श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

⭐ खे ळ !  ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

” खेळ मांडीयेला वाळवंटी काठी….”

निरनिराळ्या ‘खेळांची’ परंपरा आपल्या भारतात अगदी पूर्वीच्या काळापासून चालत आली आहे ! अगदी तुकोबा सुद्धा आपल्या वरील अभंगात ‘खेळाचा’ उल्लेख करतात !  पण तुकोबांच्या या अभंगात त्यांना जो ‘खेळ’ अभिप्रेत आहे, तो माऊलीच्या भक्तीत रंगून चंद्रभागेच्या वाळवंटात नाचणाऱ्या भक्तांना उद्देशून आहे ! नंतर नंतर कालपरत्वे ‘खेळ’ या शब्दाची व्याख्या, संदर्भ आणि अर्थ बदलत गेले !

“चला मुलांनो, दिवेलागण झाली, आता पुरे करा तुमचे खेळ ! सगळ्यांनी घरात चला आणि हातपाय धुवून शुभंकरोती सुरु करा बघू !” हे असे उद्गार माझ्या पिढीतील अनेकांनी लहानपणी आपल्या आजी, आजोबांकडून अथवा आई वडिलांकडून अंगणात खेळतांना ऐकले असतील, याची मला शंभर टक्के खात्री आहे ! यातील ‘खेळ’ या शब्दाचा अर्थ निदान त्या काळी तरी आम्ही खेळत असलेल्या, लपाछपी, लगोऱ्या, लंगडी, हुतुतू इत्यादी अनेक खेळांसाठी असायचा ! हे ‘खेळ’ काय असतात, हे हल्लीच्या पिढीतील लहान मुलांना माहित असण्याचा संभव तर सोडाच, या खेळांची नांव तरी त्यांना माहित असतील का नाही, याचीच मला शंका आहे ! असो !

नंतर जसं जसे वय वाढत जातं, तस तसे आयुष्यातले अनेक टक्के टोणपे खाता खाता ‘खेळ’ या शब्दाच्या अनेक व्यापक अर्थांची, नव्याने जाणीव व्हायला लागते. काही बऱ्या वाईट ‘खेळांचे’ अनुभव आपल्याला दुसऱ्या लोकांकडून यायला लागतात ! त्यातून जो शिकतो तोच जगात तरतो, हे झालं माझं मत !

जगात अनेक प्रकारचे ‘खेळ’ खेळले जातात ! या दुनियेत निरनिराळे ‘खेळ’ करणारे आणि तो आवडीने बघणारे लोकं, यांची अजिबातच वानवा नाही ! लहानपणी शाळेत जातांना रस्त्यावर, भागाबाई व राजा, हा माकड आणि माकडीणीचा ‘खेळ’ किंवा दोन टोकाच्या दोन दोन बांबूना मधे उंच ताणून बसवलेल्या तारेवर कसरत करून ‘खेळ’ दाखवत आपापली पोट भरणारा डोंबारी, यांचे ‘खेळ’ आम्ही रस्त्यात उभे राहून आवर्जून पहात होतो आणि मगच पुढे शाळेत जात होतो. काही काही भाग्यवान कसरत पटूना त्यांचे ‘खेळ’ दाखवायची संधी सर्कसच्या तंबुत मिळायची, हे ही तितकेच खरं !

तरुणपणी कॉलेजला जातांना, आपल्या रोजच्या यायच्या जायच्या मार्गांवर, एखादी सुंदर तरुणी रोज दिसायला लागली की, आपण पण साधारण तीच ठराविक वेळ रोज गाठायचा प्रयत्न सुरु करतो ! प्रथम तिच्याशी नजरा नजर, नंतर थोडं हसणं, यामुळे हृदयात फुलपाखरं नाचायला लागतात ! आपणहून तिच्याशी बोलायचं धाडस होतं नाही, पण रात्रीची झोप खराब व्हायला एवढं कारण पुरतं ! कधी एकदा तिचं दर्शन होतय, हा एकच विचार सकाळी उठल्यापासून मनाला छळत असतो ! मग यातून सुरु होतो एकतर्फी प्रेमाचा ‘खेळ’ ! मन लगेच भावी आयुष्याची स्वप्न पाहण्याचा ‘खेळ’ खेळण्यात दंग होऊन जातं ! हा एकतर्फी प्रेमाचा ‘खेळ’ असाच काही दिवस चालू रहातो आणि एक दिवस रोजच्या सारखी समोरून येतांना ती दिसते ! पण, आज तिच्या हातात हात घालून, एक उमदा तरुण चालत असतो ! ती दोघं हसत खिदळत आपल्याच मस्तीत आपल्या अंगावरून जातात. तिच आपल्याकडे बघून रोजच हसणं तर सोडाच, पण ती आपल्याकडे ढुंकूनही न बघता, त्याच्या बरोबर निघून जाते ! तरुणपणी अनुभवास आलेल्या पहिल्या वहिल्या एकतर्फी प्रेमाच्या ‘खेळाचा’ दि एंड होतो !

ऑफिस मध्ये सुद्धा बॉस आपल्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवून, आपल्या कडून जास्त काम काढून घेण्याचा ‘खेळ’ खेळत असतो ! पण शेवटी तो बॉस असल्यामुळे, आपल्याला नाईलाजास्तव त्याच्या ‘खेळात’ हसत मुखाने सामील होऊन त्या ‘खेळात’ कायमच हरण्याचे नाटक करण्यावाचून गत्यन्तर नसते !

काही व्यापारी व्यापार करतांना, गिऱ्हाईकाच्या हावरेपणाचा फायदा घेऊन, आपला खराब माल वेगवेगळ्या स्कीम खाली  (sale) त्याच्या गळ्यात मारण्याचा “खेळ” आत्ता पर्यंत निरंतर खेळत आले आहेत आणि या पुढील काळात पण ते असा “खेळ” खेळत राहतील, यात काडीमात्र शंका नाही !

माझं दुसरं असं एक निरीक्षण आहे की, हल्लीच्या काही तरुण मुलांना, बोलतांना शब्दांचे ‘खेळ’ करायला भारीच आवडतं ! माझ्या मित्राचा एक मुलगा आहे कॉलेजला जाणारा, त्याला एकदा मी विचारलं, “काय रे गौरव, बाबा आहेत का घरी ?” तर हा पट्ठ्या मला म्हणतो कसा “आई बाहेर गेली आहे !” त्यावर मी काही बोलणार, त्याच्या आत स्वारी माझ्या समोरून गायब सुद्धा झाली ! आता बोला !

लेखाचा विषय कुठलाही असला, तरी त्या विषयात नेते मंडळींचा उल्लेख नसेल, तर तो लेख पूर्ण झाल्यासारखे, निदान मला तरी वाटतं नाही ! तर ही नेते मंडळी सुद्धा आपापल्या अनुनयांच्या भावनांना हात घालून त्यांच्याशी ‘खेळ’ मांडतात आणि  राजकारणातली आपली उदिष्ट साध्य करण्यात कुठलीच कसर बाकी ठेवत नाहीत ! आणि इतकंच नाही तर त्यांची ती उदिष्ट एकदा का साध्य झाली, की नंतर त्याच अनुनयांना वाऱ्यावर सोडण्याचा ‘खेळ’ तितक्याच कोरडेपणाने खेळतात !

शेवटी, आपल्याकडून वेगवेगळे ‘खेळ’ करवून घेणारा किंवा आपल्याशी ‘खेळ’ करायला दुसऱ्या कोणाला तरी उद्युक्त करणारा सर्वांचा “खेळीया” हा वर बसला आहे, यावर माझा गाढ विश्वास आहे ! आपण सगळे फक्त त्याच्या ईशाऱ्यावर, तो सांगेल तेंव्हा, तो सांगेल तो ‘खेळ’ खेळणारे खेळाडू आहोत एवढं ध्यानात धरलं, की आपल्या वाट्याला येणाऱ्या कुठल्याही खेळातल्या जय, पराजयाचा त्रास आपल्या मनाला होणार नाही याची खात्री बाळगा !

शुभं भवतु !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

२४-११-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments