श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
चं म त ग ! श्री प्रमोद वामन वर्तक
कट, कट कट !
सकाळचा नेत्रसुखद मॉर्निंग वॉक घेऊन सोसायटीच्या जवळ आलो आणि माझा डावा डोळा फडफडायला लागला ! असा डावा डोळा अचानक फडफडायला लागला, तर आपल्यावर काहीतरी अरिष्ट येणार, असं जुन्या जाणत्या लोकांच मत ! माझा काही अशा गोष्टींवर विश्वास नाही, पण तुम्हाला सांगतो मंडळी, मी जिन्याची जसं जशी एक एक पायरी चढायला लागलो, तस तसा माझ्या डोळ्याचा फडफडण्याचा वेग पण वाढायला लागला ! मी बेल वाजवण्यासाठी बेलच्या बटनाला हात लावणार, तोच फ्लॅटच दार आपोआप उघडलं आणि माझा डावा डोळा फडफडायचा अचानक थांबला ! त्या धक्क्यातून सावरून समोर बघतोय तर दुसरा जोरदार धक्का मला बसला ! माझी एकुलती एक बायको हातात चहाचा कप घेऊन हजर ! आता हेच जर ते गोड अरिष्ट असेल तर ते मलाच काय, कुठल्याही नवरोबाला आवडेल, खरं की नाही ?
“अगं हे काय ? आज एकदम न मागता चहा आणि तो सुद्धा मी घरात शिरायच्या आधी?” “मी म्हटलं रोज रोज तुम्हाला कशाला ‘अगं जरा चहा देतेस का?’ अशी माझी विनवणी करायला लावायची ! आज आपणच तुम्ही न मागता, तुम्हाला चहा देवून सरप्राईज द्याव !” त्यावर तिच्या हातचा चहा घेऊन मी घरात येत तिला म्हटलं “माझे आई, गेल्यावेळच्या तुझ्या ‘सरप्राईजची’ शिक्षा अजून माझी आई मला देत्ये, ती पुरे नाही का झाली ?” “हे बघा, माझी त्या वेळेस काहीच चूक नव्हती बरं.” त्यावर मग मी चहाचा घोट घेता घेता बायकोला म्हटलं “अगं तू मला नुसतं म्हणालीस, आई येणार आहे म्हणून, मला वाटलं तुझी आई, म्हणजे सासूबाई येणार म्हणून !” “तुम्हाला तेव्हा तसं वाटलं यात माझी काय चूक ?” “बरं, चूक झाली माझे आई ! पण आता मला खरं खरं सांग, या आजच्या माझ्या स्वागता मागे कुठले छुपे कारण दडलं आहे ?” “अहो माझी ती पुण्याची मालू मावशी आठवते का तुम्हाला ?” “मालू मावशी… ” “अहो ती नाही का आपण आपलं लग्न झाल्यावर तिच्या पाया पडायला गेलो…..” “हां, हां आत्ता आठवलं, तिचा बंगला काय मस्त आहे ना कोथरूडला!” आता हिच माहेर पुण्यात त्यामुळे तिचे बहुतेक सारे नातेवाईक पुण्याचे आणि जवळ जवळ सगळ्यांचेच बंगले, म्हणून मी आपली अंधारात एक गोळी चालवून बघितली. पण तुम्हाला सांगतो मंडळी, ती बरोब्बर वर्मी लागली ! “हां, तिच ती, तर त्याच मालू मावशीचा मगाशी फोन आला होता.” “अस्स, काय म्हणतात मालू मावशी, तब्येत वगैरे बरी आहे ना त्यांची ?” “हो, अगदी ठणठणीत आहे ती आणि हो, तिच्या मुलीच्या, मुलीच लग्न आहे परवा त्याचच बोलावणं करायला तिनं फोन केला होता !” “अरे व्वा, मग जाऊया की आपण दोघं!” “दोघं नाही मी एकटीच!” मी मनांत आनंदून, पण वरकरणी तसं न दाखवता तिला म्हटलं “म्हणजे ? तुझं लग्न झालंय आणि तुला एक नवरा पण आहे, हे मावशी विसरली की काय?” “अहो तसं नाही, सध्याच्या करोना काळात लग्नाला फक्त ५० लोकं कार्यात सहभागी होऊ….” “ते माहित्ये गं मला, पण आपल्याकडून आपण दोघं….” “नाही जाऊ शकत” बायको ठामपणे म्हणाली. ते ऐकून माझ्या मनांत, चार पाच दिवसाच्या स्वातंत्र्याची स्वप्न पडायला लागली ! मी आणखी काही बोलणार, तर तीच पुढे म्हणाली “अहो माझाच नंबर ५० माणसात ५० वा आहे आणि तो सुद्धा मावशीच्या लंडनच्या भाच्याची बायको येणार नाही म्हणून! ती जर येणार असती तर, माझा पण पत्ता कट होता, कळलं.” मी मनातल्या मनांत त्या अज्ञात भाच्याचे आणि त्याच्या अज्ञात बायकोचे आभार मानत हिला म्हटलं “हे नक्की ना?” “म्हणजे ?” “म्हणजे, तू नक्की एकटीच पुण्याला लग्नाला जाणार हे.” “हो” “मग मी काय म्हणतो, आता अनायासे तू पुण्यात जात आहेस तर, लग्न झाल्यावर चार पाच दिवस आईकडे जाऊन ये.” “तेच माझ्या डोक्यात होतं, पण या करोनमुळे आपल्या स्वयंपाकाच्या मावशी येत नाहीत, मग तुमचे जेवणाचे हाल….” “अजिबात होणार नाहीत, हल्ली सगळ्या हॉटेलनी (आणि बारनी) होम डिलिव्हरी चालू केली आहे. त्यामुळे तू माझ्या जेवणाची अजिबात काळजी करू नकोस !” “ठीक आहे, मग परवाच लग्न लागलं की मी आईकडे चार पाच दिवस राहून येईन.” असं म्हणून बायको आनंदाने किचन मधे गेली आणि मी उद्या पासून मिळणारे चार पाच दिवसाचे स्वातंत्र्य कसे साजरे करायचे या विचारात मग्न झालो. रमेश, सुरेश, नंदन आणि योगेश यांना मोबाईलकरून सेलिब्रेशनचे आमंत्रण करून टाकले आणि अंघोळीला पळालो.
रात्री कधी नव्हे ती, बायकोला बॅग भरण्यात मदत करत होतो, तेवढ्यात बायकोचा मोबाईल वाजला. “अय्या मालू मावशीचा आहे” असं मला सांगत तिने फोन उचलला. “बोल गं मावशी, ही काय उद्याची बॅगच भरायला बसल्ये.” या बायकोच्या एका डायलॉग नंतर, तिचा मोबाईल नाही पण आवाज म्यूट झाला आणि तिच्या चेहऱ्यावरचे रंग बदलत जाऊन डोळ्यात पाणी उभे राहिलं. दहा मिनिटं अशीच म्यूट गेली आणि बायकोने “ठीक आहे” असं म्हणून मोबाईल बंद केला व रडायला आणि बॅग उपसायला एकदमच सुरवात केली. “अगं असं एकदम रडायला…..” “मी नाही जात आहे लग्नाला” ते ऐकून मला परत कोणीतरी पारतंत्र्याच्या बेडया ठोकल्याचा भास झाला ! “अगं पण का?” “माझा पत्ता कट झाला” असं म्हणून ती पुन्हा रडायला आणि बॅग उपसायला लागली. “पण लग्नाच्या वऱ्हाडी मंडळीत तुझा ५० वा नंबर होता…” “होता ssss ! पण आता मावशीच्या लंडनच्या भाच्याच्या बायकोला रजा मिळणार आहे आणि ती लग्नाला नक्की येणार आहे म्हणून मावशीने माझा पत्ता कट केला !”
बायकोचे ते वाक्य, मला मिळणाऱ्या चार पाच दिवसाच्या स्वातंत्र्यचा पण आपोआप पत्ता कट करून गेले आणि मी डोकयावर पांघरूण घेऊन, मित्रमंडळींना कसं पटवायचं याचा विचार करू लागलो !
© श्री प्रमोद वामन वर्तक
(सिंगापूर) +6594708959
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈