श्री अरविंद लिमये
विविधा
☆ गोष्ट तशी साधीच..,पण..! ☆ श्री अरविंद लिमये ☆
एखादी गोष्ट एका ठराविक पद्धतीने करायची सवय एकदा लागली की ती गोष्ट त्याच पद्धतीने नाही झाली, त्यात कांही अनपेक्षित अडचण आली तर मन बेचैन होतं. अंगवळणी पडलेली एखादी विशिष्ट रीत एखाद्या क्षणी तशीच नाही अनुसरता येत. अट्टाहासानं तसं करणं आपलंच मन कधीकधी नाही स्विकारत. तेव्हा आपण अस्वस्थ होतो. द्विधा मन:स्थितीतील त्या अस्वस्थ मनाला बुद्धीची जर योग्य साथ मिळाली तरच विचारांना एक नवी दिशा मिळते. एरवी रीतसर सगळं करायच्या अट्टाहासात ती दिशा मात्र हरवून बसते.
त्याचीच ही गोष्ट.
गोष्ट तशी साधीच..पण
माझ्यासाठी मात्र तो अनुभव अतिशय मोलाचा. म्हणूनच आज चाळीस वर्षं उलटल्यानंतरही मी तो विसरु शकलेलो नाहीय.
तो क्षणच तसा होता. कसोटी पहाणारा.माझ्या बुध्दीची.., माझ्या श्रध्देची.., माझ्या आस्तिकतेची..!!
होय. मी आस्तिक आहे. रोजची नित्य देवपूजा हा केवळ अंगवळणी पडलेला म्हणून नव्हे, तर वर्षानुवर्षं मी श्रद्धेनं जपलेला नित्यनेम आहे.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधे एक पुसट रेषा असते असे म्हणतात. ती रेषा मला मात्र त्या कसोटीच्या क्षणी स्पष्ट दिसली आणि मी सावरलो. साधारण १९७८-७९ सालातला हा प्रसंग. माझं पोस्टींग कोल्हापूरला होतं. तिथे एकात एक अशा तीन खोल्यांच्या भाड्याच्या जागेत आम्ही राहायचो. माझी रोजची देवपूजा म्हणजे फुलं हवीतच. त्याशिवाय पूजा कशी पूर्ण होणार? ती जागाच अशी होती की फुलपुडी लावण्याशिवाय पर्यायच नव्हता. सकाळी उठल्यावर चूळ भरली कि मी आधी फुलवाल्याने पहाटे कधीतरी शटर मधून टाकलेली ती फुलपुडी घेऊन आत आणून ठेवायचो. रोजच्याप्रमाणे त्यादिवशी फुलपुडी उचलायला गेलो तर ती नेहमीच्या जागेवर पडलेली नव्हतीच. मग लक्षात आलं,त्या दाराच्या आडोशाला ठेवलेल्या शूजस्टॅन्डमधल्या माझ्या एका बुटाच्या खाचेत ती फुलपुडी पडलेलीय. मी नाराज झालो. ती फुलपुडी तशीच आत घेऊन आलो. त्यातल्या फुलांवर पाणी शिंपडून घेतलं. तेवढ्यापुरतं मनाचं समाधान झालं. पूजेला बसलो. देव धुऊन पुसून ताम्हणात ठेवले. गंध लावलं. नेहमीप्रमाणे फुलं वहायला हातात घेतली आणि अडखळलो. ती फुलं देवाला वहावीत असं वाटेचना. मग देवाला न वहाताच ती फुलं परत तबकांत ठेवली. देवाला हळद-कुंकू वाहिलं.निरांजन लावून नैवेद्य दाखवला. काहीतरी निसटून गेल्याची रुखरुख मात्र मनात होतीच. पण क्षणभरच. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली पुसटशी रेषा ओळखण्याचा तो क्षण होता. एरवी बुद्धीमुळे भ्रम होतो असं म्हणतात. पण माझ्या बुद्धीने त्या क्षणी ती रेषा नकळत ओलांडू पाहणाऱ्या माझ्या मनाला सावरलं होतं.योग्य आणि अयोग्य यातल्या फरकाची नेमकी जाणिव करून दिली होती.पूजेला फुलं नसल्याने मनाला झालेली नाराजी बुद्धीने अलगदपणे दूर केली होती. हे अयोग्य आहे हे पटवून दिलं होतं.केवळ रीतीपेक्षा, उपचारांपेक्षा शुचिर्भूतता महत्त्वाची आहे हे समजावून सांगितलं होतं. आणि मग मनातली रुखरुख विरून गेली. मन शांत झालं. डोळे मिटले. हात जोडले आणि अतिशय नम्रपणे ‘त्या’ला सांगितलं,’ देवा,आता उद्यापासून तुझी रोजची पूजा ही अशीच. जेव्हा केव्हा माझ्या दारांत एखाद्या लहानशा कुंडीत कां होईना पण चारदोन फुलं फुलतील तेव्हाच मी ती तुला वाहीन’.
पुढं जवळजवळ सोळा वर्षं ही देवपूजा अशीच सुरु राहिली. 1993 साली सांगलीतल्या वास्तव्यात आम्ही आमच्या गाव भागातल्या स्वतःच्या फ्लॅटमधे शिफ्ट झालो तेव्हा बाल्कनीतल्या कुंड्यांमध्ये निशिगंध लावला. आवर्जून लावलेल्या त्या निशिगंधाला लगडलेल्या शुभ्र सुवासिक फुलांची ओंजळ भक्तीयुक्त अंतःकरणाने मी जेव्हा ‘त्या’च्या चरणी प्रथम वाहिली,त्या पूजेनंतर मनाला स्पर्शून गेलेली सुखसंवेदना अपूर्व अशी होती. आज आमच्या’त्रिदल’ या वास्तूत सभोवतालच्या प्रशस्त बागेतल्या विविध रंग-रूप-वासांच्या फुलांनी दोन तीन मोठ्या परड्या तुडुंब भरून तेवढीच फुलं झाडा वेलींवर शिल्लक असतात.त्या परड्यांमधल्या ताज्या टवटवीत फुलांचे वाटे कितीतरी परिचितांच्या घरच्या देवघरां मधल्या ‘त्या’च्यापर्यंत पोहोचतात आणि कृतार्थता म्हणजे काय याचा अर्थ यथार्थपणे मनाला स्पर्शून जातो.देणारा तोच आणि घेणाराही तोच.पण त्यात आपलं निमित्तमात्र असणंही खूप सुखदायी असतं याचा अनुभव मला रोज नव्याने येत आहे.’त्या’चं आस्तित्त्व मनोमन मानलं त्या अजाण वयातल्या क्षणापासून सुरू झालेल्या ‘त्या’ला जाणण्याच्या असंख्य प्रक्रियां मधला तो एका क्षणभराचा अनुभव! त्यानंतर बरंच काही घडलं.लेखनाइतकीच वाचनाची आवड होती,पण त्या वाचनात नकळत विविधता आली.अगदी योगायोगाने वाचनात आलेलं ‘साद देती हिमशिखरे’ हे श्री.जी. के.प्रधान यांचं पुस्तक मला प्रभावित करून गेलं होतं. श्री.हरी भाई ठक्कर यांच्या ‘कर्माचा सिद्धांत’ आणि ‘मृत्यूचे महात्म्य’ या छोटेखानी पुस्तकांनी अतिशय मौलिक असं जगण्याचं आणि मृत्यूचंही महत्त्व मला समजावून सांगितलं.श्री.संजय पंडित यांच्या ‘मनाचे व्यवस्थापन’ या पुस्तकाने माझ्या मनातली श्रद्धा अक्षरश: खरवडून काढली आणि विचारांना योग्य मार्गावर आणलं.नरेंद्र दाभोळकरांच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा,भ्रम आणि निरास, उच्चाटन अंधश्रद्धेचे,यासारख्या पुस्तकांनीही माझ्या मनातली श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या दरम्यान असणारी पुसटशी रेषा अधिक ठळक केली हे मला आवर्जून सांगावसं वाटतं.
प्रत्येक वेळी रीतसर वागण्याच्या अट्टाहासामागे भावनांचा अतिरेक असतोच. त्या भावनांना बुद्धीची जोड मिळाली तरच त्या त्या वेळी तेवढ्यापुरती कां होईना रीतीभातीना योग्य मुरड घालणं शक्य होतं आणि ते आनंददायीही असतंच याचा प्रत्यय देणाऱ्या अनुभवाची ही गोष्ट!
गोष्ट तशी साधीच…,पण अनुभव मात्र लाख मोलाचा..! म्हणूनच आवर्जून सांगावा असा..!
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈