प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर
विविधा
काल्या म्हणजे आमच्या घरादाराचं रक्षण करणारा आमचा लाडका ईमानी कुत्रा..अगदी काळ्या कुट्ट रंगाचा…
म्हणून त्याला आम्ही सगळे काल्याच म्हणतो…काही वर्षापूर्वी गावात उंट घेऊन आलेल्या भटक्या कुटूंबासोबत काल्या आला होता.उंटवाले गेले पण काल्या मागे राहिला.घरातल्या भाकरी तुकड्यावर मोठा झाला आणि घरातला रक्षक सदस्यच बनून राहीला..
तशीच आमची मनी माऊ पंडी…घरभर फिरून पायात लुडबूड करणारी आमची मनी तिला आम्ही सगळेच पंडी म्हणतो. काल्या आणि पंडी दोघांची जाम मैत्री…दोघेही आपल्या आपल्या तोऱ्यात अंगणभर वावरत असतात.
आम्ही गावी गेलो की काल्याला खूप आनंद होतो. काल्या अंगावर झेप घेत कडकडून भेटायला हमखास अंगणात असतोच.त्याचं काळं नूळनूळीत शरीर आणि तशीच वळवणारी शेपटी सारखी हलत असते…आणि पंडी तर म्याऊ म्याऊ करत पायात घुटमळत येत असते.. रात्री आणि दिवसभर कोणीही अनोळखी दिसला तर काल्या गुरगुरला म्हणून समजाच…. रस्त्यावर,अंगणात, झाडाखाली आणि शेडमध्ये ऐटीत बसून जागरूक राहणारा काल्या..तर अंगणात आणि झाडावर फिरून भक्ष पकडून घरभर मिरवत मट्ट करणारी पंडी…!
सगळ्यांची जेवणावळ बसली की पंडी ताटाभोवती लुडबुडत राहते आणि काल्या दारात शेपटी हलवत जिभळ्या चाटत केविलवाण्या चेहर्याने बसलेला असतो.संध्याकाळी अंगणात जागरूक असलेला काल्या आणि शांत झोपलेलं घर असतं.पंडी मात्र पायात घरघरत मस्त झोप घेत राहते…. अंगणातल्या शेळ्या,गाई आणि कोंबड्यांच्या रखवालीची जबाबदारी काल्या घेतो.आणि पंडी घरातली जबाबदारी पार पाडते..कधी कधी चोरून दुध गट्ट्म करताना आईच्या हातचा फटका बसतो तिला.मग दूर जाऊन पाय आणि तोंड जिभेने साफ करत बसलेली असते पंडी….. मोकळ्या वेळात आरामात लोळण घेत पडलेली निरागस वाटते पंडी..पण तशी ती नसते.. पंडी आणि काल्या कधी कधी मजेत खेळत असतात… त्यांच्यातल्या अनोख्या मैत्रीने अंगण खेळकर बनून राहते.पहाटे आम्ही बच्चे कंपनी खडीवर भटकायला निघालो की काल्या आमच्या पुढे असतोच..त्याच्या शिवाय भटकंतीला मजा येत नाही. लहानपणी ‘पदी ‘नावाची कुत्री पण अशीच आठवण ठेवून गेलेली.
अशा मुक्या प्राण्यांनी आणि पक्षांनी गावचे घर अंगण असं सजून नेहमी किलबिलत असतं…सगळेजण घरादाराशी दिवस रात्र गप्पा मारत राहतात.मुक्या प्राण्यांची अशी बोलकी प्रीत काळजात जपून ठेवावी अशीच असते….अशी ही आमची मैत्री गावाकडे गेलो की हमखास एकमेंकांच्या स्वागतासाठी सज्ज असते…!
चित्र – प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर
© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर
‘काळजातला बाप ‘कार..
मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली
९४२११२५३५७…
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈