सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
विविधा
☆ काळी चंद्रकळा नेसू कशी? ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
महाराष्ट्रीयन स्त्रियांच्या वेषभूषेत नऊवारी, पाचवारी साडीची खासियत असते. पंजाबी ड्रेसचे प्रमाण वाढले असले तरी लग्नात मिरवायला शालू, पैठणीच आवडते. आपल्या महाराष्ट्रीयन पद्धती नुसार लग्नानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला काळी साडी घेण्याची पद्धत होती. काळ्या साडीवर पांढरी खडी असलेली चंद्रकळा उठून दिसत असे. त्यावर हलव्याचे दागिने घातले की चंद्र कळा अधिकच खुलून दिसे. लग्नानंतर पहिल्या वर्षी हौसेने हळदीकुंकू करून नवीन सुनेला काळी साडी नेसायला लावणे आणि हलव्याचे दागिने घालून तिचा सण करणे हे सासू ला आवडत असे तसेच सुनेलाही त्यात कौतुक वाटत असे. आमच्या लग्नानंतर माझ्या मोठ्या नणंदेने हलव्याचे सर्व दागिने करून आणले होते. बिंदीपासून ते पायातल्या जोडव्या पर्यंत! अगदी कंबर पट्टा सुद्धा केला होता हे सर्व दागिने काळ्या चंद्र कळेवर खूपच खुलत होते.इतकी वर्ष झाली तरी तेव्हाचा तो चंद्रकळेचा स्पर्श मनाला आठवतो आणि अजूनही मी अधून मधून संक्रांतीला काळी साडी खरेदी करते.
जानेवारी महिन्यात येणारा संक्रांत सण हा विविध गोष्टीने सजलेला असतो शेतकऱ्यांसाठी शेतात पिकणारी दौलत- बाजरी वांगी, तीळ,सर्व प्रकारची धान्ये आणि भाज्या -अशा स्वरूपात दिसत असते. भारतात सगळीकडे हा सण विविध रुपात साजरा केला जातो. दक्षिणेत त्याला ‘पोंगल’ म्हणतात.तर उत्तरेकडे हा संक्रांतीचा सण ‘पतंगाचा सण’ म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवसात हवा स्वच्छ असते. आकाश निरभ्र असते. आकाशाच्या पार्श्वभूमीवर उंच उंच जाणारे पतंग मनोहारी दिसतात.!
या सणाला दानाचे महत्त्व आहे.त्यामुळे आपल्या जवळ असलेले दुसऱ्याला देणे ह्याचे संक्रांतीला महत्व आहे.हळदीकुंकू करून त्या निमित्ताने सवाष्णी ला दान करणे हा मूळ हेतू होता,तो कमी होऊन आता कोणी काय वस्तू लुटल्या हे सांगणे आणि आपले वैभव दाखवणे यासाठीच हळदीकुंकू समारंभ करतात की काय असे वाटते! पूर्वी सुगड दान
करत असत.त्या सुगडात उसाचे करवे, तीळगुळ,वाटाणा हरभरा,पावटा,यासारखे त्या दिवसांत मिळणाऱ्या गोष्टी घालत असत.आता सुगडाची पध्दत शहरात फारशी दिसत नाही,पण गावाकडे मात्र अजूनही सुगडांचे पूजन केले जाते.
आपल्या हिंदू संस्कृतीत आपले सणवार हे कालानुरूप साजरे केले जातात.या थंडीच्या दिवसांत स्निग्ध पदार्थ जास्त खावेत या हेतूने तीळगुळ, तूप, लोणी,बाजरी यांसारख्या गोष्टींचा उपयोग आहारात केला जातो.संक्रांतीनंतर सूर्याचे संक्रमण होऊन दिवस मोठा होऊ लागतो.उष्णता वाढू लागते.उन्हाळ्यात काळे कपडे आपण घालू शकत नाही. पण संक्रांतीला आपण आवर्जून काळे कपडे वापरतो.लहान बाळांना बोरन्हाण घालणे,काळी झबली,फ्राॅक घालणे हे सर्व कौतुकाने करतो,कारण पुढील चार महिने काळा कपडा अंगावर नको वाटेल! प्रत्येक सण असा काही हेतू ने साजरा केला जातो.
आज काळी साडी कपाटातून बाहेर काढल्यावर आपोआपच असे काही विचार, आठवणी मनात जाग्या झाल्या, त्या शब्द रूपात प्रकट केल्या.. इतकेच!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈