डॉ मेधा फणसळकर
विविधा
☆ खीर बाई खीर…भाग 1 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆
माझ्या माहेरी कराडला चैत्रात कृष्णाबाईचा मोठा उत्सव असतो. देवीची पालखी, जत्रा, सांस्कृतिक कार्यक्रम याची तीन दिवस रेलचेल असते. पण मला कायम उत्सवाचा शेवटचा दिवस आवडत असे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शेवटच्या दिवशी प्रसाद म्हणून ‛गव्हाची खीर’ असायची. आणि घरोघरी गहू गोळा करुन तयार केलेल्या या खिरीला एक प्रकारची अवीट गोडी असायची. सोहळयातल्या या खिरीला जसा वेगळा स्वाद असायचा तसाच ही खीर आमच्या घरी करायचा पण एक सोहळाच असायचा.
पाचवीत असताना आम्हाला शाळेत एक कविता होती. त्यात एका स्त्रीचे वर्णन करताना म्हटले होते, “ गोधूम वर्ण तिचा!” आता हा गोधूम वर्ण म्हणजे कसला? असा त्या वयात आम्हाला प्रश्न पडला. पण बाईंनी लगेचच स्पष्टीकरण केले,“मुलींनो, गोधूम म्हणजे गव्हासारखा बरं का!” तेव्हा तो गव्हाळ वर्ण डोक्यात अगदी पक्का बसला. तर अशा या गव्हाची एक गंमत आहे बर का! बिचाऱ्याला पाकशाळेत गेल्यावर कोणत्याही पाककृतीच्या नाटकात काम करायचे असेल तर अनेकदा ‛स्त्रीपार्ट च’ करायला लागतो. उदा. पुरणपोळी,सांज्याची पोळी, चपाती,गूळपापडी, कुरडई, खीर इ. इ.! क्वचित पुरुषपार्ट पण मिळतो जसे पराठा, लाडू वैगेरे वैगेरे ! पण ते हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच. असो.
तर आमच्या घरी ‘गव्हाची खीर’ करायची तर जय्यत तयारी असे. नाटकात काम करणारे अनेक कसलेले नट असले तरी कोणत्या भूमिकेसाठी कोणता नट योग्य आहे हे जसे दिग्दर्शकाला माहीत असते. तसे आमच्या घरातील आई आणि जवळच राहणारी मामी, या दोन दिग्गज दिग्दर्शकांना खिरीच्या नाटकासाठी ‛खपली गहूच’ लागत. ते दुकानात मिळाले की मामीला लगेच निरोप जात असे. मग दुपारी घरची जेवणे आटोपली की मामी जय्यत तयारीनिशी आमच्या घरी हजर होत असे. कारण नाटक बसवायचे असे ना! मग या दोन दिग्दर्शकांच्या अंगात खीर चढलेली असे. स्त्रीपार्ट करायचा म्हणजे या गव्हाला भरपूर पूर्वतयारी करावी लागत असे. नाटकात फिट होण्यासाठी सूप आणि चाळणीच्या मार्गदर्शनानंतर ते उखळबाईंच्या ताब्यात दिले जात. मामीच्या अनुभवी नजरेतून सूप आणि चाळणी या गव्हाचे ग्रुमिंग करत असतानाच बरेच दिवस दुर्लक्ष झाल्यामुळे रागावून बसलेल्या उखळ आणि मुसळीला लाडाने अंजारून- गोंजारून, थोडे पाणी पाजून आईने त्यांच्या कृष्णकांतीला लकाकी आणली असे. मग हे थोडेसे तांबूस वर्णाकडे झुकणारे खपली गहू उखळात प्रवेश करत. इथे आपले पुरुषी दिसणे कमी करण्यासाठी आपल्याला दिव्यातून जावे लागणार हे माहीत असूनही ते निमूटपणे मुसळीचे घाव सोसण्यासाठी सज्ज होत. मग आई आणि मामी या दोन दिग्दर्शिका मुसळीला वरखाली नाचवत त्यांना हवा तसा मेकओव्हर तिच्याकडून करवून घेत. यावेळी गव्हाचे वॉक्सिंग होत असे. ते करताना कातडी सोलवटली जात असे. म्हणून मध्ये मध्ये त्यावर थंड पाण्याचा शिडकावा करावा लागे. तरीही एखादा चुकार दाणा पटकन बाहेर पडे. पण दोघी दिग्दर्शिका बारीक लक्ष ठेवून असत. त्या लगेच त्यांचे बखोटे पकडून त्यांना पुन्हा उखळीत घालत. बघता बघता गव्हाचे रुप पालटू लागे. बाह्य आवरण बाजूला पडून हे गहू आता नाटकाच्या रंगात रंगायला लागलेले असत. मग याना पुन्हा सुपात नाच करावा लागे आणि उरले सुरले त्यांचे बाह्य आवरण गळून पडे व गव्हाला अधिक गोरा रंग प्राप्त होत असे. आता मात्र या दोघी दिग्दर्शिका त्यांच्या रुपावर खुश होत त्यांना थंड पाण्याच्या बाथटबमध्ये किमान तासभर तरी डुंबायला सोडत. मग त्याला त्याच पाण्यात चांगले चोळून घेऊन गरम पाण्यात, कुकरमध्ये अग्नी सरांच्या साथीने स्टीम बाथ घ्यायला लावत. मग आपल्यातील पुरुषी ताठा टाकून हे गहूराजे स्त्रीभूमिकेसाठी अगदी मऊ मुलायम बनत. आपल्यात झालेला हा बदल बघून गहूराजे स्वतःवरच खुश होत. त्यामुळे त्यांच्या शरीरावर मूठभर पाणी चढून ते टम्म फुगत. अशी ही नाटकासाठी योग्य, अंगाने भरलेली नायिका बघून दिग्दर्शकाना आपल्या नाटकाच्या यशाची खात्री पटे.
© डॉ. मेधा फणसळकर
मो 9423019961
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈