सुश्री विभावरी कुलकर्णी
विविधा
☆ कल्हईवाला… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
बालपणीच्या आठवणी जागवणारी एक व्यक्ती आहे. मी लहान असताना आमच्या घरासमोर एक कल्हईवाला बसायचा.कल्हई म्हणजे पितळी भांड्यांना शुद्ध कथिलाचा पातळ लेप लावणे.
रोज भांड्याचा ढीग त्याच्या पुढे असायचा आणि त्याची कारागिरी बघणे हा आमचा आवडता उद्योग.काम करता करता तो गाणी म्हणायचा, गप्पा मारायचा.त्याचे ते भांडे लाल लाल तापवणे त्यात ती चमकदार काडी थोडीशीच लावणे आणि जादू केल्या प्रमाणे भांडे चकचकित करणे हे बघणे फार आवडायचे.
सगळ्या गावाची भांडी त्याच्याकडे येतात याचा त्याला फार अभिमान असायचा.बघ मी सगळ्यांचे आरोग्य कसे छान ठेवतो म्हणायचा. त्याचा आविर्भाव कोणत्याही राजा,डॉक्टर पेक्षा कमी नसायचा.त्याचे महत्व आत्ता पटत आहे.
या लेखाच्या निमित्ताने मी हे महत्व सांगण्याचा एक छोटा प्रयत्न करणार आहे.जे माझ्या वाचनात आले.काही मोठ्या जाणत्या लोकांकडून समजले व काही अनुभवाने समजले.शुद्ध कथिल विषारी नसते.त्यात लोणचे,दही कळकत नाही.
कल्हई साठी कथिल वापरले जाते ते आपल्या शरीराला खूप आवश्यक असते.सध्या तेच मिळत नसल्याने बऱ्याच आजारांना तोंड द्यावे लागते.
‘सार्थ भावप्रकाश’ या आयुर्वेदावरील ग्रंथात एक श्लोक आहे. त्याचा अर्थ पुढे देत आहे. ‘कथिल हे हलके, रुक्ष, उष्ण असून मधुमेह, कफ, कृमी, पांडुरोग व दम यांचा नाश करते. ते पित्तवर्धक असून डोळ्याला हितकार आहे. ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या समुदायाचा नाश करतो त्याप्रमाणे कथिल मधुमेहाचा नाश करते. ते सेवन केले तर सर्व इंद्रिये शुद्ध होऊन देहाला सुख लाभते.’
हा अर्थ वाचल्यावर एक विचार आला ‘हल्ली बऱ्याच लोकांना डायबेटीस (मधुमेह) का आहे?
२०-२५ वर्षांपूर्वी एवढा नव्हता. कारण पूर्वी कल्हई केलेली भांडी स्वयंपाकासाठी वापरली जात होती. तेव्हा स्टेनलेस स्टील,
ॲल्युमिनियम, कोटिंग केलेली भांडी नव्हती. पितळेच्या भांड्याला कल्हई करून वापरली जात होती. त्यामुळे कल्हईच्या भांड्यातील स्वयंपाकामुळे नकळत कथिल धातू शरीराला मिळत होता. आता ती भांडी नसल्याने कथिल शरीराला मिळत नाही.
कथिल शरीराला मिळत नाही. मी प्रयोग म्हणून कथिल आणले व स्टीलच्या भांड्यात पाणी घेऊन उकळले आणि ते पाणी पिऊ लागताच चार दिवसात आम्हा घरातील सर्वांना शौचास साफ होऊ लागली. शरीरातील घाण बाहेर फेकली जात आहे अशी जाणीव झाली.
या मुळे पुढील फायदे होतात.
१ पिंपल्स कमी होणे
२ पित्ताचा त्रास कमी होणे
३ मधुमेह खूप कमी होणे
४ पोट साफ होणे
५ दम लागणे बंद होते
६ पंडुरोग नष्ट होणे
७ कृमी नष्ट होणे
८ शरीर शुद्धी होणे
पूर्वी असे आजार दिसत नव्हते.
याला अजूनही कारणे आहेत पण लेखाच्या अनुषंगाने आज कल्हईचे महत्व माझ्या अल्पमतीने व थोड्या अभ्यासाने सांगण्याचा प्रयत्न केला.
गेली सतरा वर्षे आयुर्वेदिक डॉक्टर पितळी पट्टीला दोन्ही बाजूला केलेल्या कल्हई चे महत्व लोकांना सांगत आहेत.ही पट्टी स्टीलच्या पातेल्यात एक लिटर पाण्यात उकळून, गार केलेले पाणी पिऊन त्याचा फायदा झाल्याचे अनेकांनी सांगीतले आहे.
आमच्या पूर्वजांना ही माहिती होती. या माहिती पासून त्यांनी समाजाचे हित बघितले स्वतःपैसा केला नाही म्हणून ते अडाणी होते का? नक्कीच नव्हते.आपल्या पेक्षा आरोग्यदायी जीवन जगत होते.
यातील पटेल ते अंगीकारावे ही विनंती आहे.
© सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈