श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🤣 ते, ती आणि मी कुकरी क्लासेस !😅💃श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“पंत, पंत, पंत हे आता तुम्हीं नवीन कुकरी क्लासच काय काढलंय मधेच ?”

“अरे मोऱ्या थांब थांब, असं ओरडायला काय झालं तुला एकदम आणि आमचा पेपर आणलास का ते सांग आधी ?”

“आणलाय, हा घ्या आणि बोला !”

“काय बोलू मोऱ्या ? मस्त पावसाला सुरवात झाल्ये ! वाटलं नव्हतं की हा परत इतक्या लवकर येईल !”

“पंत, मी तुम्हांला तुम्हीं चाळीत चालू करणार असलेल्या कुकरी क्लास बद्दल विचारतोय आणि तुम्ही पावसाचं काय सांगता आहात मला !”

“अरे मोऱ्या मला वाटलं असा मस्त पाऊस पडतोय तर तुला काकूच्या हातचा आलं घातलेला चहा हवा असेल आधी, म्हणून म्हटलं !”

“पंत चहाच नंतर बघू ! आधी मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या !”

“कुठला प्रश्न मोऱ्या ?”

“तुम्ही चाळीत कुकरी क्लास चालू करणार आहात आणि त्याला लेले काका, जोशी काकांच ऑब्जेकशन आहे आणि चाळीचा सेक्रेटरी या नात्याने त्या दोघांनी माझ्याकडे तशी लेखी तक्रार पण केली आहे !”

“मोऱ्या, त्या घाऱ्या जोशाला आणि त्या बिनडोक लेल्याला काडीची नाही  अक्कल, तेव्हा तू त्यांच्याकडे अजिबात लक्ष देवू नकोस !”

“असं कसं पंत, चाळीचा सेक्रेटरी या नात्याने मला त्यांच्या तक्रारीची दखल घेणं भाग आहे !”

“बरं बरं, काय तक्रार आहे त्यांची?”

“तुम्ही हा कुकरी क्लास चाळीत सुरु करू नये असं त्यांच म्हणणं आहे आणि त्या लेखी तक्रारीवर पाठिंबा म्हणून 23 चाळकऱ्यानी सह्या पण केल्या आहेत !”

“अरे पण का ?”

“पंत, कारण मागे तुम्हीं चाळीत योगासनाचे फुकट वर्ग चालू केलेत, त्यात जोशी काकूंचा पाय फ्र्याक्चर झाला होता, आठवतंय ना ?”

“नं आठवायला काय झालंय मोऱ्या ? अरे ही गेल्या महिन्यातच घडलेली गोष्ट ! अरे मी त्या बयेला सांगितल, की हे विचित्रासन तू करू नकोस, तुझं वजन जास्त आहे ! तरी ऐकायला म्हणून तयार नाही ती बया आणि घेतलान पाय फ्र्याक्चर करून, त्याला मी काय करणार ?”

“आणि लेले काकूंच्या हाताचं काय ?”

“अरे मोऱ्या मी त्या महामयेला म्हटलं, हे मयुरासन तुला जमेल असं वाटत नाही तर तू ते करू नकोस, त्या ऐवजी मी तुला दुसरं आसन सांगतो !”

“मग ?”

“मग काय मग मोऱ्या ? अरे लेल्याची बायको शोभयला नको ती महामाया, तो एक हट्टी तर ही दहा हट्टी !”

“म्हणजे ?”

“अरे हट्टास पेटून केलेन तीन मयुरासन आणि घेतलान हात मोडून, त्याला मी कसा जबाबदार सांग बरं मला ?”

“बरोबर आहे तुमच पंत, पण तुम्ही हा कुकरी क्लास चालू करू नये असं त्यानी तक्रारीत म्हटलंय, म्हणून मी तुमच्याकडे आलो !”

“अरे पण मोऱ्या, हा कुकरी क्लास सुद्धा मी योगाच्या क्लास सारखा फुकट चालू करतोय, तर त्याला त्यांच का ऑब्जेक्शन हे सांगशील का मला जरा ?”

“सांगतो ना पंत, हा कुकरी क्लास चाळीत सुरु करून तुम्ही चाळीत हिंसेचा प्रचार आणि प्रसार करणार आहात, असं त्यांच म्हणणं आहे !”

“हिंसा ?”

“हॊ, आता तुम्ही कुकरीचे क्लास घेतांना, ती कशी चालवायची, कसे वार करायचे, कशी फेकून मारायची हेच शिकवणार नां? मग एक प्रकारे हा हिंसेचा प्रचार आणि प्रसारच नाही का ?”

“बघितलंस, बघितलंस काय अकलेचे दिवे पाजळतायत तुझे लेले काका आणि जोशी काका !”

“म्हणजे ? मी नाही समजलो पंत !”

“मोऱ्या, अरे त्या दोन बैलांना वाटलं मी कुकरी क्लास घेतोय म्हणजे नेपाळी गुरखा लोकं जी कुकरी वापरतात, ती कशी चालवायची हे मी त्या क्लास मध्ये शिकवणार म्हणून !”

“हॊ, मला पण तसंच वाटलं, म्हणून मी त्यांची तक्रार दाखल करून घेतली नां पंत !”

“मोऱ्या गाढवा, अरे तू तर चांगला शिकला सवरलेला आजचा तरुण आणि तुला कुकरीचा तोच एक अर्थ माहित आहे ? दुसरा अर्थ माहित नाही ?”

“आहे ना पंत, जेवण बनवणे !”

“अरे बैला, मग त्या दोन नंदी बैलांना सांगितलं का नाहीस तसं ?”

“सॉरी पंत, पण तेंव्हा लक्षात आलं नाही माझ्या.  पण मग तुम्ही तुमच्या क्लासच नांव ‘ते, ति आणि मी कुकरी क्लासेस’ असं विचित्र का ठेवलंय ?”

“मोऱ्या, जेवण करतांना अत्यावश्यक असलेल्या तीन पदार्थांच्या नावांचे शॉर्टकट आहेत ते !”

“म्हणजे काय पंत ?”

“अरे बल्लवा, तू…”

“पंत मी मोरू, हा बल्लव कोण आणलात तुम्ही मधेच ?”

“मोऱ्या, अरे मला तुला बैला म्हणायचं होतं पण चुकून बल्लवा असं तोंडातून बाहेर पडलं !”

“ठीक आहे पंत, पण ते तुम्ही तुमच्या कुकरी क्लासच्या नावाच्या शॉर्टकटच काहीतरी सांगत होतात !”

“हां, म्हणजे असं बघ, कुठलही जेवण करतांना आपल्याला तेल, तिखट आणि मीठ यांची गरज लागतेच लागते, हॊ की नाही ?”

“बरोबर पंत !”

“मोऱ्या, म्हणूनच आजच्या तुमच्या जमान्यात शोभेल असं ट्रेंडी नांव मी माझ्या कुकरी क्लासला दिलं आहे !”

“धन्य आहे तुमची पंत !”

© प्रमोद वामन वर्तक

०८-०७-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments