श्री विनय माधव गोखले
विविधा
☆|| जय गिरनारी – एक यात्रा || ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆
(1) ‘गोरख’शिखर, ‘गुरु’शिखर आणि ‘अंबा माता’ शिखर (घंटा) (उजवीकडून डावीकडे) (2) सोमनाथ मंदिर (समोर सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा दिसत आहे)
गुजरातमधील ‘सोमनाथ’ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक देवस्थान आणि ‘गिरनार’ हे दत्तात्रेयांचा वास असलेले जागृत गिरीस्थान हयापलीकडे मला दोन्हीबद्दल कणमात्रही माहिती नव्हती. बरेच लोक तिकडे जाऊन आल्यावर त्यांच्याकडून काही माहिती कानी पडायची “खूप भारी आहे…” वगैरे. पण ती तितक्याच त्वरेने एका कानाने ऐकून दुसर्या कानाने विसरून जायची. काही वर्षांपूर्वी माझी आई व आत्या ‘सोमनाथ’ला जाऊन आल्यामुळे तिकडील काही फोटो पहायला मिळाले होते. परंतु मी स्वत: कधी उठून तिकडे जाईन असे कधी वाटले नव्हते… तेही एप्रिलच्या रणरणत्या उन्हाळ्यात आणि तेही सुट्टीच्या सीजनला, रेल्वेची टिकीटे सर्व फुल्ल असताना आयत्या वेळेला बुकिंग करून…
पण म्हणतात ना, योग जर असेल तर सर्व गोष्टी आपोआप जुळून येतात. आमचेही थोडेफार असेच झाले. रेल्वेची प्रतीक्षा यादीत खोलवर असलेली तिकिटे अगदी आदल्या दिवशी RAC / CNF होत गेली आणि पाहतापाहता मित्र गणेश दाबक, धनंजय जोशी हयांसोबत मी बुधवार १३एप्रिल रोजी रात्रौ ८:३० च्या पुणे-अहमदाबाद रेल्वे मधून निघालो सुध्दा…
सकाळी ७:३० ला अहमदाबाद स्टेशन आल्यावर फलाटावरील स्टॉल वर ताजा ढोकळा, त्यावर गोडसर कढी, सामोसे आणि चहा असा चविष्ट नाष्टा झाला. तासाभराने जबलपूरहून आलेल्या ‘सोमनाथ’ च्या ट्रेन मध्ये बसलो. जूनागढ स्टेशन जवळ येत असतानाच आम्हाला गिरनार शिखरांचे “दुरून डोंगर साजरे” असे छान दर्शन झाले. आकाशात उंचचउंच घुसलेली शिखरे बघून खरे तर छाती दडपून गेली होती.
संध्याकाळी ६ वाजता सोमनाथला पोहोचलो. छोट्या टुमदार रेल्वे स्टेशनातून रिक्षाने बाहेर पडल्यावर एक म्हातारा रिक्षावाला सामोरा आला. तो जरा नियम पळून सावकाश रिक्षा चालवेल ह्या विचाराने त्याच्याबरोबर बाहेर आलो. त्याची रिक्षाही जवळपास त्याच्याच वयाची होती. पण गियर टाकून सुरुवातीलाच बुवांनी मेन रोड वर ट्राफिकच्या उलट दिशेने रिक्षा वळवल्यावर आमच्या भुवया वर गेल्या. दहा मिनिटातच सोमनाथ मंदिराच्या मागील ‘कृष्णा’ हॉटेलमध्ये मुक्कामी पोहोचलो.
(1) सोमनाथचा समुद्रकिनारा व डाईक्स (2) १०,००० किमी समुद्र असल्याचे दर्शवणारा बाणस्तंभ
चहा-आंघोळ आवरून मंदिरात पोहोचेपर्यंत ‘सोमनाथा’ची आरती सुरू झाली होती. मोठ्या आवाजात ढोल लयबद्ध वाजत होते, त्यामुळे मंदिरात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. शेवटीशेवटी द्रुत लयीत गजर होऊन आरती संपली. संध्याकाळाचा छान समुद्री वारा खात आम्ही त्या विस्तीर्ण मंदिराभोवती एक फेरफटका मारला. तिथेच आम्हाला ‘दिशादर्शक बाण’ पहायला मिळाला जो हिन्दी महासागरात १०००० किलोमीटर जमीन नसल्याचे दर्शवितो. गर्दी असूनही सगळीकडे निखालस स्वच्छता आणि चोख व्यवस्था होती.
आरतीनंतर मंदिरामागेच ‘लेजर शो’ झाला ज्याला दमदार commentary दस्तूरखुद्द अमिताभ बच्चन ह्यांची होती. पुराणकाळापासून ते सोन्याचांदी-हिरेमाणकाने मढवलेले सर्वात वैभवशाली मंदीर बनेपर्यंत पासून ते गझनीचा मुहम्मद व इतर मुघल आक्रमकांनी अनेकवेळा लुटलेले, ते आधुनिक काळापर्यंत पुनर्बांधणी करून सरदार पटेलांनी उभारलेले, असा सर्व चित्र-इतिहास जवळजवळ सहा-सात मजले उंच अशा त्या भव्य मंदिरावरच लेझर ने प्रोजेक्ट केलेला पाहणे आणि ऐकणे हा खूपच छान अद्भुत अनुभव होता…कुणीही चुकवू नये असा!
‘लेजर शो’ संपल्यावर आम्ही शंखांच्या दुकानात फिरायला गेलो. चांगल्या शंखांच्या किमती रु. १३००-१५०० च्या पुढेच होत्या. आत्ताच खरेदी केला आणि नंतर घरी रोजच्यारोज वाजवला नाही तर बायको शंख करेल, अशी एक भीतीही मनाला चाटून गेली. कधीकाळी दक्षिणेत ‘रामेश्वर’ला जाऊ तेव्हा सस्त्यात खरेदी करू, असे मनाशी ठरवून विचार रद्द केला.
दुसर्या दिवशी सकाळी उठलो आणि आवरून होटेलच्या मागेच असलेले अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले मूळ दगडी शिवमंदीर पहायला गेलो. दर्शन घेऊन परत येताना छोट्या गल्लीमधील एका नाश्त्याच्या गाडीवर थांबून जिलेबी, ढोकळा, फाफडा असा फक्कड गुजराती नाश्ता केला.
हॉटेल मालकास एव्हाना सुपरिचित असलेल्या धनंजय जोशींनी (त्यांची ही २८ वी गिरनार भेट होती!) आदल्या दिवशी ठरवल्याप्रमाणे ठीक ११ वाजता ‘बाबू’ रिक्षावाला हॉटेलात हजर झाला. आम्हा तिघांना घेऊन मग त्याने जवळपासच्या मंदिरांचा फेरफटका मारून आणला. त्यामध्ये ‘त्रिवेणी संगम’, ‘गोलकधाम मंदीर’, ‘सूर्य मंदीर, ‘हनुमान मंदीर, ‘श्रीराम मंदीर, ‘शशीमोचन महादेव’, ‘पाटण प्रभास’, ‘भालका तीर्थ’ ह्यांचा समावेश होता.
(1) ‘अंबा माता’ मंदिर (2) श्रीकृष्ण चरण पादुका (3) भालका तीर्थ (क्षमायाचक भिल्लास अभय देताना श्रीकृष्ण)
कपिला, हिरण आणि सरस्वती (लुप्त) ह्या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर घाट आहे आणि काही sea gull पक्षी उडत होते. ते सूर मारून तुमच्या हातातील खाऊ उचलून नेतात. त्यांना भरवण्यासाठी आम्ही बिस्किटेही घेतली पण उन्हे वाढली असल्याने पक्ष्यांनी आमच्याकडे चोचही न फिरवून सपशेल दुर्लक्ष केले. मग तिथल्याच एका धष्टपुष्ट गीर गाईला आम्ही बिस्किटे खिलवून टाकली.
‘गोलकधाम मंदीर’ इथून हिरण नदीचे छान दर्शन घडते. इथे श्रीकृष्ण मंदिरामध्ये गीतेचे संपूर्ण अठरा अध्याय कोरलेले आहेत. ह्यास्थानी भगवान श्रीकृष्णांनी मृगयेस आलेल्या भिल्लाच्या हातून स्वत:च्या पावलास तीर मारवून घेऊन आपला अवतार समाप्त केला, अशी आख्यायिका आहे. इथे त्यांच्या चरण पादुका आहेत. तसेच बंधू बलरामांनीही इथे आपला अवतार समाप्त केला असे मानतात. मागल्या बाजूस श्रीकृष्ण आणि बलराम यांचे पाळणाघरही बघायला मिळते.
इथून पुढे सूर्यमंदीर पाहून आलो. बर्यापैकी मोडकळीस आलेले दिसले. एकंदरीत सर्व जी मंदिरे होती ती पुराणकाळातील आख्यायिकांशी निगडीत आणि जुनी होती. श्रीराम मंदीर आणि ‘भालका तीर्थ’ फक्त आधुनिक काळातील बांधलेले वाटले. असो.
‘भालका तीर्थ’ इथून रिक्षा पळवली ती थेट सोमनाथ रेल्वे स्टेशन कडे. १२:३० च्या रेल्वे ने निघून अडीच तासांत आम्ही पोहोचलो ते जुनागढला. हॉटेल ‘मंगलम’ इथे छान गुजराती थाळी जेवून थोडा वेळ हॉटेल रूममध्ये विश्रांति घेतली. आमच्या हॉटेल रूममधून ‘उडनखटोला’ (मराठीत ‘रोप वे’) वर-खाली करताना दिसत होते. आम्हाला आता पुढील वेध लागले होते ते म्हणजे ‘गिरनार’चे चढाईचे…
संध्याकाळी साडेचारच्या सुमारास आम्ही हॉटेल लॉबीमध्ये जमलो. बाहेरच ट्रेकिंगसाठी काठ्या भाड्याने मिळाल्या. त्या घेऊन जवळच असलेल्या सुसज्ज अशा उडनखटोलाच्या तळस्थानकाला चालत पोहोचलो. मात्र तिथे सिक्युरिटीने आमच्या ब्यागांमधील पाण्याच्या सर्व बाटल्या काढून फेकून द्यायला लावल्या. अर्थात आतमध्ये पाण्याच्या बाटल्या विकत मिळत होत्या.J लवकरच उडनखटोलाच्या पाळण्यात बसून आम्ही झर्रकन निघालो. चांगल्यापैकी वेगाने खेचत वरवर जात होतो. खालून पायर्यांचा मार्ग दिसत होता अर्थात ह्या वेळेस फारसे कुणी दिसले नाहीत.
साधारण दहा-बारा मिनीटातच आम्ही ‘अंबा माता’ मंदिरापाशी पोहोचलो. फारशी गर्दी नसल्याने छान दर्शन झाले. खाली जाणार्यांसाठी सहा वाजता पाळण्याची शेवटची फेरी असल्याचे स्पीकरवर ओरडून सांगत होते.
प्रथम पंक्ति (1) उडनखटोलेवाले राही (2) गोरख शिखरावरून दिसलेले गुरुशिखर, मागे लक्ष्मी शिखर, तळाशी धुनी आणि आकाशात पौर्णिमेचा चंद्र
द्वितीय पंक्ति (1) गुरुशिखर (2) चंद्र आहे साक्षीला (3) पुणेकर ‘गिरनारी’ कुटुंबीय
वीसपंचवीस मिनीटानी आम्ही पुढील म्हणजे ‘गोरख’ शिखराकडे निघालो. इथे वारा एकदम भन्नाट होता, त्यामुळे उकाडा अजिबात जाणवत नव्हता. साधारण अर्ध्या-पाऊण तासात आम्ही तिथे पोहोचलो. गोरखनाथांचे वास्तव्य असल्याने ह्या स्थानाला विशेष महत्व आहे. इथे एक धुनी कायम प्रज्वलित असते. इथेच आम्हाला घोलप नावाचे चिंचवडला राहणारे एक भक्त भेटले. ते आले की तीन-तीन महीने इथे यात्रिकांच्या सेवेसाठी म्हणून शिखरावर वास्तव्याला असतात. बोलताबोलता त्यांनी ‘गुरुशिखरा’चा उल्लेख ‘हेडक्वार्टर’ असा केला ते विशेष वाटले.
पुढे गुरुशिखराकडे प्रयाण केले. ह्या पायर्या प्रथम खाली उतरून नेतात आणि मग गुरुशिखराकडे चढत नेतात. अर्थात इथेही एखाद्या गडावर बघायला मिळतो त्याप्रमाणे पायर्यांच्या कडेला भक्तमंडळींनी प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या टाकून कचरा केलेला दिसत होताच. एव्हाना संध्याकाळ व्हायला लागली आणि पायर्यांच्या बाजूचे दिवे उजळल्याने पुढची मार्गक्रमणा सोपी झाली. शिवाय थोड्या वेळात पौर्णिमेचा चंद्र उगवल्याने शिखरे प्रकाशमान दिसू लागली.
‘गुरुशिखरा’पाशी पोहोचायला साधारण एक तास लागतो. सुदैवाने इथेही फारशी गर्दी नसल्याने ‘चरण पादुकां’चे पाच-एक मिनिटे शांत आणि पवित्र वातावरणात छान दर्शन घडले. हा आमच्या यात्रेचा मिटल्या डोळ्यांनी आपले अस्तित्व विसरायला लावणारा, एक विलक्षण आनंदाची अनुभूती देणारा क्षण होता. मंदिरातील साधूने कपाळाला गंध लावल्यावर आम्ही मंदिरातून बाहेर पडलो व पायर्या उतरायला लागलो. तिथेच जगन्नाथपुरी वरून आलेले एक जटाधारी ‘चिलीम’ साधू भेटले. त्यांच्याशी आध्यात्मिक, राजकीय, रशिया-युक्रेन युध्द, पुरीचे मंदीर, भविष्य अशा विविध विषयांवर काही विलक्षण गप्पा झाल्या.
तिथून मग परतीच्या प्रवासास सुरुवात केली. तत्पूर्वी एक टप्पा पार करायचा होता तो म्हणजे ‘धुनी’. ह्यासाठी मधूनच दुसरीकडे पायर्या उतरून जावे लागते.
उतरायला सुरुवात केली आणि तेवढ्यात आमच्या मागून कुणीतरी धडपडल्याचा आणि पाठोपाठ बायका ओरडल्याचा आवाज आला. वर जाऊन पहिले तर आमच्याबरोबरच्या कुटुंबातील बाई आणि त्यांची आठ-नऊ वर्षांची मुलगी अशा दोघी पाय सटकून चांगल्या दहा-बारा पायर्या गडगडत खाली आल्या होत्या. मुका मार चांगलाच लागला होता पण सुदैवाने कुणाला हाड फ्राक्चर वगैरे काही झाले नव्हते. त्यांना मग ‘धुनी’पर्यन्त उतरवले आणि तिथे थोडा प्रथमोपचार मिळाला. धुनीचे दर्शन घेऊन मग तिथेच जेवण-वजा प्रसाद घेतला. आता अंधारात परंतु दिव्यांच्या प्रकाशात परतीचा प्रवास करायचा होता तो ‘गोरख शिखर’ आणि नंतर ‘अंबा माता’ मंदिरांकडे.
गणेश आणि मी त्या मायलेकींना काठीचा आधार देत सर्वांच्या पुढे निघालो. आणि बोलण्यामध्ये गुंतवत असे उतरवले की त्यांना वेदनेचा विसर पडावा. शक्यतो न थांबता उतरत राहिलो. गोरख शिखरापाशी पोहोचल्यावर एक चहावाला सर्वांना सेवा म्हणून चहा देत होता. आता उतरणार्यान्पेक्षा चढणार्यांची संख्या वाढू लागली होती. परंतु कुठेही गर्दी होत नव्हती की ढकलाढकलीही होत नव्हती. एकमेकांना “जय गिरनारी” असे प्रोत्साहन देत सर्वजण उत्साहात पायर्या चढत किंवा उतरत होते. वाटेत पाण्याचे बाटल्या, लिम्बू सरबत,चहा-कॉफी वगैरेंची दुकाने लागतात त्यामुळे थकावट दूर होत होती. वृद्ध, वयस्कर मंडळींना पायर्या चढणे सोपे नव्हते पण तरीही निर्धाराने सर्वजण चालत होते. यात्रिक मंडळी बरीच मुंबई –पुण्याकडची असल्याने कानावर मराठीच जास्त पडत होते. मुंबईमधील एक दाम्पत्य त्यांच्या तरूण पण आंधळ्या मुलीला घेऊन आले होते. वडिलांच्या पाठीमागून त्यांच्या खांद्यावर हात ठेवून ती पायर्या उतरत होती. मात्र उन्हामुळे व अतिश्रमामुळे कदाचित तिला पित्ताचा त्रास व्हायला लागला. दुकानासमोरच्या एका बाजेवर निजवल्यावर तिला बरे वाटले.
आम्हाला ‘अंबा माता’ मंदीरापासूनच्या ५००० पायर्या उतरायला जवळपास चार तास (रात्रीचे १०:४० ते पहाटे २:४०) लागले. पायाचे आणि पावलांचे अगदी तुकडे पडायची वेळ आली होती. संध्याकाळी हेच अंतर पाळण्यात बसून अगदी आरामात दहा मिनिटात चढून गेलो होतो. होटेलात पोहोचलो तेव्हा कपडे घामाने चिंब ओले झाले होते. मस्तपैकी शॉवर घेऊन असे काही गुडुप्प झोपलो की बस्स! J
दुसर्या दिवशी १२:३० वाजताची वेरावळ-पुणे गाडी पकडायची होती. तत्पूर्वी जुनागढ मध्ये गुजरातची प्रसिद्ध अशी बांधणीची कापडे घेण्यासाठी गावात खरेदीला जायचे ठरवले. अस्खलित गुजराती बोलू शकणारा गणेश बरोबर असल्यामुळेच आम्ही हा बेत ठरवला. ‘कापड खरेदी’ म्हटल्यावर जावा-नणंदांची जोडीही आमच्याबरोबर यायला तयार झाली. गणेशने मग एका रिक्षावाल्याला गाठले आणि त्यासोबत काहीतरी ‘गुज्जु-गोष्टी’ करून त्याला पटवले. जुनागढ गावच्या बाजारातील एका गल्लीत तो आम्हाला घेऊन गेला. तिथे अर्ध्या-पाऊण तासात मनासारखी कापड खरेदी झाली. इथेही गणेशच्या ‘गुज्जु-भाषा’ ज्ञानाचा आम्हाला किमतीत घासाघीस करण्याकामी भरपूर फायदा झाला. मग रिक्षा रेल्वे स्थानकाकडे भरधाव पळवली. रेल्वे गाडी थोडी उशिरानेच आली. पुढील ‘पुणे’ प्रवासात आम्हाला काही ‘उणे’ पडले नाही. J
आयुष्यात “जय गिरनारी” म्हणून एकदा का ह्या पवित्र, निसर्गसुंदर गिरीस्थळी जाऊन आलात की तेच तुम्हाला पुन्हा पुन्हा बोलावत राहते असा अनेकांचा अनुभव आहे. पुढील बोलावणे कधी येतेय ह्याची आम्हीही आतुरतेने वाट पाहतोय!
© विनय माधव गोखले
भ्रमणध्वनी – 09890028667