श्री प्रमोद वामन वर्तक
चं म त ग !
सासू, सून आणि DP ! 😂💃श्री प्रमोद वामन वर्तक
“सुनबाई, ऐकत्येस का ?”
“काय आई ?”
“अगं बाबू उठला का गं ?”
“आई बाबू म्हणजे….”
“किती वर्ष झाली गं तुमच्या प्रेमविवाहाला सुनबाई ?”
“इश्श, तुम्हांला जसं काही माहीतच नाही !”
“मला माहित आहे गं, पण तुमच्या या प्रेमविवाहाआधी किती वर्ष फिरत होतात ते माहित नाही नां, म्हणून विचारलं !”
“अहो आई, या डिसेंबरला चौदा वर्ष पुरी होतील !”
“काय गं सुनबाई, तुमचा लग्नाआधी आम्हांला अज्ञानात ठेवून फिरायचा तुमचा अज्ञातवासातील प्रेमाचा एक वर्षाचा काळ धरून, का…..?”
“नाही आई, ते वर्ष धरलं तर मग पंधरा होतील !”
“सुनबाई, जरी तुमचा एक वर्षाचा अज्ञातवास लग्ना आधीच संपला असला, तरी तुमची सगळी चौदा वर्षाची शिक्षा भोगून झाल्ये आणि तरी तुला बाबू कोण माहित नाही ?”
“अय्या, म्हणजे तुम्ही विलासला बाबू म्हणता आई ?”
“लवकर कळलं माझ्या बबडीला !”
“आता ही बबडी कोण आणलीत मधेच तुम्हीं आई ? विलासची कोणी माझ्या आधी दुसरी मैत्रीण होती का ?”
“कठीण आहे ! अगं मी माझ्या बबडीला म्हटलं नां ? मग ! ते सगळं सोड आणि मला सांग बाबू उठला का नाही अजून, नऊ वाजून गेले !”
“झोपू दे की जरा त्याला आई, आज रविवार तर आहे !”
“अच्छा, आज रविवार म्हणजे सुट्टी म्हणून झोपू दे म्हणतेस, तर मग आज जेवणाला पण सुट्टी वाटतं ?”
“मला सांगा आई, आत्ता पर्यंत किती रविवार मी तुम्हांला उपाशी ठेवलंय हॊ ?”
“तुझी काय बिशाद मला उपाशी ठेवायची !”
“नाही नां ? मग असं बोलवत तरी कसं तुम्हाला आई ?”
“अगं, एवढ्या उशिरा उठायचं मग अकरा साडेअकराला नाष्टा करायचा आणि दोन अडीचला जेवायचं, हे बरं दिसतं का ?”
“अहो आई, पण रोज तुम्हांला एक वाजता जेवायला मिळतंय नां, मग एक दिवस उशीर झाला तर कुठे बिघडत म्हणते मी ?”
“माझं नाही बिघडत गं, तुझा स्वयंपाक बिघडतो त्याच काय ?”
“स्वयंपाक बिघडतो ? म्हणजे काय आई ?”
“अगं काय आहे, आधीच उशीर झालेला असतो जेवायला, मग तू घाईघाईत स्वयंपाक करतेस आणि मग कधी भाजी तिखट तर कधी आमटी खारट होते, खरं नां ?”
“अहो एखाद्या रविवारी झाली असेल चूक, म्हणून काय लगेच नांव ठेवायला नकोयत माझ्या स्वयपाकाला !”
“मग लग्नाच्या बैठकीत, ‘स्वयंपाक येतो का’ असं मी जेंव्हा तुला विचारलं तेंव्हा अगदी तोंड वर करून कशाला म्हणायचं ‘स्वयंपाकाची भयंकर आवड !”
“बापरे ! इतक्या वर्षांनी हे बरं तुमच्या लक्षात आहे ! आणि हॊ, आहेच मला स्वयंपाकाची भयंकर आवड !”
“बरोबर आहे सुनबाई, पण तेंव्हा बोलतांना तुझी वाक्य रचना थोडी चुकली असावी असं मला आत्ता वाटतंय खरं !”
“कशी ?”
“अगं तुला ‘भयंकर स्वयंपाकाची आवड’ असं म्हणायचं असेल तेव्हा, खरं नां ?”
“अजिबात नाही, तुमचीच ऐकण्यात काही चूक झाली असेल आई !”
“असेल असेल, पण दुसरी एक गोष्ट नक्कीच तू आमच्या पासून इतकी वर्ष लपवलीस, त्याच काय ?”
“कुठली गोष्ट आई ?”
“तुझ्या अंगात देवी येते ते !”
“का sss य, काय म्हणालात तुम्ही? माझ्या अंगात देवी येते ?”
“हॊ ssss य ! आणि तू हे आमच्या पासून इतकी वर्ष लपवून ठेवलस, हे सत्य आहे ! बाबुला तरी माहित आहे की नाही कोण जाणे !”
“आई पुरे झालं आता ! ‘भयंकर जेवणापर्यंत’ ठीक होतं, पण आता हे अति होतंय ! कुणी सांगितलं हॊ तुम्हाला माझ्या अंगात…..”
“अगं कोणी सांगायला कशाला हवंय, मी मगाशीच तुझा DP बघितला आपल्या व्हाट्स अपच्या ‘फॅमिली कट्ट्यावर !”
“DP ? कसला DP ?”
“अगं केस मोकळे सोडून काढलेला तुझा DP आज तू टाकलायस नां, तो पाहून माझी खात्रीच पटली, नक्कीच तुझ्या अंगात…..”
“धन्य झाली तुमची आई ! अहो आज मी न्हायल्यावर लगेच सेल्फी काढून तो DP म्हणून ठेवलाय ! कळलं ?”
“कर्म माझं ! अगं मला वाटलं तुझ्या अंगात बिंगात येत की काय !”
“काहीतरीच असतं तुमच आई ! बरं आता जाऊ का नाष्टा बनवायला ?”
“जाशील गं, पण त्याच्या आधी माझं एक छोटंसं काम कर नां !”
“कसलं कामं आई ?”
“मला पण आपल्या ग्रुपवरचा माझा DP बदलायचा आहे ! तेवढा माझा फोटो काढ आणि आपल्या फॅमिली कट्ट्यावर DP म्हणून टाक आणि मग जा नाष्टा करायला !”
“ठीक आहे आहे आई ! या इथे खुर्चीत बसा आरामात, म्हणजे मी…..”
“अगं इथं नको, किचन मध्ये स्वयंपाक करताना काढ !”
“काय ? अहो मी लग्न होऊन या घरी आले तेव्हापासून तुम्ही किचन मधे कधी पाय तरी ठेवला आहे का ?”
“अगं पण DP मधे जे दिसत ते थोडंच खरं असतं ?”
“म्हणजे ?”
“अगं सुनबाई तुझ्या कुठे अंगात येत, पण मला तसं वाटलं की नाही तुझा DP बघून ? तसंच मी स्वयंपाक करायची नुसती ऍक्शन केली म्हणून कुठे बिघडलं ?”
“नको आई, त्यापेक्षा माझ्या डोक्यात एक भन्नाट पोज आली आहे तुमच्या DP साठी !”
“कुठली गं पोज ?”
“तुमचं जेवणाचं ताट, मी केलेल्या वेगवेगळ्या चमचमित पदार्थांनी भरलं आहे आणि तुम्हीं अगदी समाधानाने त्यावर आडवा हात मारताय ! ही पोज कशी काय वाटते ?”
“चालायला लाग नाष्टा करायला लगेच !”
© प्रमोद वामन वर्तक
१५-०७-२०२२
दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈