?विविधा ?

☆ को-जागर्ती…! ☆ सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

कोजागिरी पौर्णिमा म्हणजे एक पर्वणीच असते. मस्ती, गाणी, आणि आटीव मसाला दूध ! तरुणाई तर या पर्वणीची वाटच पहात असते. त्यांना चांदण्यात फिरण्याची एक आगळीच मौज अनुभवायची असते. अगदी ‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात. ‘. अशीच.

अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा लक्ष्मी व इंद्र ऐरावत पूजनाचा हा दिवस. रात्रीच्या पहिल्या प्रहरी चंद्राला अटीव दुधाचा नैवेद्य दाखवून त्याची पूजा करतात. यादिवशी नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा चंद्राचं एक वेगळंच रूप आपल्याला भासतं. व त्याचं महत्त्वही आहेच. खरंतर पौर्णिमेचा चंद्र नेहमीच छान दिसतो म्हणून तर कितीतरी कवींनी त्याच्यावर कविता केल्यात. अगदी चंद्राची कोर ते पौर्णिमेपर्यंतच्या चंद्राचं आगळं रूप यावर. !

त्यात हवीहवीशी थंडी अन मधुर सुंदर चंद्रप्रकाश मन प्रसन्न करतोच.

निसर्गाचा प्रत्येक रूप तसं लोभस सुंदरच असतं. चंद्र प्रकाशा इतकाच रात्रीचा आभाळभर पसरत जाणारा अंधार देखील. ! अमावस्येलाही स्वतःचं असं एक देखणे पण असतं तसंच पौर्णिमेला पूर्ण बिंबानं शोभणाऱ्या चंद्राचं सौंदर्य ही असतं…. खरंच मुळात पौर्णिमा मनाला भुरळ घालते त्यात शरद ऋतूतील कोजागिरी पौर्णिमा म्हणजे स्वर्गीय सौंदर्य अन सगळ्यांचा जल्लोष, गाण्यांच्या मैफिली मस्तच. अगदी लक्ष लक्ष चांदण्यांना स्वच्छ निरभ्र आकाशानं मैफिलीचं निमंत्रणच दिले असं वाटतं. शहरापासून थोडं लांब किंवा एखाद्या बागेत घराच्या टेरेसवर असं मोकळ्या वातावरणात मोकळ्या जागेत याचा जास्त आनंद घेता येतो.

असं म्हणतात की महालक्ष्मी मध्यरात्री या चंद्र मंडलातून उतरून खाली पृथ्वीवर येते ती चांदण्यांच्या प्रकाशात अमृत कलश घेऊन. प्रत्येकालाच ती विचारते की ‘को-जागर्ती ‘ ? म्हणजे आपल्या कर्तव्याला कोण जागृत आहे का? कोणी जागा आहे का ?आणि तिच्या या हाकेला साद देण्यासाठी सगळेच जागे राहतात. जागरण करतात मग तिची वाट पाहणाऱ्या.. साद देणाऱ्या सगळ्यांनाच ती अमृत म्हणजे लक्ष्मीचं वरदान देते. धनधान्य, उत्तम आरोग्य, सुख समृद्धी देते. हे शीतल कोजागिरीचं चांदणं अंगावर घेतलं की मन:शांती, आरोग्य लाभते कारण अमृताचे काही थेंब तरी आटलेल्या दुधात पडतात. सारं जग जरी झोपलं तरी बुद्धिमान, विचारी, संयमी अन आपले कर्तव्य चोख बजावणारे लोक जागे राहतातच. याबरोबर निदान मौज करण्यासाठी तरी सगळे जागे असतात.

माझ्या माहेरी वालचंदनगरला चाळ संस्कृती हो. सगळे शेजारीपाजारी मैत्रिणी जमून चंद्र चांदण्या पौर्णिमा यांना अनुसरून गाणी म्हणायची. ग्राऊंडवर मस्त फेरफटका मारायचा आणि नंतर दूध घ्यायचे. त्याबरोबर भेळही असायची. लग्नानंतर रेल्वे क्वार्टरच्या पटांगणातच दूध आटवत ठेवायचे. भेंड्या खेळायच्या. शरदाचं चांदणं अंगावर घेत चंद्राच्या सोबतीनं महालक्ष्मीच्या हाकेची वाट पाहायची. आजही आम्ही ज्येष्ठ मंडळी एकत्र जमतो आणि या पौर्णिमेचा आनंद घेतो. चांदण्यात फिरतो. दुधाबरोबरच एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाचा आनंद घेत असतो. जीवन जगताना आपल्याला असे छोटे-मोठे आनंद नेहमीच सुंदर जगायला हवे असतात. आपली संस्कृती नेहमीच आपल्याला आरोग्य आणि जीवन याचा समतोल राखायला मदतच करत असते. मनाच्या, शरीराच्या, व्याधी म्हणजे सगळा अंधार त्यामुळे नाहीसा होतो आणि एक सुंदर निरामय जीवन आपल्याला लाभतं …. अन् आजही तनामनातला अंधार मिटवून, एक एक चांदणी मनाच्या निरभ्र आकाशात उमलते. अन पूर्ण चंद्रबिंब अमृत धारा बरसतांना महालक्ष्मीची हाक ऐकू येते,

……. “ को-जागर्ती.. ?.. को-जागर्ती.. ? “ …. अन् आभाळभर पसरलेल्या चंद्र प्रकाशात त्या आटीव दुधाला, बालपणापासून जिभेवर रेंगाळणारी तीच अमृताची चव येते…. !

©  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments