श्री प्रमोद वामन वर्तक
चं म त ग !
नळ आणि बादली ! श्री प्रमोद वामन वर्तक
“अगं ऐकलंस का, जरा घोटभर आल्याचा चहा देतेस का ? घसा अगदी सुखून गेलाय !”
“पाणी नाहीये !”
“म्हणजे ? आज पाणी आलंच नाही नळाला ?”
“मी असं कुठे म्हटलं ?”
“अगं पण तू आत्ताच म्हणालीस ना की पाणी नाहीये म्हणून !”
“हजारदा सांगितलं कान तपासून घ्या, कान तपासून घ्या, पण माझं मेलीच कोण ऐकतोय ?”
“आता यात माझे कान तपासायच काय मधेच ? मला नीट ऐकू येतंय आणि तूच म्हणालीस की पाणी नाहीये म्हणून, हॊ की नाही ?”
“हॊ मी म्हणाले तसं, पण नळाला पाणी नाहीये असं कुठं म्हणाले ?”
“बरं बाई, चुकलं माझं !”
“नेहमीप्रमाणे !”
“कबूल ! नेहमीप्रमाणे चुकलं ! तू नुसतंच पाणी नाहीये असं म्हणालीस ! पण चहा पुरतं तरी पाणी असेल ना घरात ?”
“अहो यंदा पावसाने सगळ्यांच्या तोंडच पाणी पळवलंय आणि तुम्हांला आल्याचा चहा प्यायची हौस आल्ये ?”
“अगं येईल तो त्याच्या कला कलाने, त्यात काय एवढं ? आता तरी मला जरा घोटभर चहा देशील का ?”
“अजिबात नाही, आधी मला पाच हजार द्या, नवीन साडी घ्यायला मग करते तुमच्यासाठी आल्याचा चहा !”
“आता हे काय मधेच साडीच काढलयस तू ? अजून कपाटातल्या 10-12 साडया एकदा तरी तुझ्या अंगाला लागल्येत का सांग बरं मला ? आणि त्यात ही आणखी एक नवीन साडी घेणार आहेस आणि ती सुद्धा पाच हजाराची ?”
“अहो कालच आमच्या ‘ढालगज महिला मंडळाने’ एक ठराव पास केलाय आणि त्या नुसारच आम्ही सगळयांजणी ही विशिष्ट डिझाईनची नवीन साडी घालून लग्नाला जाणार आहोत !”
“सध्या तरी लग्नाचा कुठलाच मुहूर्त नाही, मग ही पाच हजाराची विशिष्ट डिझाईनची साडी नेसून तुमचं महिला मंडळ कुणाच लग्न अटेंड करणार आहे, हे कळेल का मला ?”
“अहो मी मगाशी म्हटलं नाही का ? या मेल्या पावसाने गडप होऊन सगळ्यांच्या तोंडच पाणी पळवलं आहे म्हणून ?”
“हॊ, पण त्या मेल्या पावसाचा आणि तुम्ही जाणार असलेल्या लग्नाचा काय संबंध ?”
“सांगते नां, तुम्हांला माहितच आहे आपल्याकडे गावा गावातून, जर पाऊस पडला नाही तर तो पडावा म्हणून, भावला भावलीच किंवा बेडूक बेडकीच लग्न लावतात !”
“हॊ, वाचलंय खरं तसं मी पेपरात, पण अशी अनोखी लग्न लावून खरंच पाऊस पडतो यावर माझा अजिबात विश्वास नाही हं !”
“पण आमच्या महिला मंडळाचा आहे नां !”
“म्हणजे आता तुम्ही पाऊस पडावा म्हणून तुमच्या मंडळात असं बेडका बेडकीच किंवा भावला भावलीच लग्न लावणार की काय ? आणि त्या साठी पाच हजाराची नवीन साडी ?”
“अहो आपल्या मुंबईत कुठे मिळणार बेडूक आणि बेडकी लग्न लावायला ?”
“का नाही मिळणार ? अगं तुम्ही क्रॉफर्ड मार्केटला गेलात तर बेडूक आणि बेडकीच काय, मगर किंवा सुसरीची जिवंत जोडी सुद्धा मिळेल त्यांच लग्न लावायला !”
“मिळेल हॊ पण काही प्राणी प्रेमी बायकांचा त्याला विरोध आहे म्हणून….”
“मग भावला भावलीच लग्न लावा की ?”
“अहो आता आम्ही सगळ्याजणी दिसत नसलो, तरी आज्या झालोय म्हटलं ! मग आम्ही भावला भावलीच लग्न लावलं तर लोकं हसतील नाही का आम्हांला !”
“आता भावला भावली नाही, बेडूक बेडकी नाही म्हणतेस, मग तुमच्या लग्नात नवरा नवरी कोण असणार आहेत ते तरी सांग मला ?”
“नळ आणि बादली !”
“का ssss य ssss ?”
“अहो केवढ्यानं ओरडताय ?”
“नळाच आणि बादलीच लग्न लावणार आहे तुमचं ढालगज महिला मंडळ ?”
“मग, त्याला काय झालं ? आपण शहरात राहातो आणि या दोन गोष्टींचा पाण्याशी अत्यंत जवळचा संबंध आहे हे विसरू नका तुम्ही ! आणि पाऊस जर चांगला झाला तरच आपल्या घरात नळाला पाणी येतं हे पण तितकंच खरं आहे नां ?”
“हॊ खरं आहे तू म्हणतेस ते !”
“नेहमीप्रमाणे !”
“हॊ नेहमीप्रमाणे, पण म्हणून या लग्नाला पाच हजाराची साडी ?”
“अहो मी सुरवातीलाच म्हटलं नाही का, आम्ही सगळ्याजणी या लग्नात विशिष्ट डिझाईन केलेली साडी नेसणार आहोत म्हणून !”
“हॊ, पण म्हणून या अशा लग्नाला पाच हजारची साडी घ्यायची म्हणजे….. !”
“अहो आमची प्रत्येक साडी, प्रोफेशनल साडी डिझाईनर कडून स्पेशली बनवून घेतल्यामुळे त्याची किंमत तेवढी असणारच ना आता ?”
“एवढं कसलं डिझाईन असणार आहे त्या साड्यांवर ?”
“अहो मी आत्ताच म्हटलं नां तुम्हांला, की पाऊस पडावा म्हणून आम्ही आमच्या मंडळात नळाच आणि बादलीच लग्न लावणार आहोत म्हणून ?”
“हॊ ! “
“अहो म्हणूनच आमच्या प्रत्येकीच्या साडीचा रंग जरी वेगळा असला, तरी या लग्नाचा पावसावर इम्पॅक्ट पडण्यासाठी आमच्या सगळ्या साड्यांवर वेगवेगळ्या साईझचे व डिझाईनचे नळ असणार आहेत आणि त्याच्या जोडीला वेगवेगळ्या आकाराच्या आणि रंगाच्या बादल्या पण असणार आहेत !”
“धन्य आहे तुमच्या मंडळाच्या ढालगजपणाची !”
© प्रमोद वामन वर्तक
१९-०६-२०२२
दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈