सौ. दीपा नारायण पुजारी
विविधा
☆ जपूया संस्कृती… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
आपण उत्सवप्रिय आहोत. श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक या महिन्यात विविध व्रतवैकल्ये, धार्मिक सण, उत्सव यांची रेलचेल असते. या काळात संपूर्ण निसर्ग बहरलेला असतो. वर्षाऋतुनं अवघ्या अवनीवरती जलाभिषेक केलेला असतो. सृष्टी सौंदर्यानं नटलेली असते. प्राणी पक्षी आनंदी असतात. झाडं,वेली पानाफुलांनी नटलेली असतात. आपले सण उत्सव आपल्या संस्कृतीची ओळख सांगतात. तसेच ते निसर्गाशी नातं सांगतात, निसर्गाशी जवळीक साधतात. निसर्गातल्या बदलांचं निरिक्षण करून त्यांचं आपल्या जीवनाशी असलेलं नातं शोधणं म्हणजे सण, उत्सव साजरे करणं , हो ना? सणांच्या निमित्तानं माणसं एकत्र येतात, सुसंवाद घडतात. वैयक्तिक, सामाजिक ताणतणाव कमी होतात. याबरोबरच सण, नैसर्गिक बांधिलकीची जाणीव देखील करून देतात. सृष्टीतील प्रत्येक सजीवांप्रती प्रेम, आदर, व्यक्त करण्याचा मार्ग म्हणून या सणांच्याकडं, बघायला हवं.
आपल्या चालीरीती, परंपरा आपल्याला निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करायला शिकवतात. आपल्या परिसरातील झाडं, वेली, शेती, प्राणी, पक्षी या सर्वांना मानाचं स्थान देण्यासाठी सण निर्माण केले आहेत. असा विचार केला तर परंपरा जपल्या जातीलच, पण त्याशिवाय निसर्गाचं जतन करायला, संवर्धन करायला, परिसंस्था टिकवायला हातभार लागेल.
वटपौर्णिमा, नागपंचमी, ऋषीपंचमी साजरी करायची असेल तर घरातून बाहेर जावं लागतं. निसर्गाशी संवाद साधावा लागतो.गणेशाला लाल फुले, दुर्वा, आघाडा प्रिय. अर्जुन, रुई, पिंपळ, कण्हेर, शमी, डाळिंब,शंखपुष्पी अशी एकवीस प्रकारची पत्री पूजेसाठी लागते. बाप्पासाठी हे सर्व लागते म्हणून या वनस्पतींची लागवड केली जाते. त्यांची काळजी घेतली जाते, संवर्धन केले जाते. पर्यायानं आपण आपल्या सभोवती असलेल्या निसर्गाचं संवर्धन करतो, जतन करतो. त्यामुळंच तर पर्यावरणाचा समतोल राखला जातो. शहरात पूजेसाठी लागणारी फुलं, फळं,पत्री विकत मिळते. परंतु खरेतर या वनस्पती आपल्या परिसरात आपण स्वतः लावणं अपेक्षित आहे. देवपूजेचं निमित्त करून, पूजेसाठी लागणारी सामग्री गोळा करण्यासाठी आपण त्यांच्या जवळ, त्यांच्या सान्निध्यात काही काळ व्यतीत केला पाहिजे. मोकळी हवा, भरपूर ऑक्सिजन मिळवण्यासाठी परिसरात फिरलं पाहिजे. सृजनातला आनंद मिळवला पाहिजे.सर्जनशीलता वाढली पाहिजे. या वनस्पतींच्या औषधी गुणधर्मांची माहिती करून घेतली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्या त्या ऋतूत मिळणाऱ्या भाज्या,फळं यांचं सेवन केलं पाहिजे.
आपली संस्कृती रोजच दारात रांगोळी काढायला सांगते. यामुळे घरासमोरील अंगण, घराचा बाह्य भाग, यांची स्वच्छता होते. सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश मिळतो. ताजा प्राणवायू उत्साह द्विगुणित करतो. थोडासा व्यायाम होतो. शेजाऱ्यांची खुशाली समजते. कलागुणांना वाव मिळतो. मन प्रसन्न होतं. अनेक आजार दाराबाहेर रोखले जातात.
सणासुदीच्या काळात म्हंटल्या जाणाऱ्या आरत्या, स्तोत्र पठण, यांनी सात्विक वातावरण निर्माण होतं. आरती गाताना आपण टाळ्या वाजवतो. यामुळं जशी गेयता येते, तालाचं, चालीचं भान राहतं तसंच रक्ताभिसरण सुधारतं. ओवी, श्लोक, ऋचा, आरत्या जिभेला वळण लावतात, स्मरणशक्ती वाढवतात. विचार करावा तेवढे फायदे आहेत. आपल्या पूर्वजांनी अभ्यास करून रितीरिवाज, परंपरा, सणसमारंभ यांची आखणी केली आहे. आधुनिक काळात पाश्चिमात्य देशांमधील विचार, पद्धती, खाद्यसंस्कृती, वेषभूषा आपण स्वीकारतो. ती वाईट नाही. पण आपल्या हवामानाला पूरक नाही हे मात्र नक्की. निसर्गाचा समतोल राखत, मानवी जीवन आरोग्यपूर्ण, आनंदी आणि समाधानी करण्यासाठी परंपरा जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अन्न,वस्त्र, निवारा देणारी अवनी जपली पाहिजे.
‘सहनाववतु, सहनोभुनोक्तु सहवीर्यं करवावहै’ ची अनुभूती घेतली पाहिजे.
© सौ. दीपा नारायण पुजारी
इचलकरंजी
9665669148
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈