सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

डोळस दसरा…  ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले आणि डोळेझाक करता न येणार्‍या प्रसव वेदना तिला सुरू झाल्या.

डोळयाला डोळा लागत नव्हता . वेदनेने सुलोचना  डोळे घट्ट मिटत होती. अचानक तिच्या डोळ्यांपुढे काजवे पसरले, डोळ्यात पाणी तरळले ज्या क्षणाकडे ती डोळे लावून बसली होती तो क्षण आला आणि एका मोठ्या वेदनेच्या क्षणी ती प्रसूत झाली. वेदनेने तीचे डोळे बंद झाले. पण क्षणात टॅहॅ टॅहॅच्या आवाजाने तिने झटकन डोळे उघडले. जडावलेल्या डोळ्यातही मातृत्वाची वेगळी चमक दिसली आणि सुलोचनाने दसर्‍याच्या मुहूर्तावर जन्मलेल्या आपल्या परीला कुशीत घेत डोळे भरून पाहिले.

जणू शैलपुत्रीचे दर्शन तिला झाले होते. दसर्‍याच्या मुहूर्तावर जन्मली म्हणून तिचे नाव दुर्गा ठेवले.

डोळ्यात तेल घालून ती तिला जपत होती. जरासुद्धा डोळ्याआड तिला होऊ देत नव्हती. जणू काळजीचा तिसरा डोळाच तिला लागला होता. असे ब्रह्मचारिणीचे रूप तिचे १० वर्षाचे डोळ्याचे पाते लवते न लवते तोच संपले होते.

दुर्गा सगळ्य़ात हुषार होती.तिची हुषारी सगळ्यांच्या डोळ्यात येत होती. असे करता करता जणू ही चंद्रघंटा दहावीत प्रथम क्रमांकाने पास झाली होती. तेव्हा तिचे टपोरे डोळे अधिकच पाणीदार भासले होते. काहींच्या डोळ्यावर हे येत होते  डोळ्यात खुपत होते हे न कळायला तिने डोळ्यावर कातडे नव्हते ओढले.  पण ती त्याकडे काणा डोळा करायची.

दुर्गाची दहावी झाली आणि तिने मिल्ट्रीमधे जायचा हट्ट धरला. हे ऐकून सुलोचनाच्या डोळ्यांपुढे अंधेरीच आली .तिच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या . पण मिल्ट्रीत जायचा निर्धार दुर्गेच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. ती दुसर्‍या गावी जाणार म्हणजे दोन डोळे शेजारी पण भेट नाही संसारी अशी अवस्था होणार होती. तरी तेव्हा कुष्मांडासारखी ती धैर्यशील भासत होती.

ट्रेनिंग घेत असतानाच एक मुलगा एका मुलीची छेड काढत असलेला तिच्या डोळ्यांनी पाहिले. डोळ्यात अंगार भरला तिने त्याला पकडला . डोळे वटारून तिने त्याला अपादमस्तक न्याहाळले. खाडकन त्याच्या मुस्कटात लगावून डोळे फडफडवून तिने त्याला समज दिली पुन्हा जर वाईट नजरेने मुलींकडे बघशील तर डोळे काढून गोट्या खेळीन मग तुझ्या डोळ्याच्या खाचा होतील.  त्याच्या डोळ्यात मूर्तीमंत भिती दाटली .डोळे पांढरे झाले. माफी मागून त्याने कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली. तिचे ते रूप स्कंदमातेप्रमाणे करारी तरीही क्षमाशील भासले.

हे तिचे रूप शिवाच्या डोळ्यात भरले. ज्या डोळ्यात धाक होता त्याच डोळ्यांना डोळा भिडवला .तिने डोळे आले आहेत या बहाण्याचेही काही चालले  नाही. वेगळा भाव त्यामधे दाटताच तिला डोळा मारला. तिच्या पाणीदार डोळ्यांकडे तो डोळे रोखून पाहू लागला. तिला डोळे फिरवणे शक्यच नाही झाले. क्षणात तिने डोळे झुकवले.  हे तिचे रूप त्याला कांत्यायनी सारखे भासले.

अर्थातच डोळ्यात धूळ फेकणे कोणाला शक्यच नव्हते. डोळ्यात डोळे घालणे चालूच होते. ती मिल्ट्रीमधे रुजू झाली. तो पण कॅप्टन पदावर होता. तरीही दुर्गा त्याला पहाताच नकळत डोळे मोडीत चालायची. दुर्गाला चांगली नोकरी लागावी हे स्वप्न असतानाच चांगला जोडीदार मिळाला पाहून आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे याचा प्रत्यय आला होता.  घरच्यांनी त्यांचा शानदार विवाह लावून दिला. असा सोहळा पाहून डोळ्याचे पारणे फिटले . कौतूक आनंद कोणाच्याच डोळ्यात मावत नव्हते. हे रूप सगळ्यांनाच  महागौरीचे वाटले.

लग्नानंतर तिने तिचे काम चालूच ठेवले होते. अनेक नराधमांचे लागलेले डोळे उखडले होते. त्यांना समज देऊन डोळे उघडले होते. उघड्या डोळ्यांनी जग बघायला शिकवून  डोळे असून आंधळ्यासारखे राहू नये शिकवताना डोळ्यात अंजन घातले होते. हे तिचे रूप कालरात्रीचे भासले.

नंतर मात्र अचानक तिच्या जीवनात एक दुर्घटना घडली. तिच्या सासर्‍यांच्या डोळ्यात फुल पडले . डॉक्टरही कधी कधी डोळ्यात कचरा कानात फुंकर सारखी ट्रिटमेंट देतात याचा अनुभव आला. त्या नादात सासर्‍यांचे डोळे फुटले होते. त्यांचे डोळे निर्विकार झाले होते. तिचे प्रथम कर्तव्य  सासर्‍यांची सेवा करणे असल्याने तिने राजीनामा दिला होता. तिच्या डोळ्यांचा पहारा कायम ती देत होती.

अशातच तिच्या पण तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या आणि चाचणीअंती समजले की तिला आतड्याचा कॅन्सर आहे आणि ती काही दिवसांचीच पाहुणी आहे.  ती दिसायला चांगली होती पण आतून तब्येत बिघडली हे पाहून डोळे व कान यात चार बोटांचे  अंतर असते  हे पटले होते. सासर्‍यांच्या डोळ्यात पडलेल्या फूलाचे कुसळ तिला दिसले होते पण स्वत:च्या डोळ्यात म्ह्मणजे तब्येतीत घुसलेले मुसळ तिला दिसले नव्हते.

सगळ्यांच्याच डोळ्यांपुढे आता पुढे काय हे प्रश्नचिन्ह उभे होते. तर दुर्गेला तिच्या सासर्‍यांबद्दल डोळा हेकणा किधर भी देखणा असे कोणी म्हणू नये असे वाटल्याने डॉक्टर आणि शिवाला सांगून नेत्रदान करण्याचा व डोळे सासर्‍यांना बसवण्याचा निर्धार सांगितला. ती खूप थकली होती. तिचे डोळे किलकिले होत होते. ती मुश्किलीने डोळे उघडे ठेवण्याचा प्रयत्न करीत होती पण तिला ते जमत नव्हते. तिचा डोळा लागला आहे असे वाटत असतानाच तिचे डोळे निवले आहेत आणि तिने कायमचे डोळे मिटले असल्याचे डॉक्टरने सांगितले.

लगबगीने डोळ्यांच्या डॉक्टरांनी तिचे डोळे काढून एक तिच्या सासर्‍यांना आणि एक गरजूला बसवला होता. दोन्ही ऑपरेशनस् यशस्वी झाली होती. आता ती डोळ्यांच्या रुपाने या दुनीयेत शिल्लक होती. तशातही तिचे रूप सिद्धीदात्रीचे भासले

शिवाला तिच्या कार्याचा फार अभिमान होता. आज दसरा होता आणि दुर्गेचा वाढदिवस , प्रथम स्मृतीदिन होता. त्याने दवाखान्यात जाऊन नेत्रदानच नाही तर देहदानाचा फॉर्म भरला होता. खर्‍या अर्थाने एक डोळस दसरा आज साजरा केल्याचे समाधान त्याच्या डोळ्यातून ओसंडत होते.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments