विविधा
☆ जीवना… ☆ सुश्री निलिमा ताटके☆
जीवना, खरंच, इतकं भरभरुन दिलं आहेस मला.
छोट्या कुरबुरी, आता उगा करु कशाला?
अगणित आनंदाचे क्षण, मोजता भासती तोकडे.
अन् दुःखाच्या हळव्या क्षणांचा, तो बोलबाला केवढा?
जरतारी किनारीचे वस्र ल्याले मी, झगमगते.
तरी त्याची कलाबूत, कुठेतरी का टोचते?
सुंदर सकाळ, फुलांचा मोहवतो दरवळ.
तरी द्दृष्टीस माझ्या का खुपते ही पानगळ ?
बालकाचे निरागस हास्य, त्यावीण सुंदर असे काय?
जीवन सरतानाही, पेला पुन्हा भरुन जाय.
सर्वगुणसंपन्न जरी या जगी नसे कुणी.
जगमगता एक गुण, असतो,प्रत्येकाचे ठायी.
गुणविशेष हेरावा, अन् मारावी पाठीवर थाप.
भोक दिसता, बोटे घालून, वाढवण्यात मतलब काय?
शांत आणि प्रसन्नचित्त,रहावे सदासर्वदा.
जीवन फार छोटे आहे, आज आहोत,
उद्याचे काय ठाऊक असते कुणाला?
हसण्यातून उधळा फुले, गा आनंदगाणी छानशी.
आज घ्या आनंदे जगून, विसरून उद्याची काळजी.
© निलिमा ताटके
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈