सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
☆ जगणे व्हावे गाणे… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
‘जगणे व्हावे गाणे’! जगणे आणि गाणे या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संलग्न आहेत. गाण्याशिवाय जगण्याला अर्थ नाही आणि जगण्याशिवाय गाण्याला! जगताना जो ताल, सूर आपण अनुभवतो तोच गाण्याची संबंधित केला की त्याला योग्य असे गाणे आपल्या ओठावर येते. आपल्या मूड प्रमाणे आपण गाणे गुणगुणतो, आवाज चांगला असेल तर गातो, किंवा नसेल तर फक्त ऐकतो! आपल्या मनात त्या गाण्याच्या सूरांचे प्रतिसाद उमटत असतात. आपण आनंदी मूडमध्ये असलो तर आपोआपच लतादीदींची ” ‘आनंदी आनंद गडे’ किंवा’ माझे गाणे एकच गाणे नित्याचे गाणे.. ‘ अशा प्रकारची गाणी आठवतात.
पण तेच एखादी दुःखद घटना घडली की मनात “जन पळभर म्हणतील हाय हाय.. ” यासारखे अर्थपूर्ण गाणे आठवते किंवा मुकेशची दुःखी हिंदी गाणी आठवतात! गाणं आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाशी निगडित असते. ज्याला गाणं आवडत नाही अशी व्यक्ती विरळाच! कोणी मराठी, कोणी हिंदी गाणी ऐकत असेल तर कोणी भक्ती गीते, भावगीतांचा प्रेमी असेल तर कोणाला उडत्या चालीची गाणी आवडत असतील! एखादा लताचा फॅन असेल तर दुसरा आशा भोसले किंवा सुमन कल्याणपुरचा! याशिवाय अनेक गायक गायिकांचे फॅन ही असतातच!
काहींना जुनी गाणी आवडतात तर काहींना नवी गाणी आवडतात. काहींच्या मते गाण्यात जुने-नवे असे नसतेच. गाण्याचा सूर महत्वाचा!चाल चांगली पाहिजे!
आपल्या गायनाच्या आवडी विविध प्रकारच्या असतात. एखाद्याला एखाद्या गायक-गायिकेचे इतके प्रेम असते की, तिचे/त्याचे नाव त्याच्या घरावर, गाडीवर कुठेही लिहिलेले आढळेल! असा एक आमचा परिचित आहे सुद्धा की, तो फक्त ” आशा ” प्रेमी आहे! तिच्या गाण्यातच त्याचे ‘जगणे’ चालू असते. विरह गीते ऐकणाऱ्यांचा वर्ग वेगळाच असतो! बरेचदा तो त्याच्या वैयक्तिक जीवनाशी निगडित असा विषय हे असू शकतो. एखाद्याला हलकीफुलकी गाणी आवडतात तर एखाद्याला फक्त जुनी गाणी आवडतात. पूर्वीच्या काळी रेडिओ हेच हिंदी, मराठी गाणी ऐकणाऱ्यांसाठी साधन होते. त्यापूर्वी ग्रामोफोन वापरला जाई पण असे हे ग्रामोफोन बहुतेक सधन वर्गाकडेच असत!
एक काळ असा होता की घरात रेडिओ किंवा टेप रेकॉर्डर प्रत्येकाकडे नसे. पण हॉटेलमध्ये असणाऱ्या टेप रेकॉर्डर वर विशिष्ट गाणे लावण्यासाठी काही पैसे देऊन ते गाणे लावायला सांगितले जात असे. बरेचदा इराण्याच्या हॉटेलवर हा व्यवसाय चालत असे.
बालगंधर्वांच्या काळामध्ये त्यांची गाणी ऐकत जगणारा एक मोठा वर्ग होता! दीनानाथ मंगेशकर यांचे नाट्यसंगीत ऐकणे हेही गाण्याच्या चाहत्यांचे स्पेशल दालन असे. संगीत नाटके बघणे आणि त्यातील पदे ग्रामोफोनवर ऐकणे ही एक सुसंस्कृत समाजात असलेली एक आवड होती..
आणि ही गोष्ट अर्थातच मोठेपणा ची समजली जाई..
पुढे रेडिओ आला आणि विविध प्रकारची गाणी वेगवेगळ्या वेळी रेडिओवर ऐकायला मिळू लागली. सकाळी भक्ती गीते, नंतर मराठी चित्रपट गीते यावर लोकांचे टाईम टेबल बनू लागले.
हिंदी गाण्यांमध्ये बिनाका गीतमाला, सांज गीते या सारखे कार्यक्रम फेमस झाले!
एक तारखेला ‘खुश आहे जमाना आज पहिली तारीख है ‘या गाण्याने सकाळच्या जुन्या हिंदी गाण्यांची सुरुवात झाली की मन खुश होत असे! टेप रेकॉर्डर आला आणि गाण्याच्या शौकिनांना एक नवीन विश्व सापडले! एकच गाणे अनेक वेळा आवडीप्रमाणे ऐकायला मिळू लागले. यासंबंधी माझी एक आठवण माझ्या मिस्टरांच्या गाण्याच्या आवडीशी निगडित आहे. त्यांना “उगवला चंद्र पुनवेचा” हे बकुळ पंडित यांनी गायलेले गाणे इतके आवडत असे की, पौर्णिमा जाऊन अमावस्या उगवली तरी त्यांच्या टेपवर हे गाणे वाजतच असे!
जगण्याशी गाण्यांचा इतका निकटचा संबंध असतो की त्या आपल्या आवडीवर प्रत्त्येकाचे जगणे चालू असते!
बालपणी ऐकलेली “असावा सुंदर चॉकलेटचा बंगला” किंवा “सांग सांग भोलानाथ ” यासारखी गाणी अजूनही लहान मुलांना आवडतात आणि ती आयुष्यभर लक्षात राहतात. तरुणपणात चंद्राची गाणी किंवा प्रेमाची गाणी ऐकणे तरुणांना आवडते तर प्रौढ लोकांना सुधीर फडके यांची गाणी मोहात पाडतात. असा हा ऐकिव गाण्यांचा काळ संपला आणि टीव्ही आला. तेव्हा जगणे आणि गाणे अधिकच जवळचे झाले. टीव्हीच्या वेळेनुसार आपल्या आवडत्या गायक गायिकांना टीव्हीवर बघत आपण गाण्याचा आस्वाद घेऊ लागलो. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही जाऊन रंगीत टिव्ही आला आणि गाण्यांची दुनिया अधिकच रंगीबेरंगी झाली. ‘ “बागो मे बहार है” म्हणत फिरणारी राजेश खन्ना आणि शर्मिला जोडी बघताना नजरेला जीवन अधिकच रंगीबेरंगी वाटू लागले. ‘जगणे व्हावे गाणे’ अशी रंगीत स्वप्नं डोळ्यासमोर येऊ लागली.
अशावेळी अमोल पालेकर चा “रजनी गंधा” आठवतो. मध्यमवर्गीय तरुण गाण्यातच आपल्या प्रेयसीला कसा शोधत असतो त्याचे मनमोहक चित्रण ‘रजनीगंधा ‘या सिनेमात आहे. जगण्याशी गाण्याचे नाते अतूट आहे आणि ते प्राचीन काळापासून आहे. गाण्याच्या मैफिलीतून गाणारे जुने गायक जीव ओतून गाणे गात की जे मनाला जाऊन भिडत असे.
या संबंधीची तानसेन यांची गोष्ट आपल्या ला माहिती आहे. त्यांच्या गाण्याने पशू, पक्षी जवळ येऊन गाणे ऐकत तर विशिष्ट राग -मल्हार गायल्या वर पाऊस ही पडत असे!
ग्रामोफोन, टेप रेकॉर्डर, टीव्ही, मोबाईल अशी विविध साधने दुनियेत आली आणि जीवन गाणे अगदी घरात येऊन थांबले! गाणं नसेल तर जीवन नाही अशीच परिस्थिती आली!
आता तर कानामध्ये बड्स(buds) घालून मुले गाणी ऐकत गाड्या चालवतात, काम करतात आणि अभ्यासही करतात.. माझ्या नातीला ती जर गाणं ऐकत अभ्यास करत असेल तर मी जरा रागावते, “अगं, गाणं ऐकत तुझं अभ्यासावर लक्ष कसं केंद्रित होणार?” तर ती म्हणते, “आजी, गाणं ऐकतच माझा अभ्यास चांगला होतो आणि गणित लवकर सुटतात!” तर अशीही गाण्याची जादू!
गाण्याचा उपयोग नाटकांतून ही चांगला केला गेला. बालगंधर्वा सारख्या गायकांनी गाण्याला नाटकात प्रतिष्ठा मिळवून दिली.
अलीकडे तर गायन हे काही आजारांवर एक थेरपी म्हणून वापरले जाते, तर प्रेग्नेंसी मध्ये सुद्धा विशिष्ट प्रकारच्या गाण्यांची सुरावट ऐकली तर त्याचा गर्भावर परिणाम होतो असे सिद्ध झाले आहे. त्यामुळे जन्माला येण्याच्या अगोदर पासूनच ‘गर्भसंस्कार’ करण्यासाठी गायन कलेचा उपयोग होतो!
काही लोकांना गाण्याचे हे महत्त्व कळत नाही. ती केवळ “रडगाणी”च गात राहतात. हाही गाण्याचा एक प्रकार! कितीही चांगली परिस्थिती असली तरी सतत तक्रार करायला, रडायला यांना आवडते त्यांच्या जीवनात रडण्याचीच संगत असते! अशी माणसे सोबतीला नको वाटतात.
गाणं जगण्याला अधिक सुसह्य करतो आणि जगणे आनंदमय करते! असा हा जगणं आणि गाणं याचा निकटचा संबंध असतो.. अशावेळी मला लतादीदींचे गाणे आठवते, ” माझे जीवन गाणे…, गाणे.., व्यथा असो, आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, कधी वाऱ्यातून, कधी ताऱ्यातून, गाती एकच गाणे, गाणे, माझे जीवन गाणे, गाणे!’ तर असं हे गाणं! गाण्याने जीवन समृद्ध बनते. आणि जगणं हे सुरमयी बनते! जगणं आणि गाणं या दोन्ही एकमेकांना पूरक गोष्टी आहेत ज्यात आपल्याला मनापासून आनंद मिळतो!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
पुणे
मो. 8087974168
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈