सौ. अमृता देशपांडे
विविधा
☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 5 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
मुलींच्या शाळेत ‘ सारेगमप ‘ स्पर्धा होती. नमिताची व ईशाची 30 मुलींमधून निवड झाली. इतर मुलीही होत्या. आठवडाभर प्रॅक्टीस आणि रविवारी स्पर्धा असे दोन महिने चाललं होतं. शेवटी फक्त दोनच स्पर्धक राहिले. नमिता आणि ईशा. दोघीही अतिशय तयारी करून आल्या होत्या. अंतिम टप्पा गाठला. दोघींचीही चार चार गाणी झाली आणि निकालाचा क्षण आला. मंचावर दोन स्पर्धक – दोघी मैत्रिणी होत्या. उत्सुकता, बावरलेपण, धडधडणारी छाती, दोघींही आतुरतेने वाट पाहत होत्या. एकमेकींचे हात घट्ट पकडून उभ्या होत्या. निकाल घोषित झाला. नमिता जिंकली होती. दोघीही एकमेकींना घट्ट मिठी मारून रडायला लागल्या. किती समजावले तरी थांबेनात. शेवटी मुख्याध्यापिका मंचावर गेल्या. त्यांनी दोघींना सावरले. त्यांनी नमिताला विचारले, “नमिता, तू का रडते आहेस? तू Winner आहेस ना?” नमिता रडतच बोलली, ” मॅडम, ईशा जिंकली नाही म्हणून मला वाईट वाटलं ” तर ईशा म्हणाली, ” नमिता Winner झाली म्हणून मला खूप आनंद झालाय, इतका कि मला रडू आलं ” .
अश्रू चं इतकं निरागस, सुंदर रूप दुसरं कुठलं असू शकेल?
नमिता, ईशा एकमेकींसाठी रडल्या. आपल्या यशापेक्षा जिवलग मैत्रिणीचं अपयश मनाला लागणं, आणि मैत्रिणी च्या यशात आपलं अपयश विसरून जाणं, हा मैत्रीचा आणि यश अपयश या दोन्ही ला योग्य प्रकारे सामोरे जाण्याचा धडा दोघींनी घालून दिला.
जर त्या भावना आवरून रडल्या नसत्या तर मैत्रीची, प्रेमाची जागा असूया, ईर्ष्या , हेवा यांनी घेतली असती. किती धोकादायक होतं ते! म्हणून त्या रडल्या ते योग्यच होतं ना!
(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)
© सौ. अमृता देशपांडे
पर्वरी – गोवा
9822176170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈