सौ. अमृता देशपांडे
विविधा
☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 4 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
चिंतन लहानपणापासून हुशार मुलगा. पहिला नंबर कधीच सोडला नाही. मित्रांच्यात प्रिय, शिक्षकांच्यातही लाडका . तो सातच वर्षाचा होता, तेव्हा त्याचे वडील स्वर्गवासी झाले. आईनं नोकरी करून उपजीविका केली. चिंतन आणि त्याच्या बहिणीनं कधीच आईकडे काही मागितलं नाही, कसलाच हट्ट केला नाही. शाळा, अभ्यास, परीक्षा, स्पर्धा, आणि क्रिकेट, बस्स, इतकंच! इतकंच त्याचं जग.दहावी ला 94% मार्क मिळाले, राज्यात सहावा व शाळेत पहिला आला. आईला झालेला आनंद तिच्या डोळ्यांतून घळाघळा वहाणा-या पाण्यातून ओसंडत होता. पती गेल्याचं दुःख, मुलांना वाढवताना एकटीनं केलेला प्रवास , मुलांच्या भविष्याच्या काळजीने जागून काढलेल्या रात्री या विचारांनी मनात काहूर उठवलं होतं. चिंतन चं यश बघून ती कृतार्थ झाली. अनेक ठिकाणी अभिनंदनाचे सत्कारसोहळे झाले.त्याच्या शाळेत जेव्हा त्याचा सत्कार झाला तेव्हा त्याचं नाव पुकारताच सर्व शिक्षक आणि मुलांनी उभे राहून त्याच्यासाठी वाजवलेल्या टाळ्या आणि मुख्याध्यापकांनी त्याचं तोंडभरून केलेलं कौतुक बघून आईला तिचे अश्रू कसेच आवरता येत नव्हते. आयुष्याच्या एका महत्वाच्या टप्प्यावर तिला कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. त्यामुळे ‘ आसवांचा पूर माझ्या पापण्यांना पेलवेना’ अशी तिची अवस्था झाली.
(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)
© सौ. अमृता देशपांडे
पर्वरी – गोवा
9822176170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈