सुश्री संगीता कुलकर्णी
विविधा
☆ मी आणि काॅफी… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆
चहा आणि मैत्री
चहा म्हणजे चहा असतो
माझ्यासाठी तुमच्यासाठी
आनंदाचा झरा असतो
चहा आणि मी आमची अगदी घट्ट मैत्री आहे..
माझी दिवसाची सुरुवात चहाने आणि दिवस संपतो सुद्धा चहानेच
एक कप चहा दिवसाची सुरवात किक फ्रेश करतो आणि रेंगाळलेल्या दुपारची मरगळ झटकतो…आणि ह्याच चहामुळे माझे अनेकांशी मैत्रीपूर्ण नाती तयार झाली…
ज्या चहात साखर नाही तो चहा पिण्यात मजा नाही आणि ज्यांच्या जीवनात मैत्री नाही अशा जीवनात मजा नाही असे इथे मनापासून नमूद करावेसे वाटते..
चहामुळे मित्र मैत्रीणी जमले आणि आपण चहाबाज झालो अशाच सर्वांच्या भावना असतात नाही का..!
“चला रे जरा चहा घेऊ या किंवा चला रे मस्त कटिंग चहा घेऊन या” असे म्हणत जमलेले मित्र-मैत्रिणी आणि चहाची टपरी हा जसा माझा हळवा कोपरा आहे ना तसा अनेकांचा ही हळवा कोपरा असतो आणि जर बाहेर मस्त पाऊस पडत असेल तर…
पाऊस पडत असताना
अजून हव तरी काय
एक कटिंग चाय
चवदार चहाचा सुगंध दरवळतो तसं आपणही दरवळाव. जीवनाचा आनंद कसा चहाच्या भरल्या कपा प्रमाणे भरभरून घ्यायला हवा, ताजा ताजा.. चहाच्या प्रत्येक घोटा बरोबर आपणही ताजं व्हाव…
आयुष्य कसं चहाच्या रंगा सारखं असावं… प्रत्येक रंग हवा…! नवनवीन नाती जोडावीत. भरपूर मित्र असावेत म्हणजे तुमचा चहाचा ग्लास जरी रिकामा झाला तरी आठवणींचा ग्लास कायम भरलेला राहील…
माझ्यापुरतं सांगायचं झालं तर चहा घराचा असो की बाहेरचा.. माझ्या अनेक चांगल्या आठवणी या चहाच्या कपाशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि अनेक जीवाभावाची मित्रमंडळीही बरं…!
कॉलेजच्या दिवसातली सर्वात जास्त मिस होणारी गोष्ट म्हणजे टपरीवरचा चहा… एक कटिंग चारजणांत पिण्याची मजा परत काही आली नाही…!
आयुष्यात किती कप चहा प्यायली असेल मी कुणास ठाऊक…! अगदी उडप्याच्या हॉटेलातल्या दुधाळ चहापासून ते तारांकीत हॉटेलमधल्या स्टाईलमारू चहापर्यंत. गावोगावच्या टपऱ्यांवरच्या चहापासून रेल्वेतल्या चहा पर्यंत…
मैत्रीचे वय वाढत गेले….चहाच्या टपरीचे रुपडेही बदलले.. बदलत गेले
चहाची चव आणि प्रकारही बदलले बदलत गेले.. आता तर चहाच्या कपाची साईजही बदलली आहे पण वाफाळता चहा आणि
मित्र-मैत्रिणींचा गप्पाचा रंगलेला फड याची लज्जत मात्र कधीही बदलणार नाही हे नक्कीच…!
जिभेवर रेंगाळणाऱ्या चहाच्या
चवीशी इतर कुठल्याही पेयाशी तुलना होणार नाही…!
© सुश्री संगीता कुलकर्णी
लेखिका /कवयित्री
ठाणे
9870451020
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈