सौ.वनिता संभाजी जांगळे

 

🌸 विविधा 🌸

☆ छावणी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

दिवे लागणीची वेळ होती. मी गॅलरीत उभे राहून समोर अथांग पसरलेली वनराई पहात होते. बर्‍यापैकी अंधारून आले होते. पानगळ झालेल्या झाडांतून पलिकडे कैगा धरणावरील (कर्नाटक) दिवे लुकलुकताना दिसत होते. डोंगराआडून चंद्राची स्वारी डोकवत येत होती. आकाशात एक एक चांदणी उगवत आपली हजेरी लावत होती.  दोन दिवसातच पौर्णिमा असल्यामुळे चंद्राची,  टपोऱ्या चांदण्यांची रूपेरी चादर हिरव्या झाडांवर पसरली होती.

दिवसभराची किलबिल घरट्यात विसावून शांत झाली होती. नाहीतरी विविध पक्षांचे वेगवेगळे आवाज ऐकून कान तृप्त होतातच. आपल्या गावापासून, माणसांपासून दूर असल्यामुळे मनात निर्माण झालेली हुरहूर, त्यांच्या दूर असण्यामुळे मनाला  जाणवणारी उणीवेची भावना पक्षी, प्राणी, घनदाट पसरलेली ही हिरवीगार वनराई यांच्यामुळे  काहीशी कमी होते  हे ही तितकेच खरे .

कैगा धरणापासून दोन कि.मी. अंतरावर आमची छावणी होती. एका डोंगराच्या पायथ्याला वसलेली. समोर दूरवर पसरलेला निसर्ग म्हणजे ‘देवाने सढळ हाताने रेखाटलेली अतिसुंदर चित्रकृतीच. उंच उंच डोंगर, दऱ्या-खोऱ्यातून पसरलेली हिरवाई पाहून मन सुखावते, तृप्त होऊन जाते.

आजही मी अशीच टपोऱ्या चांदण्यात उजळलेला निसर्ग पहात  उभी होते. गॅलरीतून पहाता पहाता समोरून अनशी घाटातून उतरत असलेल्या वाहनांच्या दिव्यांचे प्रकाश झोत  दिसले  आणि गावाकडे जाणारा रस्ता डोळ्यांसमोर उभा राहिला.  एकदम मन उदास झाले. या घाटातूनच आम्ही आमच्या गावाकडे ये जा करत असतो..

आमचे छावणीतले जीवन आणि गाव यात किती फरक असतो नाही, या विचाराने मन हेलावून गेले. माझे पती पंधरा दिवसांसाठी आऊट ड्युटीवर गेले होते.  मी आणि माझी मुलगी,  आम्ही दोघीच होतो. मनात आले आपल्या गावापासून दूरवर प्रत्येक जवान असे कितीतरी डोंगर ओलांडून जात, येत असतो.  देशासाठी प्रवास करत असतो. छावणीत आपला परिवार आणतो, आपला संसार थाटतो. कधी येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर, परिस्थितीवर मात करत परिवार सांभाळतो.  कधी तर अशी परिस्थिती येते की ,  नोकरी एकीकडे असते तर  परिवार दुसरीकडे असतो. पण तो येणाऱ्या प्रत्येक संकटास धैर्याने तोंड देतोच. ना कधी देशसेवेत कमी पडतो ना कुंटुबाच्या कर्तव्यात कमी पडतो..  प्रत्येक  जवान देश आणि आपला परिवार अशी दोन्ही कर्तव्ये अगदी व्यवस्थित पार पाडत असतो..

कधी आउट ड्युटीवर परिवार सोडून बाहेर जावे लागले तर जवानाच्या अर्धांगिनीला आपल्या मुलांसाठी हिरकणी व्हावेच लागते.

छावणी हा मात्र जवानाचा विसावा असतो. देशाच्या विविध राज्यांतून, कित्येक गावातून येणारे जवान आणि त्यांचे  परिवार मिळून  आमची छावणी होते.  वेगळी भाषा, वेगळे पेहराव , वेगवेगळे खाणे-पिणे, आचार,विचार  अशी कितीतरी गोष्टींत विविधता असते. हीच आमची विविधतेतून एकता दर्शवणारी आमची भावकी. छावणीच्या गेटमधून आत येताच इथे प्रत्येकांत आपलेपणाची भावना असते. घर सरकारीच असते पण ते’ माझे घर ‘ आहे अशी आपलेपणाची भावना छावणीत येताच प्रत्येकाच्या मनात निर्माण होते. नाती रक्ताची नसतात, पण अडी-अडचणीत  एकमेकांना साथ देणारी, एकमेकांसाठी धावून जाणारी असतात. सण,  उत्सव सगळे मिळून साजरे करतात. एकमेकांच्या विविध सण उत्सवात सर्वजण एकत्र येतात, मिळून सण साजरे करतात. असे विविधतेतही एकोप्याचे , एकात्मतेचे वातावरण छावणीच निर्माण करू शकते. आपण गावाकडे एका गावात एका भावकीत सुद्धा असे मिळून-मिसळून, एकोप्याने  रहात नाही . मनात इर्षा,  वैरभाव ठेवून रहातो, तसेच वागतो . पण छावणीत येताच छावणी एकीने रहायची शिकवण देते. तीन – चार वर्षांत बदली होते.  जिवाभावाचे नाते निर्माण झालेले लोक दूर जातात. एकमेकांचे निरोप घेता-देताना कुणी आपलेच जवळचे दूर जातेय या भावनेने मने कष्टी होतात, प्रत्येकाचे काळीज पिळवटून जाते. . निरोपाच्या वेळी खोलवर मनात रुतून बसणारे दुःख होते. तीन-  चार वर्षांनी येणाऱ्या बदल्या, पुन्हा नवीन राज्य, नवा प्रदेश, नवा गाव, हवा,  पाणी,  संस्कृती, भाषा सगळे काही नवं, निराळे.  छावणी जाणाऱ्याला जड अंतःकरणाने  निरोप देते. येणाऱ्याचे आनंदाने स्वागत करते. पण प्रत्येक  जवानाला या सगळ्यांशी जुळवून घेत नवी छावणी शोधावीच लागते.

प्रत्येक जवान या छावणीत रूळत असला तरी एक स्पष्ट करावे वाटते. देशासाठी लढणारा जवान हा आपल्यामागे आपले आई-वडील, भाऊ, बहिण,  कितीतरी जिवाभावाची माणसं  सोडून आलेला असतो. पण आपल्या घरापासून ते गल्लोगल्लीतला आख्खा गाव, दूर आलेल्या जवानाच्या डोळ्यांत सदा उभा असतो, दाटून राहिलेला असतो हे ही खरे आहे. मायभूसाठी लढण्याचे बळ, जन्मभूमीकडे परत येण्याच्या सुखद हिंदोळ्यातूनच मिळते. आख्खा गाव नजरेत भरून छावणीत राहणाऱ्या जवानाला, त्याचा गाव किती आठवणीत ठेवत असतो हे गावच जाणत असेल.

किती वेळ मी छावणीच्या विचारचक्रात गॅलरीतच उभी होते. समोरच्या घाटातून गावाकडे जाणारा रस्ता पहात माझाही गाव आठवणीच्या हिंदोळ्यात मनात रुंजी घालत होता. इतक्यात रात्रपाळीला जाणाऱ्या एका जवानाला खिडकीतून “बाय बाय “केलेला आवाज कानावर आला आणि मी विचारातून भानावर आले.

मनाला मात्र एक सत्य स्पर्शून जाते की ही छावणी हेच आपले गाव, इथले सदस्य, इथले परिवार हेच सगे-सोयरे, आणि हीच नातीगोती. या घनगर्द जंगलातील प्राणी, उंच उंच गगनाशी भिडणाऱ्या झाडे- वेली, आनंदाने बागडणारे पक्षी हेच आपले जीवन. कधी इथली छावणी  आपली होऊन गेलेली असते तर कधी दुसर्‍या ठिकाणची छावणी.……

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा , जि. सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments