श्री प्रमोद वामन वर्तक
चं म त ग !
नवीन अंगाई गीत ! श्री प्रमोद वामन वर्तक
“नमस्कार पंत, हा तुमचा पेपर आणि आपल्या चाळीची बातमी आली आहे आजच्या पेपरात पान सहावर, ती आठवणीने वाचा, येतो मी !”
“कसली बातमी मोऱ्या ?”
“पंत तुम्ही वाचलीत तर तुम्हांला कळेल ना आणि त्या बातमीत माझं पण नांव छापून आलं आहे, अगदी फोटो सकट !”
“अरे गाढवा तू ती बातमी सांगितलीस तर तुझी जीभ काय झडणार आहे ? आणि तुझा फोटो कशासाठी छापलाय पेपरात ? तू साधा गल्लीतला नेता पण नाहीस अजून !”
“तसं नही पंत, तुमच्यामुळेच ती बातमी आणि माझा फोटो छापून आला आहे पेपरात !”
“माझ्यामुळे ? ते कसं काय ?”
“अहो पंत, तुम्हीच नाही का मला गेल्यावेळेस नवीन आयडिया दिलीत त्या बद्दलच ती बातमी आहे !”
“मोऱ्या, नेहमी तू मला ‘कोड्यात बोलू नका’ असं सांगतोस आणि आज तू स्वतःच कोड्यात बोलतोयस ! आता मला जर ती बातमी उलगडून नाही सांगितलीस तर उद्यापासून आमच्या पेपरला हात लावायचा नाही, कळलं ?”
“असं करू नका पंत ! अहो तुमचा पेपर वाचल्या शिवाय माझी ‘प्रातरविधी’ पासूनची सारी कामं अडतात हे तुम्हांला पण माहित आहे !”
“हॊ ना, मग आता मुकाट्यानं मला ती बातमी सांगतोस का उद्यापासून आमचा पेपर वाचण बंद करतोस ?”
“सांगतो सांगतो पंत ! आता तुम्ही माझ्या वर्मावरच वार करायला निघालात तर….”
“उगाच अलंकारिक बोलायला जाऊ नकोस, पट पट बोल !”
“पंत, अहो गेल्यावेळेला तुम्ही नाही का म्हणाला होतात, की आपल्या अहमद सेलरच्या आठ चाळीत रोज कोणाकडे ना कोणाकडे कसलं तरी मंगल कार्य असतं आणि लोकं हजारो रुपये खर्च करून DJ लावून ते साजर करीत असतात, त्या ऐवजी…….”
“त्याच पैशातून गरीब हुशार विद्यार्थ्यांना मदत करावी अथवा कुठल्यातरी सामाजिक संस्थेला देणगी द्यावी, असं मी सुचवलं होत खरं !”
“बरोबर पंत आणि चाळ कमिटीचा अध्यक्ष या नात्याने मी तो कार्यक्रम यशस्वीपणे राबवला त्याचीच बातमी आली आहे आजच्या पेपरात !”
“अरे व्वा ! तुझं अभिनंदन मोऱ्या !”
“धन्यवाद पंत, पण तुमच्यामुळेच हे शक्य झालं ! येतो आता !”
“मोऱ्या थांब जरा, माझं काम आहे तुझ्याकडे !”
“कसलं काम पंत ?”
“अरे माझा मित्र वश्या जोशी पूर्वी डोंबिवलीला रहात होता, अगदी स्टेशन जवळ आणि आता तो ठाण्यात घोडबंदरला आला आहे रहायला !”
“बरं मग ?”
“मोऱ्या वश्याला ठाण्यात आल्यापासून निद्रानाश जडला आहे, रात्रभर झोप म्हणून लागत नाही त्याला !”
“मग जोशी काकांना एखाद्या डॉक्टरकडे जायला सांगा ना !”
“अरे चार, पाच डॉक्टर करून झाले त्याचे पण काडीचा उपयोग झाला नाही त्याला, उगाच पैशा परी पैसे गेले ते वेगळेच !”
“पंत जोशी काकांच्या निद्रानाशावर जर चार पाच डॉक्टरांनी हात टेकले असतील तिथे मी बापडा काय करू शकणार सांगा ?”
“सांगतो ना ! अरे परवाच वश्याचा फोन आला होता आणि तो माझ्याकडे अगदी रडकुंडीला येवून, त्याच्या निद्रानाशावर काहीतरी उपाय सांग रे असं म्हणत होता ! त्यावर मी बराच विचार करून एक उपाय शोधला आहे, पण त्यासाठी मला तुझी मदत लागेल, म्हणून तुला थांब म्हटलं !”
“असं होय, बोला पंत काय मदत हवी आहे तुम्हाला माझ्याकडून ?”
“मोऱ्या त्या तुमच्या DJ च्या कर्कश्य आवाजावरूनच मला एक उपाय सुचलाय बघ !”
“कोणता?”
“सांगतो ना, अरे त्याची डोंबिवलीची जागा अगदी स्टेशन जवळ, म्हणजे दिवस रात्र ट्रेनचा खडखडाट बरोबर ?”
“बरोबर, मग ?”
“म्हणजे रोज रात्री झोपतांना वश्याला ट्रेनच्या खडखडाटाचे अंगाई गीत ऐकायची सवय आणि ते अंगाई गीत ठाण्यात त्याच्या कानावर पडत नाही, म्हणून वश्याला निद्रानाशाचा विकार जडला असावा असं माझं ठाम मत आहे !”
“मग पंत मी तुम्हाला यात काय मदत करू शकतो ते तर सांगा !”
“मोऱ्या तू मला फक्त एका CD वर, ट्रेनचा भरधाव जायचा आवाज, रेल्वे ट्रॅकच्या खडखडा सकट एखाद दुसऱ्या ट्रेनच्या हॉर्न बरोबर रेकॉर्ड करून दे, बास्स !”
“त्यानं काय होईल पंत ?”
“अरे तोच वश्याच्या निद्रा नाशावर उपाय, कळलं ?”
“नाही पंत !”
“अरे गाढवा, मी वश्याला सांगणार, ही CD घे आणि रात्री झोपतांना हे तुझं अंगाई गीत ऐकत ऐकत सुखाने झोप ! नाही तुला निद्रादेवी प्रसन्न झाली तर नांव बदलीन माझं !”
“धन्य आहे तुमची पंत !”
© प्रमोद वामन वर्तक
ताजा कलम – आपल्यापैकी कोणी नुकतीच स्टेशनं जवळची जागा बदलली असेल आणि वश्या सारखा झोपेचा प्रॉब्लेम आपणास सतावत असेल तर वरील उपाय करून बघायला हरकत नाही !
२२-०४-२०२२
ठाणे.
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈