागेन असे राजाला सांगितले.

मंथरेच्या बहकावण्यामुळे तिने ते वर मागितले खरे पण त्यातही तिला सुप्त साध्य करायचे होते. दशरथाला पुत्र शोकामुळे मरण येईल, असा श्रावण बाळाच्या वडिलांनी शाप दिला होता. दशरथाला राम किंवा इतर मुलांच्या मृत्यूमुळे शोक होऊ नये यासाठी श्रीरामालाच दूर पाठवायचा निर्णय घेतला, ज्यामुळे श्रीराम ही वाचणार होते व श्रीराम वनवासाला जाणार या दुःखातच दशरथाचे मरण होते.

अशा तऱ्हेने कैकयी ने एक वर मागितला.

 दुसरा हेतू असा होता की त्या काळी ऋषीमुनींना त्रास देणाऱे

अनेक राक्षस, राक्षसी भरत वर्षात होत्या. त्यांचा राम-लक्ष्मण यांच्या हातून मृत्यू व्हावा, आणि सर्व प्रजा राक्षसांच्या त्रासातून मुक्त व्हावी असाही हेतू रामाला वनवासात पाठविण्यामागे होता.

यामुळेच शुर्पणखेसारखी राक्षशीण मारली गेली.कैकयीचे रामा वर खूप प्रेम होते, किंबहुना भरतापेक्षा जास्तच!  संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी राक्षस वध, लंकेचा राजा रावण याचा वध या सर्व गोष्टी श्रीरामांच्या वनवासा मुळेच घडून येणार होत्या. त्यामुळे मंथरेने दिलेला सल्ला मानून कैकयीने रामाला वनवासाला पाठवले व मोठे कार्य करवून घेतले. भरता बरोबर रामाला परत आणण्यासाठी कैकयी स्वतः वनवासात पण गेली होती. ती दुष्ट नव्हती. तो काळच असा होता की या सर्व घटना तिच्या एका वरामुळे घडून गेल्या. श्रीराम परत अयोध्येला आल्यानंतर कौसल्या सुमित्रेबरोबरच कैकयी ने त्यांचे स्वागतच केले!

रामायणातील कैकयीची व्यक्ती रेखा या माहिती मुळे उजळून निघते!

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments