सुश्री संगीता कुलकर्णी

 ☆ विविधा ☆ चैत्र गुढीपाडवा ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

सोनपिवळ्या किरणांनी

आले नवीन वर्षे

नवं वर्षाचा हर्ष

मनोमनी दाटे. .!!

निसर्गाचा आदर करण्यासाठी मराठी महिन्यातला पहिला महिना

चैत्र — चैत्र महिना

चैत्र पाडवा… म्हणजेच गुढीपाडवा. मराठी नवीन वर्षातला पहिला सण. हिंदू कालगणनेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात.. नवीन वर्ष, नवीन संकल्प. … चैत्र महिना म्हटला की आपल्या  डोळ्यासमोर येते ती झाडांना फुटलेली पालवी… गुढीपाडव्यापासून सुरु होणारे सण, चैत्र गौरीचे आगमन त्यासाठी अंगणामध्ये रेखाटलेलं सुंदर चैत्रांगण, राम नवमी, अक्षय्य तृतीया… दारावरती लावलेलं झेंडूच्या फुलांचं आंब्याच्या पानांचे तोरण, नवीन खरेदी, घरोघरी उभारलेली गुढी…  एक वेगळ्याच प्रकारची प्रसन्नता वातावरणात असते.

तिच्या स्वागतासाठी अंगणात काढलेली रांगोळी चित्रे म्हणजेच चैत्रांगण..

फाल्गुनाचा निरोप घेत अलगद येऊ घातलेल्या चैत्राचं निर्सगाने केलेलं एक सुंदरस खुलं असं स्वागत. . निसर्गच नाही तर अवघं चराचर चैत्राचं स्वागत करायला उत्सुक असतं.

गीष्मऋतूतही वाळलेल्या झाडाला कोवळा कोंब फुटतो व बघता बघता हिरवाई सळसळते. कोवळ्या पालवीने भारावलेली झाडे वार्‍याचे बोट पकडून डोलू लागतात. रंगीबेरंगी फुले आनंदाने नाचू लागतात. पक्षांचा किलबिलाट सुरू होतो व तो आपल्या कानांना तृप्तीचे काही क्षण देऊन जातो. सृष्टीचा हा नवनिर्मितीचा काळ. .या नवनिर्मितीचे वसंतोत्सवात आगमन होते व सर्वत्र आनंदाची हर्षाची गुढी उभारली जाते..

चित्रा या नक्षत्रावरून वर्षातल्या या पहिल्या महिन्याला चैत्र असं संबोधलं जातं. हिंदू या पंचांगानुसार गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. . अत्यंत शुभ असा दिवस मानला जातो. या चैत्रापासून मराठी नवीन वर्षाला सुरूवात होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतलं मानाचं पानं. म्हणजेच ही गुढी. .!!

ब्रम्हदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली. गुढीपाडवा हे संकल्प शक्तीचे गुढत्व दर्शविते. “आमचे प्रत्येक पाऊल आमच्या समृद्धी करता आता पुढेच पडत राहील ”

असे प्रतिपदा सांगते म्हणून या दिवशी शुभसंकल्प केल्यास तो संकल्प आपल्या जीवनाला फलदायी होतो. याकरिताच सत्य संकल्पाची गुढीची मुहूर्तमेढ रोवायची असते. गुढी म्हणजे नावीन्य, स्वागतशीलता नवनिर्मितीची प्रेरणा उत्साह आनंद. …!!

चैत्र महिन्यांत जर आपण सभोवतालच्या सृष्टीचे अवलोकन केले तर असे लक्षात येत की, शुष्क झालेली सृष्टी, पानांची मोठ्या प्रमाणावर झालेली पानगळ, निष्पर्ण झालेले वृक्ष हे आता चैत्राच्या नव पालवीने फुललेले असतात. वसंत ऋतूची चाहूल ही कोकीळ कंठातून फुटणाऱ्या सु-स्वराने लागलेली असते. निसर्गातल्या परिवर्तनाचा, नवे चैतन्याचे, नवे सृष्टीचे स्वागत दारी गुढी लावून करायचे हा पण त्या मागचा एक उद्देश आहे.

सुगंधी फुले जसं वातावरण सुगंधीत प्रफुल्लित करतात तसं प्रत्येकाच्याही आयुष्यात प्रेमाचा सुगंध मायेचा सुगंध असाच दरवळावा असं यातून सुचित होत असतं. .म्हणून नववर्षाच्या निमित्ताने आपण सर्वांनी नवकल्पनांच्या, नवविचारांच्या उत्तुंग अश्या गुढ्या उभारूया व मंगलमय संस्कृतीचं तोरण बांधूया. ..!

संस्कृतीच्या क्षितीजावर

उजळून आली

नवी पहाट. .!

क्षण मोलाचे

घेऊन आली

पुन्हा नव्याने आयुष्यात..!

क्षण ते सारे

वेचून घेऊ

नववर्षे आनंदे

साजरे करू. ..!!!

दरवर्षी आपण नव्या वर्षाचे स्वागत करतो. नव्या संकल्पना करतो. यंदा निसर्गाशी प्रतारणा न करता पर्यावरणपूरक वागण्याचा संकल्प करूया… निसर्ग प्राणी संपदा यांचे रक्षण केले तरच मानवजातीची आरोग्यदायी गुढी उभी करू शकू…

निसर्गातील बदल सुखावहपणे मानवाच्या समोर आल्हादकपणे ठेवणारा यंदाचा गुढीपाडवा सर्वांनाच आरोग्यसंपदेचं दान देणारा ठरो हीच मनोकामना… !!

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments