श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? स र प्रा ई ज ! ?

सकाळचा नेत्र सुखद मॉर्निंग वॉक…… याच्या पुढचं, हे चौथे चं म त ग असल्यामुळे तुम्हांला एव्हाना पाठ झालेलं असणारच, अशा माझ्या खात्रीलायक (?) समजूतीतूनच आजच हे चं म त ग सादर करतोय !

तर नेहमीप्रमाणे सोफ्यावर पेपर वाचत, बोक्या सारखा (कोब्रा असल्यामुळे डोळ्याचा रंग त्याच्या डोळ्याशी मिळता जुळता असणारच!) तो जशी दुधाची वाट बघत बसतो तसा, एक डोळा किचनकडे ठेवून, बायकोच्या हातच्या पहिल्या गरमा गरम चहाची वाट बघत बसलो होतो ! पण दहा मिनिट झाली तरी जमीन हादरली नाही !  मग मीच पेपर पुन्हा पुन्हा उघडझाप करून त्याचा आवाज किचन मधे ऐकू जाईल इतपत करून बघितला !  तरी पण टाचणी पडून त्याचा सुद्धा आवाज ऐकू येईल इतकी किचन मधे शांतता ! आता हा pin drop silence आपल्या भाषेत कोणी आणला, हा संशोधनाचा विषय होऊ शकेल, कारण माझ्या मते अशी एखादी टाचणी खरंच जमिनीवर टाकून, त्याचा कोणी आवाज ऐकला असेल, यावर शेंबड पोर पण विश्वास ठेवणार नाही ! असो ! साहेब जाताना ज्या अनेक गोष्टी सोडून गेला त्यातलीच त्याची ही एखादी पिन मागे राहिली असावी, असा आपला माझा अंदाज ! यावर पिना मारण्यात पटाईत लोकंच जास्त पिना, सॉरी (हा आणखी एक साहेबाने आपल्याला बहाल केलेला तोंडाचा दागिना !) प्रकाश टाकू शकतील, या विषयी माझ्या मनांत कसलीही शंका नाही ! तुम्हांलाच काही शंका असेल तर स्वतःच एखादी पिन टोचून, सॉरी, जमिनीवर पाडून तिचा आवाज येतोय का ते बघा आणि मला कळवा म्हणजे झालं !

आता चहासाठी बायकोला स्वतःहून बोलावण्याशिवाय माझ्या समोर काहीच पर्याय नव्हता, कारण सकाळचा पहिला चहा पोटात गेल्याशिवाय पुढची ‘सगळीच आन्हीक शब्दशः अडकणार होती’ ! शेवटी, मी जशी रडणाऱ्या लहान मुलाची ज्या आवाजात समजूत काढतात, तो आवाज माझ्या गळ्यातून काढायचा प्रयत्न केला आणि “अगं ऐकलस का, मला जरा च…….” माझा हा उच्चारायच्या आत बायको कधी नाही तो ट्रे मधे चहा बरोबर, माझ्या आवडत्या गूड डेच्या बाजूला उपम्याची डिश अशा सरंजाम्यात माझ्या समोर हसत हसत हजर झाली ! काय सांगू तुम्हांला मंडळी, माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना ! आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे, with Rayban गॉगल अशी माझी अवस्था झाली ! “अहो, सॉरी हं !” बघा मगाशीच मी म्हटलं नां, साहेबाने दिलेला तोंडाचा दागिना, लगेच हिच्या मुखातून माझ्यासाठी कधी नव्हे तो पहिल्यांदा बाहेर पडला ! मी पण वरकरणी “अगं सॉरी कशाला म्हणायला हवं, रोज तू मला न मागता लगेच चहा आणून देतेस आणि आज एक दिवस उशीर…..” “देते हो, पण म्हटलं आज तुम्हाला थोडं ट्रे मधून surprise पण द्यावं, म्हणून उशीर झाला !”

आता मला सांगा, मी आज मला मिळालेल्या पहिल्या टीच्या, ट्रे ट्रीटमेंटच्या सरप्राईज मधून अजून सावरलो नव्हतो, तर बायको म्हणत होती तुम्हाला आज सरप्राईज द्यायचं ठरवलं आहे म्हणून ! अरे बापरे, आता हे तिचं आणखी नवीन सरप्राईज माझ्या खिशातल्या पाकिटाला किती जड जाणार आहे, असा मनांत विचार करत “कसलं गं सरप्राईज ?” असं म्हणत चहाचा कप हातात घेऊन एक घोट घेतला आणि तोंडातून नकळत खरोखरचा “व्वा !” आला. त्याला कारण आजच्या चहाची चव खरंच अमृततुल्य होती ! माझा “व्वा” ऐकून बायकोने माझ्या मागे येवून माझ्या गळ्यात लाडाने हात टाकले ! “अगं मुलं मोठी झाली आपली आता आणि तू असं…” “आई येणार आहे पंधरा दिवस रहायला !” तिचे ते शब्द मी पीत असलेल्या गरम चहा सारखे माझ्या कानात गरमा गरम शिरले आणि मी “काय s s s s ?” असं तितक्याच गरम आवाजात उच्चारता झालो ! “म्हणजे ?” “अगं तसं नाही, मला ‘कधी’ म्हणायचं होतं, पण चुकून ‘काय’ असं आलं तोंडातून !” “मग ठीक आहे !” असं म्हणत ती माझ्या समोर येवून बसली. माझा शब्दखेळ बहुतेक तिच्या पचनी पडला असावा असं समजून मी परत एकदा “कधी येणार आहे आई ?” असं जमेल तितक्या मऊ मुलायम स्वरात तिला विचारलं. “या पंधरा तारखेला आणि तीस तारखे पर्यंत परत जाणार आहे !” बायको मला आनंदाने सांगती झाली. “अगं पण तेंव्हा तर आपण दोघ महाबळेश्वरला जाणार आहोत !” मी पुडी सोडून दिली. “काय s s s ? हे कधी ठरलं, तुम्ही मला काहीच सांगितलं नाहीत महाबळेश्वरच्या या आपल्या प्लॅन विषयी !” “तूच नेहमी सरप्राईज द्यायच असं थोडंच आहे, कधीतरी या पामराला तो चान्स मिळू दे की !” मी हसत हसत गुगली टाकली.

त्यावर लटक्या रागाने खूष होऊन बायको मला विचारते कशी “हे मधेच काय तुम्ही महाबळेश्वरचे काढलंत आणि ते सुद्धा मला मेलीला जराही थांगपत्ता न लागू देता ! अगदी कमालच झाली बाई तुमच्या या अनोख्या सरप्राईजची !” “अगं कमाल वगैरे काही नाही ! बँकेने नवीन हॉलिडे होम बांधलं आहे महाबळेश्वरला आणि पेन्शनर लोकांना पण त्याचा स्वस्तात लाभ घेता येतो असं परवाच मला लेल्या म्हणाला.” “असं होय, नाहीतर सिझनमधे तिथल्या हॉटेलात रहाणं म्हणजे कठीणच होतं आपल्याला.” “अगं म्हणून तर चांगल पंधरा दिवसाचं बुकिंग केलय आपल्या दोघांच !” “नाही, पण बुकिंग confirm आहे नां आपल्या दोघांच ?” “म्हणजे काय, तू काळजीच करू नकोस, बिनधास्त लगेच तयारीला लाग !” असं म्हणून उरलेला चहा मी संपवला आणि ओला नारळ आणि कोथिंबीरीने सजलेली उपम्याची डिश हातात घेतली ! ते बघून, “मी आलेच हं आईला फोन करून !” असं अत्यानंदाने घोषित करून बायको बेड रूम मधे पळाली पण ! ते बघून मी सुटकेचा निश्वास टाकला. आता तुम्ही मला विचाराल सुटकेचा निश्वास का टाकला तुम्ही ? तर काय सांगू तुम्हांला मंडळी, आमच्या सासूबाई म्हणजे मोठं खटलं आहे ते ! अतिशय कर्मठ, या कलियुगात पण सोवळ ओवळ पाळणाऱ्या, इतकं की सकाळी अंघोळ झाल्याशिवाय कुणीही चहाच काय, पाणी पण प्यायचं नाही असा त्यांचा दंडक ! या वरून तुम्हांला कल्पना येईल की मी सुटकेचा निश्वास का टाकला ते !

मी बायको आत गेल्याचे बघून उपम्याचा पहिला घास घेणार इतक्यात, बायको हातात मोबाईल घेऊन बाहेर आली आणि मला म्हणाली “अहो आईचा नंबर बदलला आहे का ? लागत नाहीये !” “अगं मला कसं माहित असणार तुझ्या आईचा नंबर बदलला असेल तर ? ती तुलाच आधी सांगेल नां ?” त्यावर थोडं वैतागून मला म्हणते कशी “अहो माझ्या आईचा नंबर मला तोंड पाठ आहे, तो अजिबात बदललेला नाही, कळलं ? मी तुमच्या आईचा मोबाईल नंबर बदलला आहे का असं विचारत्ये ?” मी पण तेवढ्याचं शांतपणे तिला म्हटलं “नाही गं, माझ्या आईचा पण जुनाच नंबर आहे, कळलं ! अगं पण माझ्या आईचा मोबाईल नंबर कशाला हवाय तुला ?” यावर ती तितक्याच थंडपणे मला म्हणाली “अहो असं काय करता, तुमची आई येणार होती नां आपल्याकडे पंधरा दिवस रहायला ? पण आता आपण तेंव्हा तर महाबळेश्वरला असणार, मग तिला तसं सांगायला नको का, आत्ता येऊ नका, नंतर कधीतरी या म्हणून ?” तीच ते बोलणं ऐकून, माझ्या पहिल्या वहिल्या उपम्याच्या घासाचा चमचा, माझ्या ओठाजवळ येता येता, हवेतल्या हवेत राहिला आणि बायकोच्या या कुटील सरप्राईज मुळे त्याच अवस्थेत मी फक्त बेशुद्ध व्हायचा बाकी राहिलो !

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments