श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
विविधा
☆ जीवन जगण्याची कला :- अध्यात्म – भाग – १ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
भारतीय संस्कृती ही खूप पुरातन आहे. बऱ्याच परदेशी प्रवाशांनी वर्णन केल्याप्रमाणे आपला देश सर्वच क्षेत्रात नुसता प्रगतीपथावर नव्हता तर प्रगतीच्या शिखरावर होता असे म्हटले तर वावगे होणार नाही. इथे सोन्याचा धूर निघायचा असे वर्णन केलेले आढळते. लोकं काठीला सोने बांधून काशियात्रेला जात असत. सर्वच क्षेत्रांत भारत सर्वोच्च स्थानावर होता. जगाच्या पाठीवर अनेक संस्कृतींचा उदयास्त झाला. यासर्व कालप्रवाहात एकमेव संस्कृती टिकून राहिली ती म्हणजे भारतीय संस्कृती !!! चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा उगम आणि विकास इथेच झाला. या सर्व कला म्हणजे भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. त्याकाळात भारताने नुसती भौतिक प्रगती केलेली नव्हती तर आध्यत्मिक क्षेत्रात सुद्धा परमोच्च स्थिती प्राप्त केली होती. मानवी जीवनाचा विकास फक्त मनुष्याच्या भौतिक गरजा भागवून होत नाही हे आपल्या ऋषीमुनींनी जाणले होते. त्यामुळे त्यांनी मनुष्याच्या भौतिक गरजांसोबत त्याच्या मनाचाही सखोल अभ्यास केला. आपल्याकडील सर्व ऋषीमुनी उत्तम मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी आपल्या संस्कृतीची जडणघडण पूर्णपणे निसर्गानुकूल (ecofriendly) आणि मानवी मनाच्या विविध कंगोऱ्यांचा अभ्यास करुन केली. भौतिकसुबत्ता किंवा अमर्याद भौतिकसुख हे काही मानवी जीवनाचे अंतिम साध्य असू शकत नाही हे त्यांनी त्या पद्धतीने जगून समजून घेतले. नुसत्या अमर्याद भौतिक गरजा पूर्ण करण्याच्या स्पर्धेमुळें अमेरिकेची अवस्था काय झाली आहे आपल्याला ज्ञात आहे. जोपर्यंत मनुष्याचे मन शांत होत नाही तोपर्यंत तो कधीच खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकत नाही, हे आपल्या पूर्वजांनी जाणले. आणि जसा रोग तसे औषध या उक्तीनुसार त्यावर उपाय शोधला. उपाय शोधणे कोणीही करु शकेल पण मानवी जीवनाचा अभ्यास करुन त्याप्रमाणे आदर्श जीवनचर्या आखणे आणि तो समाजातील सामान्य मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग होणे हे लिहायला, ऐकायला सामान्य वाटले तरी हे जनमानसात रुजविणे फार अवघड होते. पण आपल्या पूर्वजांनी तेही करून दाखविले. तसेच संवर्धितही केले. थोडक्यात दैनंदिन जीवन जगताना मनःशांती मिळवायची असते हे त्यांनी विसरायला लावले आणि अशी जीवनपद्धती विकसित केली की त्या पद्धतीने मनुष्याची आपसूक मनशक्ती वाढून मन:शांतीचा नकळत लाभ होईल. याविशिष्ट जीवनपद्धतीला त्यांनी ‘अध्यात्म’ असे नाव दिले.
अध्यात्म ही खरं तर भारतीय जीवनपद्धती (आचारपद्धती) आहे, जीवनकला आहे. हजारो वर्षांची राजकीय गुलामगिरी जरी संपली असली तर सांस्कृतिक गुलामगिरीचा पघडा जनमानसावर अजून आहे असे ठळकपणे जाणवते. सध्याची आपली जीवनपद्धती ना धड भारतीय आहे ना पूर्णपणे विदेशी. सरमिसळ झालेल्या संस्कृतीत आपण सर्व अजब पद्धतीने आपले जीवन जगत आहोत. आपले सोडायला मन धजावत नाही आणि पाश्चात्यांचे पूर्ण स्वीकारता येत नाही. अशी द्विधा मनःस्थिती आपली सर्वांची कमीअधिक प्रमाणात आहे. प्रत्येकाला जीवनात आनंद हवा आहे, पण आज माझ्या जवळ आनंद आहे किंवा मी आनंदी आहे असे स्वतःहून, मनःपूर्वक छातीठोकपणे म्हणणारा मनुष्य शोधावा लागेल अशी परिस्थिती आहे. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे आपल्या जीवन पद्धतीची पुनर्रचना करणे. यात आपल्याला कोणतेही कर्म बदलायचे नसून फक्त दृष्टिकोन बदलायचा आहे. कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाची इथे गरज नाही. दृढनिश्चय मात्र नक्कीच हवा. पूर्वी लोक असेच जगत होते, त्यामुळे त्यांच्या जीवनात ‘आनंद’ होता.
आज मात्र प्रत्येक जण आनंदाच्या शोधात आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मनुष्याचा ‘आनंदा’चा शोध सुरु आहे. मनुष्य सकाळी झोपेतून जागे झाल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक गोष्टी करीत असतो. त्यातील बऱ्याचशा गोष्टीत तो कमीअधिक प्रमाणात यशस्वी देखील होतो तर काही गोष्टीत तो अपयशी ठरतो. दिवसभरात त्याच्या आयुष्यात सुखदुःखाचे, जयपराजयाचे अनेक प्रसंग येतात, त्याला मानापमान सहन करावा लागतो. दिवसभरातील प्रेम, माया, मोह, जिव्हाळा, आपुलकी, तिरस्कार, हेवा, मत्सर, राग, द्वेष अशा विविध भावभावनांच्या हिंदोळ्यावर आपले मन सावरण्याचा मनुष्य आटोकाट प्रयत्न करीत असतो. भावनांच्या हिंदोळ्यावर मन स्थिर ठेवणे हे अतिशय कौशल्याचे काम नसले तरच नवल !!!
कोणतीही गोष्ट कुशलतेने करायची असेल तर ते कौशल्य आत्मसात करणे क्रमप्राप्त ठरते. काही माणसे जगायचे म्हणून जगत असतात. काही मरत नाहीत म्हणून जगत असतात. काही माणसे दुसऱ्यासाठीच जगत असतात. तर मोजकी माणसे काही विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन फक्त त्या विशिष्ट उद्दिष्टासाठी जगत असतात. सर्वांचे ‘जगणं’ हे एकच असले तरी प्रत्येकाच्या जगण्याचे मूल्य मात्र भिन्न भिन्न असते आणि असे होणे स्वाभाविक आहे. स्वाभाविकच त्यांच्या जीवनाची यशस्वीताही वेगवेगळी असते. दुसऱ्याला त्रास देण्यासाठी जगणे याला आपल्याकडे ‘विकृती’ असे म्हणतात. स्वतःसाठी जगणे याला ‘प्रकृती’ असे म्हणतात तर दुसऱ्यासाठी जीवन जगणे याला ‘संस्कृती’ असे म्हणतात. सर्व संतांनी मानवी मनाचा जितका अभ्यास केला तितका अभ्यास खचितच दुसरा कोणी केला असेल. आत्म्याने गर्भवास पत्करल्यापासून गर्भावासाचा त्याग करेपर्यंत त्या आत्म्यास त्याच्या ‘स्व’स्वरूपाचे ज्ञान असते. पण एकदा का त्याने या नश्वरजगात प्रवेश केला (मनुष्याचा जन्म झाला) की मनुष्य देवाला तू कोण आहेस असा प्रश्न विचारु लागतो. ‘सोहं’ म्हणणारा आत्मा ‘कोहं’ असे म्हणू लागतो. संत असे सांगतात की देहबुद्धीमुळे मनुष्य आपल्या ‘स्व’स्वरूपाला विसरतो आणि देहदु:खात बुडून जातो. देहबुद्धीमुळेच त्याला सुख दुःख आणि आनंद यातील सूक्ष्म फरक लक्षात येत नाही आणि मग ज्याच्यात्याच्या सुखदुःखाच्या (मिथ्या) कल्पनेप्रमाणे मनुष्य आयुष्यभर नुसता भरकटत राहतो. बरेच वेळेस ह्या भरकटण्यालाच सामान्य मनुष्य सुख समजतो आणि सुज्ञ लोकं त्यास ‘भ्रम’ असे संबोधतात.
देहसोडून जाईपर्यंत अर्थात मृत्यूपर्यंत मनुष्य सुखच शोधीत असतो. पण खरंच त्याला सुख मिळतं? त्याला समाधानाचा लाभ होतो ? आज आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या मित्रांपैकी एखादा मित्र मैत्रीण सुखी आहे, समाधानी आहे असे आपल्याला जाणवतं का ? मित्रांचे सोडून देऊया, पण एकांतात बसल्यावर आपण सुखी आहोत, समाधानी आहोत असे आपल्याला क्षणभर तरी वाटते ? या प्रश्नाचे खरे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल, हो न? खरंतर आपले सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले पाहिजे. आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर मला मोठे प्रश्नचिन्ह दिसत आहे की हा माणूस काहीही घडलेले नसताना आमचे का अभिनंदन करीत आहे. आपली शंका रास्त आहे. कारण समोरील मनुष्याचे कौतुक करण्याची संधी आपल्याला अनेक वेळेस अगदी विनासायास उपलब्ध होत असते, परंतु आपण आपल्याच सुखदुःखात इतके गुरफटून घेत असतो की ते आपल्या लक्षात येतच नाही. आता मूळ मुद्यावर येतो. आपले कौतुक करायला हवे कारण आपण मनातल्या मनात तरी कबूल केले आहे की आपण एखादवेळेस दुःखी नसू पण सुखी आहोत असेही नाही. आपण आता एक गृहपाठ करुया. गृहपाठ म्हणण्यापेक्षा आपण त्याला मनोपाठ असे म्हणूया. कारण आपल्याला तो आताच म्हणजे लगेच आणि आपल्या मनातल्या मनातच करायचा आहे. आपण सुखी का नाही? आपल्याला समाधान का मिळाले नाही याची काही उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करुया. मी अवघड प्रश्न विचारत नसल्यामुळे कोणालाही आपले उत्तर प्रगट करावे लागणार नाही. असो. तर आता आपण आपले उत्तर मनात शोधले असाल. आपण शोधलेली सर्व उत्तरे अगदी बरोबरच आहेत. त्यामुळे आपल्याला शंभर पैकी शंभर गुण मिळालेले आहेत. आपण सर्व विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहात. तरीही एक प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर देऊनही आपण समाधानी का नाही? आपण आनंदी का नाही? आपण सुखी का नाही? आपण जगतोय की जगवले जातोय ? की नाईलाजाने दिवस ढकलतोय ? हे जीवन आपल्यासाठी नक्की काय आहे? जीवनाचा खरा अर्थ काय ? असे अनेक प्रश्न आपल्याला याआधी पडले असतील ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला अध्यात्मात मिळू शकतात.
जगातला सर्वात चांगला शब्द म्हणजे आनंद. कारण आनंद सर्वांना हवा आहे. मुख्य म्हणजे आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्दच नाही. सामान्य मनुष्य यामध्ये सुद्धा थोडी गफलत करतो. तो सुख आणि आनंद यांची बरेचवेळेस सरभेसळ करतो. सुखदुःख हे कशावरतरी अवलंबून असू शकते किंवा अवलंबून असतेच. पण आनंद हा पूर्णपणे स्वतंत्र आहे. याच्यावर कोणाचे बंधन नाही. खरंतर आनंद आपल्या हातात असायला हवा. माझा आनंद माझ्या हातात! सुखदुःख स्थितीरुप आहे तर आनंद वृत्तीरूप आहे. मनुष्याला कुठेही कधीही कसाही, अगदी जिथे आहे तिथे, आनंद मिळू शकतो. गंमत अशी आहे की आनंद मिळण्यासाठी सर्वात मोठी आणि एकमेव आडकाठी आपली स्वतःचीच असते. कारण ‘आज रोख उद्या उधार’ या धर्तीवर आपण आनंद सुद्धा ‘उद्यावर’ टाकत असतो. अमुक गोष्ट झाली की मला आनंद मिळेल, नोकरी मिळाली की आनंद मिळेल, नोकरीत बढती मिळाली की आनंद मिळेल, अमका मनुष्य भेटला की आनंद मिळेल, अमुक व्यक्ती आयुष्याची जोडीदार म्हणून लाभली तर आनंद मिळेल, असे कितीक ‘तर’ आपण आपल्या आनंदाच्यामागे जोडतो आणि आपला आनंद उधारीवर ठेवतो, एका अर्थाने जगणंच उद्यावर टाकतो. बाहेरील जगात आनंद आहे असे समजून मनुष्य आनंद बाहेर शोधत राहतो. चुकीच्या जागी एखादी गोष्ट शोधली तर ती आपल्याला कशी मिळणार ? त्यामुळे आपण सतत रडगाणं गात असतो. वर्तमानकाळ ही आपल्याला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. रोज २४ तासांमध्ये स्वतःसाठी किमान एक तरी गोष्ट करायला हवी. उदा. आरशातला निवांत क्षण स्वतःला द्या, स्नानाच्या, जेवणाच्या वेळेचा आनंद लुटा. स्वतः गाणं म्हणा. मग आज आत्ता ताबडतोब अगदी याक्षणी उपलब्ध काय असेल तर तो फक्त आनंद !! आयुष्यातील प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करुया. प्रत्येक क्षणाचा सन्मान राखत त्याचे पावित्र्य जपणे, हीच जीवन जगण्याची कला आहे. सामान्यपणे आपण दुसऱ्यांवर हक्क गाजवायचा प्रयत्नात असतो, खरंतर आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर राज्य करायला पाहिजे. क्षणावर राज्य करणे म्हणजे तारतम्याने विवेकाने प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया न देता ‘प्रतिसाद’ देणे. आजपर्यंत जी लोकं यशस्वी झाली आहेत त्यांनी कधीही आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांना प्रतिक्रिया दिलेली नाही तर विवेकाने ‘प्रतिसाद’ दिला आहे.
– क्रमशः भाग पहिला
☆
© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
थळ, अलिबाग
मो. – ८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर