डॉ अभिजीत सोनवणे
विविधा
डॉक्टर फॉर बेगर्स डॉ अभिजीत सोनवणे ☆
☆ 15 आॕगस्ट … माझाही स्वातंत्र्य दिन !!! – भाग ५ ☆
जवळचे लोक मला नेहमी विचारतात, “ आभ्या, इतकं सगळं करून तू काय कमावलंस—-?”
मी खूप काही कमावलंय—–
—-आदरणीय सिंधुताई सपकाळ उर्फ माई यांनी मला मुलगा म्हणून मला स्वीकारलं, हे पुत्रत्व मी कमावलं !
—-आदरणीय राणीताई बंग यांचा हात डोक्यावर मायेने पडला, तो मायेचा हात मी कमावला …!
—-आदरणीय डॉक्टर प्रकाश आमटे यांनी हूरूप देऊन सामर्थ्य दिले, हात धरून शक्ती दिली, ती शक्ती मी कमावली…!
—-शास्त्रज्ञ आदरणीय रघुनाथ माशेलकर यांनी पोटाशी धरुन उच्चारलेले–” I am proud of you my child “ हे शब्द — या शब्दांतुन child असणं मी कमावलं !
—-सुपर कॉम्प्युटर चे जनक श्री विजय भटकर म्हणाले होते, “ मी कॉम्प्युटर बनवला, पण तू माणूस घडवतो आहेस— “ –मी हा “विजय” कमावला…!
—-विश्वास नांगरे पाटील सर म्हणाले होते, ” भारीच करतोय तु राव कायतरी, आयुष्यात कधी अडचण आली तर मला फोन कर… हा घे माझा पर्सनल नंबर–” हा “विश्वास” मी कमावला… !
—-तुमच्यासारखे जवळचे लोक मी कमावले… !
—-जन्माला येताना माकड म्हणूनच जन्माला आलो… परंतु भीक मागणाऱ्या लोकांमध्ये राहून मी हळूहळू माणूस बनत गेलो… माणुस म्हणुन चेहरा मी कमावला… !
—” ते खरं रे आभ्या परंतु या बदल्यात तू गमावलंस किती… ? “
— अरे हो, खरंच मी खूप काही गमावलं सुद्धा आहे —-
—ह्या कामानं मी…’ मी ‘पणा गमावला !
—आपण कुणीतरी आहोत याचा अहंकार मी गमावला !
—केवळ स्वतःपुरतं जगायचं हा स्वार्थ मी याच कामामध्ये गमावला !
—स्वतःच्या चेहर्यावर लावलेला खोटा खोटा मुखवटा मी गमावला !
—सर आणि साहेब यांची खोटी प्रतिष्ठा गमावली—!
पोरा – लेकरा- बाळा या उबदार शब्दात मी विसावलोय आता—-
मला खुर्चीपेक्षा — उकीरडा आवडायला लागलाय आता !
मला उष्टं… खरकटं… शिळं … आणि नासकं जेवण आवडतं हल्ली, आणि आवडत राहील
—-तोपर्यंत —–
—-जोपर्यंत माझ्या भिकारी आईबापाला सन्मान मिळत नाही तोपर्यंत !
—-जोपर्यत माझा भिक्षेकरी कष्टकरी होत नाही तोपर्यंत !
—-जोपर्यंत तो गांवकरी होणार नाही तोपर्यंत !
—–माझ्या आईबापाला जेव्हा मी “ भिक्षेकरी “ या संबोधनापासून स्वतंत्र करेन तोच माझा स्वातंत्र्य दिन असेल … !
मी तर सारा लेखाजोखा मांडलाय …
आता अजुन कमवायचं राहिलं काय… ?
आणि गमवायचं राहिलं काय… ?
माय बापहो…तुम्हीच निवाडा करा… !
जयहिंद !!!
15 आॕगस्ट 2021
——समाप्त
© डॉ. अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स
सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357
ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈