विविधा
☆ क्रांतितले अप्रकाशित तारे – भाग-2 ☆सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆
क्रांतीतले अप्रकाशित तारे – रानी मां गायडिल्लू (Gaidinlue)
(वयाची उमेदीची चौदा पंधरा वर्षे त्यांना तुरूंगवा सोसावा लागला.)…पुढे चालू
बाहेर आल्यानंतर रानी मां गायडिन्ल्यू यांचे आदिवासींसाठी कार्य जोमाने सुरू झाले. कारण धर्मांतरे थांबली नव्हतीच!! त्यांनी राजकीय क्रांती बरोबर सामाजिक, सांस्कृतिक चळवळींनाही प्राधान्य दिले. नागा आदिवासी लोकांचे जीवन सुधारण्यासाठी रानीने जिवाचे रान केले. तिथल्या आदिवासींच्या जीवनात सुधारणा करण्यात रानी मां यांचा सिंहाचा वाटा आहे. तुम्ही सुद्धा हिंदू समाजाचेच घटक आहात हे त्यांनी आदिवासी नागांच्या ध्यानात आणून दिले.
त्या नंतर विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम रा.स्व. संघ यांच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आल्या. वनवासी कल्याण आश्रमाचे संस्थापक बाळासाहेब देशपांडे , रा.स्व. संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या भेटी रानी मां यांनी घेतल्या.त्यामुळे त्यांच्या चळवळी खूपच जोरात चालू लागल्या.
१७ फेब्रुवारी १९९३ रोजी रानी मां गायडिन्ल्यू यांचे देहावसान झाले. त्यानंतर १९९६ साली सरकारने त्यांच्या गौरवाप्रीत्यर्थ एक डाक तिकीट जारी केले. जवाहरलाल नेहरू विश्व विद्यालयातील एका रस्त्याला सन्मानाने ” रानी मां गायडिन्ल्यू पथ” असे नाव देण्यात आले आहे. तसेच भारतीय तटरक्षक दलाच्या एका जहाजाला ही रानी मां यांचे नाव देऊन त्यांना सन्मानित केले आहे.
रानी मां गायडिन्ल्यू यांना १९७२ साली ताम्रपत्र फ्रीडम फायटर अॅवॉर्ड, १९८३ साली विवेकानंद सेवा अॅवॉर्ड, तसेच १९८२ साली * पद्मविभूषण देऊन गौरविण्यात आले आहे.
२०१४ ते २०१५ हे वर्ष मणिपूर व नागालँड सरकारने त्याचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले. त्या वर्षाच्या समारोप समारंभाला भारताचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदींजी उपस्थित होते. त्यांनीच रानी गायडिन्ल्यू यांना नुसते रानी असे संबोधता रानी मां गायडिन्ल्यू असे संबोधले. तेव्हापासूनच त्यांना रानी मां असे म्हटले जाते.
वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने २६ जानेवारी हा केवळ प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा न होता तो दिन आता ” नारी शक्ति दिन” म्हणूनही साजरा केला जातो.
भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीमध्ये असे अनेक क्रांतिकारक आहेत की ज्यांची नावे अजूनही लोकांना माहीत नाहीत. त्यांचे कार्य नि:संशय महानच आहे. त्यापैकीच एक रानी मां गायडिन्ल्यू या आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापनाच्या दिवशी वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने एक देशव्यापी कार्यक्रम आयोजित केला गेला. तो लाईव्ह पाहण्याचे भाग्य मला लाभले. आणि रानी मां गायडिन्ल्यू यांचे चरित्र थोडक्यात का होईना पण प्रत्येकाला समजले पाहिजे असे मला वाटले. म्हणून हा लेखनप्रपंच !!!
समाप्त
© सुश्री प्रज्ञा मिरासदार
पुणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈