☆ विविधा ☆ खेड्यातील भावबंधन ☆ श्री महेशकुमार कोष्टी ☆
आठवणीतला गाव…!
खेड्यातील भावबंधन…!
स्वच्छ, मोकळी हवा, चैतन्य अंगावर माखणारा परिसर, दूरवर पसरलेली हरितक्रांत शेते, पक्षांचा मुक्त संचार आणि आत्मियतेच्या प्रांगणात स्थिरावलेला विशाल डोंगरपायथा आणि या डोंगर पायथ्याशी वसलेलं कौलारू, धाब्याची घरं असलेलं एक टुमदार खेडं…!
सूर्याच्या साक्षीने मंगलमय दिवसाची सुरूवात होते. भल्या पहाटे कडाक्याची बोचरी थंडी घालविण्यासाठी पेटविलेल्या शेकोटीची आल्हाददायक उष्मा देहावर मायेची ऊब पांघरत असते. माय-भगिनी दारापुढे सडा-रांगोळी घालण्यात मश्गुल झालेल्या असतात. गुरा-ढोरांचा हंबरडा वासरांच्या काळजात वात्सल्याचं उधाण आणीत असतो. पहाटेच्या भक्तीरसात डोंगरमाथ्यावरच्या मंदिराच्या घंटा ताल धरू लागतात आणि प्रत्येकाच्या मुखातून हरीनामाचा गजर दुमदुमू लागतो. चुलीवर भाजलेल्या भाकरीच्या घासाने तृप्त होणार्या न्याहरीने दिवसभरातल्या कष्टाला सुरूवात होते आणि खेड्यातलं अनोखं भावबंधन मनामनात घर करू लागते…!
जीवाला जीव देणार्या, एकमेकांशी मायेची नाती जोडणार्या, शेजार्याचं सुख आणि दुःख आपलं मानणार्या माणसांनी हे खेडं एक कुटुंब बनलेलं असतं. व्यक्तिच्या वयाला मान देत दादा, मामा, अण्णा, बापू आणि अगदीच अनोळखी व्यक्तींसाठी ‘राम राम पाव्हणं’ अशी प्रेमळ हाक इथे ऐकू येते, तेव्हा आपणही या कुटुंबाचा अविभाज्य सदस्य बनून जातो. डेरेदार वडाच्या झाडाखाली रंगणार्या पारावरच्या गप्पा भावनिक आणि सामाजिक आदानप्रदानास सहाय्यभूत ठरत असतात. या गप्पांतून प्रत्येकाची सुख-दुःखं वाटून घेतली जातात, तेव्हा सुखाची सावली गडद झाल्याची आणि दुःखाचं आभाळ स्वच्छ, निरभ्र झाल्याची अनुभूती होते. चांदण्यांच्या प्रकाशात बाजल्यावर बसून माय-लेकी, सासू-सुना ‘म्या दिलेली चटणी कशी व्हती?’ ‘कोरड्यास कसं व्हतं?’ अशी आपुलकीनं विचारपूस करतात, तेव्हा त्यांच्या सुगरणतेबरोबरच एकसंघतेचे अतूट बंध अजरामर होत राहतात.
दिवसभरात राबून, कष्ट करून थकलेल्या देहाला विसावा मिळतो तो मंदिराच्या पायरीशी! टाळ, मृदंग, तंबोर्याच्या सुमधुर स्वरांच्या साथीत वातावरण भक्तीमय करणारे अभंग कानावर पडतात, तेव्हा कष्टानं थकलेलं मन नवा जन्म घेत असल्याचा भास होतो.
सण, उत्सव, यात्रा असे कोणतेही लोकोत्सव साजरे करताना पारंपारिक संस्कृतीबरोबरच भावनिक आणि सामाजिक एकात्मतेचं दर्शन इथे घडते.
काळ्या धरणीमातेचं ॠण काळजावर कोरणारी, माणसा-माणसांत जिव्हाळ्याचे बंध पेरणारी, गुरा-ढोरांना जिवापाड प्रेम देणारी, कष्टाला दैवत मानून हात सतत कामात गुंतवणारी आणि लोकसंस्कृतीचा वारसा अखंड चालविणारी ही खेडी मनामनाला जोडणारे सेतू बनून उभी आहेत…!
© श्री महेशकुमार कोष्टी
मिरज
शिक्षक व साहित्यिक
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈