सुश्री संगीता कुलकर्णी

 ☆ विविधा ☆ जागतिक महिला दिन ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

जागतिक महिला दिन अर्थात स्त्रीत्वाचा उत्सव… महिलांच्या सन्मानाचा त्यांच्या उत्कर्षाचा दिवस म्हणजे महिला दिन.. जगभरातून हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो कारण ८ मार्च या दिवशी महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो…

खरं तर रोजचा दिवस आपला. प्रत्येक स्त्रीचा…तिच्या आत्मसन्मानाचा आणि तिच्या कसोटीचाही… केवळ ती स्त्री आहे म्हणून भोगाव्या लागणाऱ्या वेदनेचा आणि ती स्त्री आहे म्हणूनच अनुभवता येणाऱ्या सर्जनत्वाचाही..

“जागतिक महिला दिन ” आजची सगळी वृतपत्रे यशस्वी महिलांच्या मुलाखती फोटोंनी भरगच्च भरले. ते वाचल्यावर आपल्याला समजते की किती तरी कठीण प्रसंगातून जाऊन त्यांनी आज वेगवेगळ्या स्तरावर यशाची शिखरे गाठली आहेत. हे सर्व वाचले की मनाला नवचैतन्य नवाहुरूप उभारी देऊन जातो. परंतु स्त्रीभृण हत्येचा किळसवाणा प्रकारही मनातून काही जात नाही. तसेच अजूनही या समाजात स्त्रीलिंग नाकारण्यात येत आहे. बरेचदा एक स्त्री दुसर्‍या स्त्रीची वैरी असल्याचे आजकाल आढळून येत आहे. मुलगी झाली की घरातील महिला वर्ग “दुसरी पण मुलगीच का? “… असे उद्दगार आपल्याला ऐकायला मिळतात. काही अपवादही आहे बरं का?..

खरं तर आजच्या या 21 व्या शतकात हे अपेक्षित आहे का? “बेटी बचाओ! बेटी पढाओ ” असे आजच्या या घडीला आपल्याला जाहिरात द्वारे पथनाट्याद्वारे सांगावे लागत आहे..

असे अनेक प्रश्न माझ्या मनात पिंगा घालायला लागले. विचार करता करता मला “ती “भेटली..

“ती “… आपल्याला अनेक नात्यातून भेटत असते..

आपल्या निसर्गदत्त सोशिक स्वभावानुसार..

सृष्टीच्या सृजनाचा आविष्कार…घडवून आणते आणि सहनही करते..वर्तमानावर चढावा नैराश्याचा झाकोळ भूतकाळ पोखरून काढणारा तर भविष्य अनेक प्रश्नचिन्ह घेऊन येणारा..तरीही शोधत असते उजेडवाटा “ती”

आपल्याच अस्तित्वाची पण स्वःसामर्थ्याने उजळत ठेऊन अंधाराला शह देत कणखरपणे उजेडाच्या बेटावर उभी असते. आपल्या अस्तित्वाचा ठसा बिनदिक्कत उमटवत असते “ती “..

आपल्या इच्छांना ध्यासांना आपलं सत्व सिद्ध करत आकार देण्याच्या धडपडीत किती -कितीकदा कोलमडून पडते. तरी पण एकेक पाऊल पुढे पुढे टाकत जाते. वाट शोधताना संवेदनांची पडझड, वाटेवरचे काटेकुटे दूर करत चालताना लागलेल्या क्षमतांचा कस, स्वाभिमानानं जगताना घरादारांशी झगडावं लागलेलं… तिने अनुभवलेलं तिचचं तिच्यातून तुटतं जाणं….तरीही.. चिकाटी आत्मविश्वास डळमळू न देणारी “ती”..

म्हणूनच म्हणावसं वाटतं की..

“ती ” ची कहाणी

“ती ” चं जगणं

अनेक प्रश्न घेऊन आयुष्याशी लढणं !

वर्तमानाची चिंता

भविष्याचे प्रश्न घेऊन

रोजचा दिवस ढकलणं!

“ती” च नाही महत्त्व

घराला नी समाजाला

तिच्या वेदना जाणून घ्याव्याशा

वाटत नाही कुणाला?

जीवनाच्या वाटचालीत धीर देत..

मार्गक्रमणा करित असते

अनपेक्षित घडले की

असहाय्य बनते?

जीवनाच्या भयानक भोवर्‍यात

अजाणता सापडते..!

जीवनाच्या वळणावर मात्र

“आयुष्य ” मोठं प्रश्नचिन्ह बनतं?

समस्येची उकल ही

करावीच लागणार!

आनंददायी तेजोमय यश

कि गडद काळोखी अपयश..!

हे प्रश्न मात्र क्षणाक्षणाला

विचलितचं करणार..!!

 

पुराणामध्ये स्त्री शक्तीला वंदन केले आहे.. स्त्री ही अनादीकाळापासून शक्ती स्वरूपात आहे. बदलत्या परिस्थितीत त्याची परिभाषा जरूर बदलली आहे.. कोणत्याही कठीण काळात स्त्री ही सर्वदाच अग्रणी असते  म्हणून “महिला” सशक्तीकरण हे आधुनिक नसून पौराणिकच आहे…

बदलत्या परिस्थितीत मात्र स्त्रीची भूमिका बदलली आहे. ती मुलगी, सून, पत्नी, माता ह्या भूमिकां  व्यतिरिक्त ती अधिकारी, वैज्ञानिक, शिक्षक, कर्मचारी, मालक, अशा अनेक रूपांनी नटलेली आहे. तिच्या जीवनाला अनेक पैलू लाभलेले आहेत. आणि त्यांना तिने  अधिक चमक आपल्या कर्तृत्वाने दिली आहे. आपल्या बुद्धीला, आत्मसन्मानाला तिने नवीन दिशा दिली आहे. आजच्या जगात असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे स्त्री नाही. प्रत्येक क्षेत्रात ती पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे तर काही ठिकाणी ती पुरूषांच्या देखील पुढे आहे.. ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तर असे वाटते की आम्हाला आमची जागा मिळाली आहे. पण माझ्या मते अजून आम्हाला बरेच प्रयत्न करायचे आहेत…

जाता जाता मी म्हणेन की निरोगी हसतमुख आणि शांत स्त्री घराचे वैभव असते.तिचे स्वःताचे अस्तित्व परिपूर्ण असते.तू विधात्याची नवनिर्माणाची कलाकृती आहेस. एक दिवस तरी तू स्वःताच्या अस्तित्वाचा दिवस साजरा कर..

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments