श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
☆ विविधा ☆ कवितेचा जन्म ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆
“काय म्हणता, मी कविता लिहिली
नाही मला ती भेटली
अचानक ह्रुदयाला भिडली
मनाची पाने उलगडली
कायमची तीने माझी पाठ धरली
मीही तिला नाही सोडली
एक नवी दिशा मिळाली
मलाच माझी ओळख झाली
मला ती भावली अन्
कविता माझी झाली
मग कविता मला प्रसवली”
खरच कविता आपण कधीच लिहिली असे होत नाही. ती कधीतरी काही गोष्टी दिसल्यावर आपोआपच ती माझ्या लेखणीतून अवतरते.कारण ती कधी कोणत्या विषयावर लिहिली जाईल ते सांगता येत नाही. आपण आपले विचार, भावना, इच्छा, एखादा विशिष्ट विषय जेव्हा व्यक्त करतो तेव्हा त्या चित्र ,न्रुत्याविष्कार, काव्य, लेख याप्रकारातून व्यक्त करतो. काही वेळा माणूस अंतर्मुख होतो तेव्हा तो स्वतःशीच बोलू लागतो. अशावेळी त्या दोन मनांच्या संवादातुन जे बाहेर पडत ते साहित्य होय.त्याचे प्रकार अनेक आहेत. त्याप्रमाणे मला काव्य स्फुरते.
एखादा फोटो चित्र पाहिल्यावर काही वेळा काही शब्द, ओळी माझ्या मनाच्या पटलावर लपंडाव सुरु होतो. पाण्यावर येणाऱ्या लाटांसारखे भासतं.आणि मी ती गोष्ट, प्रसंग,अनुभव माझ्या ह्रुदयाला जाऊन भिडतो तेव्हा मला कवितेच्या ओळी स्फुरतात. त्याला कोणतच बंधन रहात नाही. आणि ती लिहील्याशिवाय मला चैन पडत नाही.त्याला मर्यादा नसते. या कवितेचेही अनेक प्रकार आहेत. उदा. चारोळी, मुक्तछंद, काही वेळा ही कविता विशिष्ट प्रकारच्या शब्दांच्या बांधणीत लिहीली जाते. त्याला व्रुत्त म्हणतात. काही वेळा ती गेय स्वरूपात लिहिली जाते. त्यात कडवीही असतात. काही काही महाकाव्य तयार होतात. महाकाव्याला मर्यादा नसते. आणि विषय कोणता असेल हेही आपण सांगूच शकत नाही.जसा वाळवंटात निवडूंग फुलतो. तसच अवचित काही वेळा शब्दाची ओंजळ भरून वाहु लागते.त्या शब्दांची कविता होते.आपण ह्या कवितेच्या माध्यमातून कुठेही फेरफटका मारून येऊ शकतो. हे मात्र खरं!
आता हेच पहा ना.
निवडूंग हा शब्द वाचला की आपल्या डोळ्यासमोर येतं ते काटेरी वाळवंटातील झाड.पण या निवडुंगाची फुलं कधी पाहीली आहेत का?हो.मी लहान पणी शाळेत असताना फक्त पांढऱ्या रंगाची फुले पाहिली होती. पण माझ्या भावाने मला निवडुंगाच्या वेगवेगळ्या फुलांची pdfपाठवली होती. त्यात निवडूंगाचे कितीतरी प्रकार आणि त्याची नाजुक, रंगबिरंगी फुलं यांचे फोटो आहेत. काही निळी, काही लाल, पांढरी, गुलाबी, लहान, मोठी आपण त्याची कल्पनाच करू शकत नाही. पण ही तर आहे निसर्गाची किमया! आणि अशा गोष्टी, वस्तू, फोटो, चित्र यावरील विचार कवितेच्या रूपाने लिहणे हा मानवी मनाचा चमत्कार.
© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली
मो 9689896341
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈