श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

जगण्यातला अर्थ… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

‘मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने… ‘ असं मुकेश यांनी गायलेलं एक गीत आहे. जगण्याची आशा जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत माणूस इंद्रधनुषी सात रंगांची स्वप्न पहात असतो. मंगेश पाडगावकर म्हणतात, ” या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.”

खरोखरच हे जीवन विविधरंगी आहे. पण कधी कधी हेच जीवन एखाद्यासाठी भयंकर असे दु :स्वप्न बनू शकते. आयुष्य जिवंतपणी नरक बनतं. अशा वेळी जगणं नकोसं होतं. परंतु अशाही विपरीत परिस्थितीत काही माणसं हार मानत नाहीत. कारण जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांच्याकडे असते. अशा परिस्थितीत ते असं काही जगतात की ते त्यामुळे त्यांचं जीवन सफल तर होतंच पण ते इतरांसाठी प्रेरणादायी बनतं. अशीच एक कथा ऑस्ट्रियातील विक्टर फ्रँकल यांची.

ते न्यूरोलॉजिस्ट आणि मानसोपचार तज्ञ होते. अभ्यास आणि संशोधन हेच जणू त्यांचे जीवन झाले होते. आत्महत्या करणाऱ्या स्त्रियांसाठी ते काम करत होते. जीवनाला कंटाळून निराश झालेल्या आणि आत्महत्या करणाऱ्या स्त्रियांना त्यापासून परावृत करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. अशातच दुसरे महायुद्ध सुरू झाले. विक्टर फ्रँकल आणि त्यांच्या कुटुंबीयांना अटक करून नाझी छळ छावण्यात पाठवण्यात आले. तिथे ते सगळे अपरिमित छळाचे बळी ठरले. या कालावधीत फ्रँकल यांनी आपल्या वडिलांचा, आईचा मृत्यू पाहिला. त्यांच्या गर्भवती असलेल्या पत्नीचे निधन झाले. परंतु या सगळ्या भयंकर, भीतीदायक वातावरणातून ते सुदैवाने वाचले, बाहेर आले आणि पुन्हा त्यांनी आपल्या कार्याला वाहून घेतले. त्यांनी आपल्या जीवनातील जे अनुभव घेतले त्यावर आधारित Man’s Search for Meaning या नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकाचे ‘ अर्थाच्या शोधात ‘ या नावाने मराठी भाषांतर झाले आहे. डॉ विजया बापट यांनी हा अनुवाद केला आहे. फ्रँकल यांनी एकूण ३२ पुस्तके लिहिली. या पुस्तकांचे एकूण ३४ भाषांमध्ये भाषांतर झाले आहे.

फ्रॅंकल यांच्या अनुभवाचे आणि जीवनाचे सार म्हणजे अर्थाचा शोध हे पुस्तक. त्यात ते म्हणतात, ” हे जीवन जर अर्थपूर्ण असेल तर मानवी जीवनातील दुःखालाही अर्थ असला पाहिजे. आपले भाग्य आणि मृत्यू या गोष्टी ज्याप्रमाणे टाळता येत नाहीत त्याप्रमाणेच दुःख ही न टाळता येणारी गोष्ट आहे. मानवी जीवनात येणाऱ्या दुःखाचे महत्त्व कमी लेखून चालणार नाही. दुःखाशिवाय मानवी जीवनाला परिपूर्णता येत नाही.

आपल्या जीवनाला जर अर्थ नसेल तर जीवन भरकटते. आपण वाईट सवयींच्या आणि व्यसनांच्या आधीन होतो. माणसाच्या हातून सर्व काही हिसकावले जाऊ शकते. परंतु विपरीत परिस्थितीतही जीवन जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती जर त्याच्याकडे असेल तर ती त्याच्याकडून कोणी काढून घेऊ शकत नाही. आपल्या भोवताली असणारी, आपल्या विरुद्ध असणारी परिस्थिती बदलण्याची क्षमता जर आपल्यात नसेल तर आपण स्वतःला बदलले पाहिजे. आपण घेतलेल्या भूमिकेत जगण्याचा अर्थ शोधण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे.

जीवनात संकटे तर येणारच परंतु अशा परिस्थितीत खचून न जाता आपल्या जगण्याला नवा अर्थ देता यायला हवा. असा अर्थ तीन प्रकारे आपल्याला देता येऊ शकतो आणि त्यामुळे आपले जगणे अर्थपूर्ण होऊ शकते. त्याबरोबरच ते इतरांसाठीही मार्गदर्शक आणि प्रेरणादायी होऊ शकते.

१. आपल्याला आपल्या जगण्याचा अर्थ प्रत्यक्ष कामातून शोधत यायला हवा.

२. इतरांवर प्रेम करण्यातूनही तो शोधता येतो. आणि

३. दुःख, वेदना सहन करतानाही तो शोधता येतो.

असे हे तीन मार्ग आपल्या जगण्याला एक दिशा देऊ शकतात. यासाठी काही उदाहरणे आपण पाहूया. म्हणजे फ्रँकल यांना नेमके काय म्हणायचे आहे ते आपल्याला लक्षात येईल.

त्यांनी सांगितलेली पहिली गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष कामातून जगण्याचा अर्थ, जगण्याची दिशा शोधता यायला हवी. ‘इकीगाई’ हे प्रसिद्ध पुस्तक सुद्धा हेच आपल्याला सांगतं की आपल्याला का जगायचं हे कळलं, तर कसं जगायचं हे नक्कीच कळेल. बाबा आमटे यांनी एका महारोग्याला अत्यंत भयानक अवस्थेत वेदनांनी तळमळताना पाहिलं. समाजाने आणि त्याच्या नातेवाईकांनी त्याला जणू मरण्यासाठीच सोडून दिलं होतं. बाबांनी त्याची सेवा सुश्रुषा केली आणि मग कुष्ठरोग्यांच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. आपले संपूर्ण जीवनच त्यांच्यासाठी समर्पित केले. त्यातून त्यांना जगण्याचा अर्थ कळला. त्यांचे जीवन म्हणजे समाजासाठी एक आदर्श असा वस्तुपाठ होता. पुणे येथे भिक्षेकर्‍यांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असणारे डॉक्टर अभिजीत सोनवणे यांनी भीक मागणाऱ्यांची वाईट अवस्था पाहिली. त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावे असे त्यांना आतून वाटू लागले आणि आपले जीवन त्यांनी त्यांच्यासाठी समर्पित केले. अनेक भिक्षेकर्‍यांना त्यांनी रोजगार मिळवून देऊन स्वतःच्या पायावर उभे केले आहे. त्यांना स्वाभिमानाने जगणे शिकवले आहे.

प्रत्येक व्यक्ती स्वतःवर आणि स्वतःच्या कुटुंबावर प्रेम करतेच परंतु त्यापलीकडे जाऊन इतरांवर मानवतेच्या भावनेतून प्रेम करणे, इतरांप्रती कृतज्ञतेच्या भावनेतून काहीतरी समाजकार्य करणे हे सुद्धा जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी महत्त्वाचे आहे. अशी अनेक मंडळी आहेत की जी आपले काम करतानाच, इतरांसाठी देखील काम करतात, त्यांच्यावर प्रेम करतात. ती माणसे जगावीत, त्यांना चांगले खायला प्यायला मिळावे, चांगले कपडेलत्ते मिळावे म्हणून प्रयत्न करतात. संभाजीनगर येथील श्री चंद्रकांत वाजपेयी आणि त्यांचे सगळे सहकारी वाया जाणारे अन्न गोळा करून ज्यांना त्याची गरज असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. नाशिक येथील श्री अशोक धर्माधिकारी आणि त्यांचे सहकारी आदिवासी स्त्रिया, मुले यांना आवश्यक त्या वस्तू दरवर्षी त्यांच्या भागात जाऊन पुरवतात. त्यांची दिवाळी आनंदाची करतात. अशी अनेक माणसे आहेत ही दोन नावे फक्त मी उदाहरणादाखल दिली. अनेक माणसे वृद्धाश्रमात जाऊन सेवा करतात, आपला वेळ देतात. आपले काम करता करताच या समाजोपयोगी गोष्टीही ते करत असतात. यातून त्यांना आपल्या जीवनाचा अर्थ सापडतो आणि खरोखरीच त्यांचे जीवन धन्य होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशावर प्रेम केले. ‘ स्वतंत्रतेचे स्तोत्र ‘ या कवितेत ते म्हणतात

तुजसाठी मरण ते जनन

तुजवीण जनन ते मरण.

एक सुंदर सुविचार आहे, ” फक्त स्वतःसाठी जगलास तर मेलास, पण स्वतःसाठी जगून इतरांसाठी जगलास तर जगलास. “

ज्यांनी स्वतः यातना सहन केल्या आहेत, वेदनांना तोंड दिले आहे अशी माणसे केवळ स्वतःचे दुःख कुरवाळत न बसता इतरांसाठी काम करून आदर्श घालून देतात. अशी पण खूप उदाहरणे आहेत. संतोष गर्जे हा स्वतः अनाथ असलेला तरुण! त्याने प्रचंड यातना सोसल्या आणि जगण्यासाठी संघर्ष केला. परंतु आपल्यासारख्या अनाथ लेकरांना अशा प्रकारचे जीवन जगावे लागू नये म्हणून अशा अनाथ मुलांचा सांभाळ करण्यासाठी बीड जिल्ह्यातील गेवराई या ठिकाणी त्यांनी मोठे कार्य उभे केले आहे. तो आणि त्याची पत्नी अनाथ मुलांना आई-बापांची माया देत आहेत, त्यांना जगण्यासाठी समर्थ बनवत आहेत. असेच एक उदाहरण आहे राहुल देशमुख यांचे. आता ते एका राष्ट्रीयकृत बँकेत अधिकारी आहेत. पण त्यांना लहानपणी शिक्षण घेत असताना काही काळानंतर अंधत्व आले. शिक्षण घेताना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अंध असल्यामुळे कोणी त्यांना होस्टेलला प्रवेश देखील देत नव्हते. आपल्या बुद्धिमत्ता आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. पण इतर अंध विद्यार्थ्यांना आपल्यासारखा त्रास शिक्षण घेताना होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी राहूल यांनी वस्तीगृह सुरू केले, त्यांना शिक्षण घेता येईल अशी व्यवस्था केली, त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवस्था केली आणि त्यातून अनेक तरुण आज नोकरीला लागले आहेत मोठ्या हुद्द्यावरती काम करत आहेत. हरमन सिंग सिद्धू हा अपघातात गंभीर जखमी झाला आणि अनेक वर्षांपासून व्हीलचेअरला खिळून राहिला आहे. आपल्या वेदना शमवण्यसाठी अनेक प्रकारच्या गोळ्या त्याला घ्याव्या लागतात. परंतु तो आपल्या वेदनांबद्दल चकार शब्दही बोलत नाही. लोकांनी अपघातापासून वाचावे म्हणून त्यांनी ‘ सुरक्षित पोहोचा ‘ ही संस्था सुरू केली आणि आज तिचे कार्य ते करीत आहेत. अशी प्रेरणादायी कितीतरी उदाहरणे आपल्या अवतीभवती आहेत. या आणि अशा बऱ्याच व्यक्तींवर मी माझ्या पुस्तकांमधून लेख लिहिले आहेत आणि त्यांचे कार्य समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

या सगळ्या गोष्टींचे तात्पर्य असे की आपल्या जीवनातील परिस्थिती जरी आपल्याला प्रतिकूल असेल तरी आपण निराश न होता किंवा खचून न जाता त्या परिस्थितीला धीराने तोंड देऊन आपले जीवन जगण्याची दिशा प्राप्त करू शकतो. मानवी जीवनात दुःख हे अपरिहार्य आहे परंतु अशा दुःखाला कुरवाळत न बसता काही माणसे आपले दुःख विसरून इतरांसाठी मानवतेच्या भावनेतून कार्य करत राहतात आणि आपल्या जगण्याचा अर्थ शोधतात. अशावेळी जगण्याचा अर्थ कळतो जीवनाच्या अशा टप्प्यावर मग हे जीवन सुंदर आहे अशी जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. संत तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचे तर

जे का रंजले गांजले

त्यासी म्हणे जो आपुले

तोचि साधू ओळखावा

देव तेथेची जाणावा.

अशी माणसे म्हणजे आधुनिक संतच होत. ते दीपस्तंभ होत.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments