श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

💃 फेरा एकवीसचा ! 😅

“पंत हे तुम्ही काय चालवलंय ? “

“मोऱ्या अरे आज तुला झालंय तरी काय, नेहमी सारखा नमस्कार वगैरे करशील का नाही ?”

“नाही आणि करणार पण नाही,  कारण मी रागावलोय तुमच्यावर, म्हणून आज नमस्कार वगैरे विसरा !”

“ही तुला काही बोलली का मोऱ्या ?”

“काकू कशाला बोलतील मला?  मी तुमच्यावर रागावलो आहे म्हटलं ना !”

“अरे हो, पण मी पडलो साधा पेन्शनर, कुणाच्या अध्यात ना मध्यात, मग माझ्यावर रागावण्या सारखं मी केलय तरी काय, ते तरी सांग!”

“काय म्हणजे, परवा आपल्या वरच्या मजल्यावरच्या नितीनच्या मुलाचं बारस होत, तर…. “

“हो मस्त दणक्यात केलंन हो, आम्ही दोघे गेलो…. “

“ते बोलला मला नितीन, पण बाळासाठी अहेराच पाकीट… “

“न्यायला अजिबात विसरलो नव्हतो मोऱ्या, खरं सांगतो !”

“हो ते खरंय, पण पाकिटात पैसे… “

“सुद्धा आठवणीने एकवीस रुपये टाकले होते, पाहिजे तर विचार नितीनला !”

“बोलला मला नितीन त्याबद्दल.. “

“मग झालं तर !”

“तसच आठ दिवसापूर्वी केळकरांच्या मुलाची मुंज होती, तेव्हा पण….. “

“आम्ही दोघे जोडीने आवर्जून गेलो होतो बटूला आशीर्वाद द्यायला !त्याच्या लग्नाला आम्ही असू, नसू ! त्याला पण चांगला एकवीस रुपयांचा अहेर… “

“केळकर काका म्हणाले मला.”

“मग झालं तर, उगाच इतर काही लोकांसारखी रिकामी पाकीट द्यायची सवय नाही मला, कळलं ना मोऱ्या ?”

“ते ठाऊक आहे मला पंत, काही झालं तरी तुम्ही रिकामं पाकीट देणार नही ते. पण आता मला सांगा, गेल्या महिन्यात कर्णिकांच्या मंदाच लग्न होत, तर तिला सुद्धा….. “

“एकवीस रुपयाचाच आहेर केला होता आठवण ठेवून ! अरे लहान असतांना आमच्या राणी बरोबर खेळायला यायची आमच्या घरी. “

“पंत, मंदा लहानपणी तुमच्याकडे खेळायला यायची वगैरे वगैरे, ते सगळे ठीक आहे, पण तुम्ही बारस, मुंज आणि लग्न यात काही फरक करणार आहात की नाही ?”

“अरे मोऱ्या हे तिन्ही वेगवेगळे विधी आणि समारंभ आहेत, पूर्वी पासून चालत आलेले, त्यात मी फरक करण्या एव्हढा, कोणी थोर समाज सेवक थोडाच आहे ? हां, आता लहानपणी कुणाची मुंज राहिली असेल तर ती लग्नात लावता येते, पण बारस बाळ जन्मल्यावर बाराव्या दिवशी केल तर त्याला मुहूर्त बघायला लागत नाही असं म्हणतात, म्हणून लोक…. “

“पंत, मी त्याबद्दल बोलतच नाहीये !”

“मग कशा बद्दल बोलतोयस बाबा तू ?”

“अहो मी तुमच्या आहेराच्या रकमे बद्दल बोलतोय !”

“त्या बद्दल काय मोऱ्या ?”

“सांगतो ना पंत, तुमच्या दृष्टीने बारस, मुंज आणि लग्न यात  काही फरक आहे का नाही ? मग प्रत्येक वेळेस एकवीस रुपयाचाच आहेर, याच काय लॉजिक आहे तुमच, ते मला समजेल का ?”

“ते होय, त्यात कसलं आलंय लॉजिक ? त्याच काय आहे ना, अरे हल्ली, आपले आशीर्वाद हाच खरा आहेर, कृपया पुष्प गुच्छ आणू नयेत, अशा छापाच्या तळटीप प्रत्येक निमंत्रण पत्रिकेत असतात, तरी सुद्धा मी आठवणीने….. “

“सगळ्यांना एकवीस रुपयाच्याच आहेराची पाकीट का देता, हेच मला जणून घ्यायच आहे पंत आज !”

“मोऱ्या असं बघ, एकवीस या आकड्याच महत्व माझ्या दृष्टीनं फार म्हणजे फारच वाढलेलं आहे सध्या ! म्हणून मी सगळ्यांना एकवीस रुपयाचाच आहेर करतो हल्ली !”

“ते कसं काय बुवा पंत ?”

“सांगतो ना तुला. आपण या समारंभातून मिळणाऱ्या भोजनावर यथेच्छ ताव मारतो की नाही?”

“तसच काही नाही पंत, पण अशा समारंभात मी नेहमी पेक्षा थोडं जास्त जेवतो इतकंच !”

” बरोबर, तर त्याची अल्पशी परत फेड म्हणून…. “

“काय बोलताय काय पंत तुम्ही ? एकवीस रुपयाच्या पाकिटात कसली आल्ये परतफेड ? हल्ली अशा समारंभात माणशी जेवणाचे दर तुम्हाला…..”

“चांगलेच माहिती आहेत मोऱ्या ! हल्ली सातशे आठशेच्या खाली ताट नसतं ठाऊक आहे मला, पण म्हणून मी अल्पशी…. “

“पंत अहो तुमच्या अल्पला थोडा तरी अल्पार्थ आहे का सांगा बघू ?”

“आहे, नक्कीच आहे मोऱ्या !”

“हो का, मग म्या पामराला जरा तो समजावता का पंत ? “

“सांगतो ना मोऱ्या. आता असं बघ, सध्या शिवथाळी कितीला मिळते सांग बर मला ?”

“दहा रुपयाला !”

“बरोबर, म्हणजे सकाळी एक शिवथाळी आणि संध्याकाळी एक शिवथाळी या एकवीस रुपयात येवू शकते की नाही ?”

“हो पंत, म्हणजे एका माणसाचा एका दिवसाचा दोन वेळचा जेवणाचा प्रश्न सुटेल वीस रुपयात ! पण तुमच्या एकवीसच्या पाकिटातला एक रुपया शिल्लक राहतोच ना पंत ? त्याचे हल्लीच्या महागाईत खायचे पान सोडा, आपट्याचे एक पान पण येणार नाही पंत !”

“अरे पण माझ्या एकवीस रुपयाच्या आहेरातला तो उरलेला रुपया, पानासाठी वापरायचा नाहीच मुळी!”

“मग, त्या राहिलेल्या एक रुपयाचं करायच काय पंत ? पिगी बँकेत टाकायचा का ?”

“अरे नाही रे बाबा, पण जर का   शिवथाळी खाऊन तब्येत बिघडली, तर राहिलेल्या एका रुपयात सरकारच्या नवीन योजने प्रमाणे ‘आपल्या दारात आरोग्यचाचणी एक रुपयांत’ नाही का करता येणार ? म्हणजे लागला ना एकवीस रुपयाचा हिशोब !”

“धन्य आहे तुमची पंत !”

“आहे ना धन्य माझी मोऱ्या, मग कधी करतोयस लग्न बोल? म्हणजे

तुझ्यासाठी पण एक, एकवीसाचे अहेराचे पाकीट तयार करायला मी मोकळा !”

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

१७-०३-२०२२

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
3 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments