श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? शॉपिंगचा विजय ! ?

“अहो, ऐकलंत का, मला जरा पंधरा हजार द्या !”

“पंधरा हजार ? एवढी कसली खरेदी करणार आहेस ?”

“मनःशांती !”

“काय मनःशांती ? आणि ती सुद्धा फक्त पंधरा हजारात ?”

“हो ! पण या पंधरा हजारात ती फक्त एका महिन्यासाठीच मिळणार आहे बरं का !”

“आणि नंतरचे अकरा महिने ?”

“नंतर पुढच्या प्रत्येक महिन्यासाठी मनःशांती हवी असेल, तर परत दर महिन्याला पंधरा हजार भरायचे !”

“अस्स, म्हणजे मनःशांती मिळवायची प्रत्येक महिन्याची फी पंधरा हजार आहे असं सांग की सरळ !”

“अगदी बरोब्बर ओळखलंत तुम्ही !”

“अगं पण तुला ही मनःशांती देणार कोण ?”

“अहो, आपल्या चाळीत ‘नवरे मनःशांती केंद्र’ सुरु झालं आहे गेल्या महिन्या पासून, ते मी जॉईन करीन म्हणते. घरात तुमची सदा कटकट चालू असते, त्यामुळे जरा शांतता नाही माझ्या डोक्याला !”

“क s ळ s लं ! पण आपल्या चाळीच्या ४५ बिऱ्हाडात, माझ्या माहिती प्रमाणे ‘नवरे’ नावाचे कोणतं बिऱ्हाडच नाही, मग…”

“अहो केंद्राचे नांव जरी ‘नवरे मनःशांती केंद्र’ असलं तरी ते चालवतायत तिसऱ्या मजल्यावरचे गोडबोले अण्णा !”

“भले शाब्बास, अण्याने आता हे नको ते धंदे चालू केले की काय या वयात ?”

“काय बोलताय काय तुम्ही ? धंदे काय धंदे ? चांगल पुण्याचं काम करतायत अण्णा, तर तुम्ही त्याला नको ते धंदे काय म्हणताय !”

“अगं पुण्याचं काम करतो आहे नां अणण्या, मग फुकटात कर म्हणावं ! त्यासाठी प्रत्येका कडून महिन्याला पंधरा हजार कशाला हवेत म्हणतो मी ?”

“अहो केंद्र चालवायचं म्हणजे  कमी का खर्च आहे?”

“कसला गं खर्च ?”

“अहो एक सुसज्ज AC हॉल घेतलाय त्यांनी भाड्याने त्यांच्या केंद्रासाठी ! त्याच भाडं, लेक्चर द्यायला बाहेरून मोठं मोठी अध्यात्मिक लोकं येणार त्यांच मानधन, असे अनेक खर्च आहेत म्हटलं.”

“बरं बरं, पण मला एक कळलं नाही, केंद्राचे नांव त्या अणण्याने ‘नवरे मनःशक्ती केंद्र’ असं का ठेवलंय ?”

“ते मला काय माहित नाही बाई, पण एखाद वेळेस आपापल्या नवऱ्यापासून मनःशांती मिळावी, असा उदात्त हेतू असावा असं नांव ठेवण्या मागे अण्णांचा !”

“हे बरं आहे अणण्याच, स्वतःची बायको शांती, त्याला गेली त्याच्या कटकटीमुळे या वयात सोडून माहेरी आणि हा दुसऱ्यांच्या बायकांना मनःशांतीचे धडे देणार ?”

“अहो शेजारच्या कर्वे काकू सांगत होत्या, शांती काकी जेंव्हा अण्णांना सोडून गेल्या, तेव्हाच अण्णा हिमालयात गेले होते एका आश्रमात साधना करण्यासाठी आणि तिथूनच ते दिक्षा घेवून आले…..”

“आणि आता ते तुम्हां सगळ्या भोळ्या साधकांकडून महिन्याला प्रत्येकी पंधरा हजाराची भिक्षा घेवून तीच दिक्षा देणार, असंच नां ?”

“बरोब्बर !”

“अगं पण तुला हवीच कशाला मनःशांती म्हणतो मी ? आपल्या दोन मुली लग्न होऊन गेल्या आपापल्या सासरी, घरात आपण दोघच ! सासूचा त्रास म्हणशील तर, आई जाऊन पण आता दहा वर्ष….”

“उगाच देवानं तोंड दिलंय म्हणून काहीच्या बाही बोलू नका !  मगाशीच मी तुम्हांला सांगितलंय, तुमची रिटायर झाल्या पासून रोज घरात कटकट चालू असते, त्यामुळे माझी मनःशांती ढासळली आहे !”

“अगं पण तुझ्या ढासळलेल्या मनःशांतीवर माझ्याकडे एक जालीम उपाय आहे ! त्यासाठी महिन्याला पंधरा हजार खर्च करायची काहीच गरज नाहीये !”

“अहो, उगाच महिन्याचे पंधरा हजार वाचवण्यासाठी मला काहीतरी फालतू उपाय सांगू नका तुमचा ! गपचूप…..”

“अगं आधी उपाय ऐकून तर घे मग बोल !”

“ठीक आहे, बोला !”

“हां, तर उपाय असा आहे, मी तुला या महिन्यापासून दर महिन्याला, फक्त तुझ्या शॉपिंगसाठी बरं का, पाच हजार देणार आणि त्याचा हिशोब पण मागणार नाही, बोल !”

“काय सांगताय काय ? फक्त माझ्या एकटीच्या शॉपिंगसाठी महिन्याला पाच हजार ?”

“हॊ s s य!”

“पण अहो, त्या माझ्या पाच हजारच्या शॉपिंगमधे मी तुमची एक लुंगी सुद्धा आणणार नाही, कळलं नां ?”

“अगं लुंगीच काय, माझा एक साधा हातरूमाल सुद्धा मी तुला आणायला सांगणार नाही, मग तर झालं !”

“मग ठीक आहे !”

“पण त्यासाठी माझी एक अट आहे”

“आता कसली अट?”

“हे महिन्याचे तुझ्या एकटीच्या शॉपिंगसाठीचे पाच हजार तुला पाहिजे असतील, तर ‘नवरे मनःशांती केंद्राचा’ नाद तुला सोडावा लागेल !”

“पण मग माझ्या ढासळलेल्या मनःशांतीवरच्या उपायाच काय ?”

“ते काम माझ्याकडे लागलं !”

“तुम्ही करणार उपाय?”

“हो s s य !”

“अहो मला जरा कळेल का, तुम्ही कसला उपाय करणार आहात ते !”

“अगं साधा पंधरा रुपयाचा उपाय आहे, तू माझ्यावर सोड !”

“आता बऱ्या बोलानं सांगताय, का जाऊ नांव नोंदवायला अण्णांकडे ?”

“अगं काही नाही, खाली जातो आणि पंधरा रुपयात मिळणारे, स्विमिंग करतांना पोहणारे लोकं, जे इअर प्लग्स घालतात ते घेवून येतो !”

“त्यांच मी काय करू ?”

“अगं तुला असं जेव्हा जेव्हा वाटेल, की मी आता तुझ्याशी कटकट करायला सुरवात केली आहे, तेव्हा तेव्हा ते तू कानात घालायचेस ! म्हणजे तुला माझ्या बोलण्याचा त्रास होणार नाही आणि तुझी……”

“मनःशांतीपण ढासळणार नाही, काय बरोबर नां ?”

“अगदी बरोब्बर ! मग आता काय, जाणार का त्या ‘नवरे मनःशांती केंद्रात नांव नोंदवायला ?”

“नांव नका काढू त्या केंद्राचे, पण माझं

आत्ताच्या आत्ता एक काम करा जरा !”

“ते आणि काय ?”

“तसं काही खास नाही, मी आल्याचा चहा घेवून येते, तो पर्यंत या महिन्याचे माझे शॉपिंगचे पाच हजार काढून ठेवा ! लगेच या महिन्याच्या शॉपिंगला जाते ! शुभस्य शीघ्रम !”

असं बोलून बायको किचन मधे पळाली आणि मी दर महिन्याचे दहा हजार कसे वाचवले याचा विचार करत, स्वतःची पाठ स्वतःच थोपटू लागलो ! शॉपिंगचा विजय असो !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

२१-०१-२०२२

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments