डॉ अभिजीत सोनवणे
विविधा
डॉक्टर फॉर बेगर्स डॉ अभिजीत सोनवणे ☆
☆ आई—!!! भाग 3 ☆
(©️doctor for beggars )
(“म्हणजे तुम्ही त्याला माफ केलंत ! “ ) इथून पुढे —-
“ माफ करणारी मी कोण ? कुणाचा तरी सांभाळ कर अशी माझ्यावर कुणीतरी जबाबदारी टाकली होती, आई म्हणुन मी ते कर्तव्य केलं… आता त्याने माझा सांभाळ करावा असा हट्ट मी का धरु ? मुलानं माझी परतफेड करावी असं वाटणं…तिथंच आईपण संपतं… ! “
“ हो ना पण, मुलाला त्याचं कर्तव्य कळू नये ? “
“ डाॕक्टर, रस्त्यांत खडे टोचतात म्हणुन रस्त्यांवर कुणी गालिचा अंथरत नाही, आपण आपल्या पायात चप्पल घालावी– त्याला त्याचं कर्तव्य कळेल न कळेल… आपण कशाला कुणाला शिकवायला जायचं ? आपलं काम करत रहायचं, फळाची अपेक्षा न धरता… !”
गीतेच्या ग्रंथाला हातही न लावता, गीतेतला एक अध्याय मला आज्जीकडुन समजला होता.
“ चला डाॕक्टर, निघते मी… माझं पोरगं घरी एकटंच असेल… मला जायला हवं आता…! “
“ क्काय…??? “ मी जवळपास किंचाळलो असेन… कारण या वाक्यावर ती दचकली होती.
“ अहो आज्जी, आत्ताच तर म्हणालात ना… एक मूल लहानपणीच वारलं– बहिणीचा सांभाळलेला मुलगा सोडून गेला… आता हे काय… ? ”
ती मंद हसली. म्हणाली, “ सांगेन पुन्हा कधी भेट झाली तर… आधी मला केळी घ्यायला पाहिजेत कुठुनतरी…”
“ नाही आज्जी, आत्ताच सांगा… प्लीज… माझ्या मनातनं हे जाणार नाही… “
ती शांतपणे म्हणाली, “ अहो डाॕक्टर, कोरोनाच्या तपासणीसाठी दवाखान्यात गेले होते, तेव्हा ठरवलं होतं, चाचणी पाॕझिटीव्ह असेल तर उत्तमच. नाहीतर येतांना सरळ एखाद्या गाडीखाली झोकुन द्यायचं. “
“ मग…? “ आवंढा गिळत मी म्हटलं.
“ मग काय ? जगायचं कसं आणि मरायचं कुठं हा विचार करत पडले असतांना माझं लक्ष शेजारच्या खाटेवर गेलं…साधारण चाळीशीचा एक मुलगा त्या खाटेवर होता—- कमरेखाली अधु !
मी त्याच्याकडे पाहिलं… ! डोळे मिचकावत मला म्हणाला… ” काय होनार नाय मावशी तुला, काळजी करु नको… अगं आजुन लय आयुष्यं हाय तुला..!”
“ हा कोण कुठला ? स्वतःच्या जगण्याची खात्री नाही आणि मला जगण्याचं बळ देतो… ?
मावशी म्हणतो… ?—- हा निराधार अपंग… रस्त्यांवर राहतो… माझ्यासारखाच तपासणीसाठी आणलेला…!— मरण्याचे विचार घेवुन वावरत असतांना वाटलं… आज माझं मूल जिवंत असतं तर याच्याच एव्हढं नक्की असतं.– ज्या काळात तो गेला… त्याचकाळात त्याच्याऐवजी समजा मीच गेले असते तर त्याचीही अवस्था आज अशीच अपंग आणि निराधार झाली असती… तो ही आज रस्त्यावरच असता…!–डाॕक्टर , त्या अपंग मुलात, मला माझं मुल दिसलं. आमच्या दोघांच्या तपासण्या निगेटिव्ह आल्यावर मी त्याला माझ्याकडे घेवुन आले—त्या दिवशी मी परत आई झाले हो… मरायचं म्हणुन ठरवुन गेलेली मी… येताना आई होवुन, लेकरु घेवुन आले. “
—मला काय बोलावं सुचेना. डोळ्यांतुन माझ्या झरझर पाणी वाहु लागलं.
“ आज्जी, आधीच तुमची कमाई काही नाही, पेन्शन पुरत नाही… त्यात अजून एका व्यक्तीला घेवुन आलात सांभाळायला…?” मी आश्चर्याने विचारलं.
“ डाॕक्टर, आईला आपलं मुल सांभाळायला पैसे लागत नाहीत. आईला व्यवहार कधीच कळत नाही… ! शिवाय पैसा जगायला लागतो…जगवायला नाही…! “
“ म्हणजे … ? “ मी आ वासून विचारलं.
“ म्हणजे, जो स्वतःचा विचार करत स्वतःपुरता जगतो त्याला पैसे लागतात… पण आपण जेव्हा “स्व” सोडुन दुस-याला जगवायचा विचार करायला लागतो… त्यावेळी त्या दोघांची काळजी कुणी तिसराच करत असतो…आपण फक्त त्या तिस-यावर विश्वास ठेवायचा ! “
मी हे तत्वज्ञान ऐकत मूकपणे उभा होतो.
“ मोठी झालेली मुलं, आपल्या आईला त्यांच्या घरात राहण्याचं भाडं मागतीलही कदाचित् … पण नऊ महिने गर्भाशयात राहण्याचं भाडं आईनं कधी मागितल्याचं माहित आहे का ?–आईला व्यवहार कधीच कळत नाही डाॕक्टर ! “
मी शहारलो हे ऐकून… !
‘आज्जी, आधीचे दोन वाईट अनुभव बघता, हा पण गेला सोडुन तर ? पुढं तुमचं काय ?’ मी चाचरत बोललो.
‘डाॕक्टर, हा सोडुन गेला तरी, तो माझं आईपण घेवुन जावु शकणार नाही ना ?
एखादी स्त्री जेव्हा बाळाला जन्म देतो… त्यावेळी नुसतं बाळच जन्माला आलेलं नसतं… एक आई पण जन्म घेते त्याचवेळी… !
दोन जीव जन्मतात त्यावेळी… एक मुल आणि एक आई !
जन्माला आलेल्या त्या बाळाने आईला, आईपण हे त्याच्या जन्मावेळीच बहाल केलेलं असतं… हे लाभलेलं आईपण कोण कसं काढुन घेईल ?
मी काय बोलणार यावर—–
क्रमशः —-
© डॉ. अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈