श्री विश्वास विष्णु देशपांडे
विविधा
☆ ज्योती कलश छलक… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆
पूर्वी दूरदर्शनवर राष्ट्रीय साक्षरता मिशन या कार्यक्रमाच्या प्रचारार्थ एक गाणं दाखवलं जायचं. मला ते फार आवडायचं. ते गाणं होतं ‘ पूरब से सूर्य उगा, फैला उजियारा , जागी हर दिशा दिशा , जागा जग सारा. ‘ त्या गाण्यात सकाळच्या सूर्याचा सोनेरी प्रकाश,छोट्या मुलांचं पाटीवर मुळाक्षरं गिरवणं , त्या वृद्ध आजोबांचा हसतमुख चेहरा, त्यांचं दाढी करताना साबणाचा फेस त्या छोट्या मुलाच्या चेहऱ्याला लावणं, नंतर त्या मुलाच्या चेहऱ्यावरून हात फिरवणं, त्या मुलाचा विलक्षण हास्याने उजळलेला चेहरा, त्याचं निरागस हास्य या गोष्टी मनाला खूपच स्पर्शून जात होत्या. काही काही गोष्टी अशा चिरकाल स्मरणात राहून जातात. तसेच ते ‘ मिले सूर मेरा तुम्हारा ‘ हे गाणं . भारतातील विविध भाषा, विविध भागातील प्रादेशिक प्रथितयश कलाकार आणि गायक आणि विविध नयनरम्य दृश्ये यामुळे ते गाणं अमर झालं आहे. भारतातील विविधतेतील एकतेच दर्शन घडवण्यात त्या गाण्याचा दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.
तसेच ज्योती कलश छलके हे गाणं . सूर्य उगवल्यानंतरच्या दृश्याचं मनोरम वर्णन त्या गाण्यात आहे. अशी खूप गाणी आहेत. जी सकाळची वेळ दाखवतात. सूर्य उगवला आहे, आणि त्याबरोबर सारी सृष्टी कशी चैतन्यात न्हाऊन निघाली आहे हे बहुतेक गाण्यातून दाखवले आहे. अशी मन प्रसन्न करणारी भक्तिगीते तर भरपूर आहेत. गणपतीला भूपाळी म्हणताना ‘ तुझ्या कांतीसम रक्त पताका पूर्वदिशी फडकती, अरुण उगवला, प्रभात झाली , उठ महागणपती. ‘ किती सुंदर वर्णन हे ..! शब्दातलं सौंदर्य बघा. गणपतीचा वर्ण लाल, आरक्त. तशीच पूर्व दिशा सकाळच्या वेळी लाल, आरक्त झाली आहे. जणू रक्त पताका म्हणजे लाल रंगाच्या पताका पूर्व दिशेला सूर्यदेवाच्या आगमनाने फडकत आहेत.
तर दुसऱ्या एका अवीट गोडीच्या भक्तिगीतात श्रीरामाला जागवताना, ‘ उठी श्रीरामा, पहाट झाली, पूर्वदिशा उजळली, उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माऊली ..’ त्याच गाण्यात पुढे ‘ चराचराला जिंकून घेण्या अरुणप्रभा उगवली.. ‘ असे शब्द आहेत. खरोखर सूर्योदय झाला की त्याची प्रभा, प्रकाश जणू चराचर जिंकून घेतो. चराचरात चैतन्य आणतो. धरतीवरच निद्रिस्त जीवन जागृत होतं . फुलं उमलतात, पक्षी गाऊ लागतात. देवळातल्या घंटा निनादू लागतात. काही काळापूर्वी सगळीकडे पसरलेलं अंधाराचं साम्राज्य कुठे नाहीस होत ते कळत नाही. ‘ फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश..’ दरीखोऱ्यात मग सगळीकडे प्रकाशच प्रकाश भरून राहतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते म्हणजे तो सोबत येतांना नव्या दिवसाबरोबर नव्या आशा घेऊन येतो. नव्या आशा, नव्या दिशा आणि जीवनाचे नवे गाणे.
वसंतराव देशपांडेंनी गायलेलं ‘ तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज..’ हे गाणं मनाला स्पर्शून जातं . कट्यार काळजात घुसली या नाटकातलं हे पद पुरुषोत्तम दारव्हेकरांनी लिहिलं आणि त्याला संगीतसाज चढवला आहे जितेंद्र अभिषेकी बुवांनी. ललत पंचम रागातील हे गीत कधीही ऐकलं तरी आनंद देणारं . हा तेजोनिधी एकदा आकाशात प्रकटला की अवघे भुवन म्हणजे जग त्याच्या दिव्य स्पर्शाने झगमगून जातं .
आपण भारतीय किती भाग्यवान आहोत, याची तुम्हाला कदाचित कल्पना नसेल. जगातील अनेक देशात फार कमी मिळणारा सूर्यप्रकाश आमच्या देशात जवळपास बारा महिने मुबलक उपलब्ध आहे. हे आमचे केवढे भाग्य आहे. आणि आता तर उन्हाळा सुरु झाला आहे. आम्ही सूर्योपासनेच्या बळावर कोरेनासारख्या संकटाचा यशस्वी मुकाबला करू शकलो. सूर्यनमस्कारासारखा व्यायाम आम्हाला शक्ती देईल. आमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल. कोवळ्या सूर्यप्रकाशात फिरायला जाणे आमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरेल.
सूर्य हा अनंत काळापासून आपला शक्तीदाता आहे, बुद्धिदाता आहे, आरोग्यदाता आहे. तो आहे तर पृथ्वीवर जीवन आहे. म्हणूनच तो खऱ्या अर्थाने ‘ मित्र ‘ आहे. सकाळी उठल्यावर प्रकाशमान, चैतन्यदायी असं काही आपल्याला दिसत असेल, तर ते म्हणजे पूर्वेला उगवलेला सूर्य. केवढ्या तेजानं ती पूर्व दिशा उजळली असते..! अशा वेळी आपणही त्या तेजाचं दर्शन घ्यावं. त्या तेजात न्हाऊन घ्यावं. त्याला थोडी प्रार्थनाही करावी. की बाबा, या तुझ्या विलक्षण तेजातला काही अंश तरी आम्हाला दे. आमचेही अंतर असेच उजळू दे. त्यातील अमंगल, वाईट विचार, निराशा यांचा अंध:कार तुझ्या तेजात नष्ट होऊ दे. आम्हाला आरोग्य प्रदान कर. रोगराई नष्ट होऊ दे. सर्वांचं मंगल कर, सर्वांचं कल्याण कर.
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा.)
©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे
चाळीसगाव.
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈