श्री प्रमोद वामन वर्तक

?विविधा ?

☆ तो ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

आज मी ज्या विषयाला स्पर्श करणार आहे, हो तुम्ही बरोबरच वाचलेत, स्पर्शच करणार आहे असे मी फार जबाबदारीने म्हणतोय, त्याचे कारण म्हणजे या विषयाचा आवाकाच इतका प्रचंड आहे आणि त्या वरील दोन्ही बाजूने खूपच लिखाण अगोदरच झालेले आहे !

पण म्हणून माझ्या सारख्या, दोन्ही बाजूचे विचार वाचल्यावर, ज्याच्या मनाचा गोंधळ उडालेला आहे, अशा माणसाने त्या विषयी आपले मत व्यक्त करू नये असे थोडेच आहे?

“तो” अस्तित्वात आहे का नाही या विषयावर शतकानुशतके वाद चालू आहेत आणि जिथ पर्यंत मानव जात या पृथ्वीतलावर आहे, तिथपर्यत ते वाद असेच चालू राहतील यात कोणाला काडीचीही शंका घेण्याचे कारण नाही.

“तो”आहे असे मानणारा जो वर्ग आहे त्यांच्या मते, “त्याची” मर्जी असेल तरच झाडावरची पाने हलतात, फुले फुलतात एवढेच कशाला तर  “त्याच्या” मर्जीनेच चंद्र, सुर्य उगवतात अथवा मावळतात, पृथ्वी स्वतः भोवती गोल फिरते, वगैरे वगैरे. 

“तो’ नाहीच असे मानणारा जो वर्ग आहे, ते आपली बाजू मांडतांना विरुद्ध वर्गाची मते,  शास्त्रीय आधार देवून खोडून काढतात !

“त्याच्या” अस्तित्वाबाबतची दोन्ही गटांची मते, एक आहे रे आणि दुसरा नाही रे, आपण जर नीट वाचलीत, ऐकलीत,  तर आपल्या असे लक्षात येईल की ती दोन्ही मते इतकी टोकाची असतात की आपल्यास असे वाटवे की, एकजण उत्तर धृवा वरून बोलतोय तर दुसरा दक्षिण !  या मध्ये माझ्या सारख्या माणसाचा फारच म्हणजे फारच पोपट होतो बुवा  !  म्हणजे कधी उत्तर धृवाचा जे बोलतोय ते खरे वाटाते, तर कधी दक्षिणेचा जे सांगतोय ते पण पटावे !

मी या बाबतीत एक observe  केले आहे की, दोन्ही धृवावरील लोकांचे इतके प्रचंड brain washing झालेले असते, की त्यापैकी कोणीही दुसऱ्या बाजूचे मत ऐकण्याच्या मनस्थितीत कधीच नसतो. फक्त आपापल्या धृवावरुन आपणच कसे बरोबर आहोत, हेच  ओरडून ओरडून सांगत असतो आणि एकमेकास challenge करीत असतो !

हे उत्तर आणि दक्षिण ध्रुववाले आपापल्या विचाराने इतके भारावून गेलेले असतात, की

या दोन्ही गटांना आपला काही लोकांकडून राजकारणासाठी कसा उपयोग करून घेतला जातो आहे, हे त्यांच्या लक्षातच येत नाही म्हणा, अथवा त्या योगे आपल्याला मिळणाऱ्या प्रसिद्धीच्या पुढे ते त्याकडे काणाडोळा करीत असावेत !

पण या सगळ्या गोंधळात, त्या दोन्ही गटांकडे तटस्थपणे पाहणाऱ्या लोकांचा मला फार म्हणजे फार हेवा वाटतो ! हे लोक दोन्ही बाजू अगदी लक्षपूर्वक ऐकल्याचे दाखवतात आणि शेवटी आपल्या जे करायचे आहे तेच करतात !

समजा, आपल्या अत्यंत जवळच्या अशा प्रिय व्यक्तीचे त्याच्या जीवावर बेतणारे,  operation एखाद्या डॉक्टरने आपले कौशल्य पणाला लावून, आठ-नऊ तास खर्च करून, आपल्या त्या प्रिय व्यक्तीचे प्राण वाचवले असतील, तर त्या डॉक्टर मध्ये एखाद्याला “तो” दिसू शकतो !

मला असे वाटत की “तो” कधी कुणाला कुठे दिसेल याचा नेम नाही.  एखाद्याने आपल्याला अत्यंत अडचणीच्या वेळी जर योग्य मदत केली असेल आणि आपले त्या वेळेस जीवावरचे संकट दूर झाले असेल, तर आपण “त्याला” मदत करणाऱ्या माणसात बघतो आणि त्याचे उपकार जन्मभर विसरत नाही !

मग मला प्रश्न असा पडतो की “तो” खरच आहे का नाही आणि असलाच तर त्याचे नेमके रूप काय ? यावर निर्गुण, निराकार असे शब्द आपल्याला ऐकवले जातात ! पण त्याने माझे तरी समाधान होत नाही बुवा !

माझ्या मते आपण जर “त्याला” नीट शोधण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या रोजच्या जीवनात “तो” आपल्याला ठाई ठाई दिसत असतो, अनुभवायला येत असतो, पण त्या साठी आपली नजर पारखी पाहीजे !

आपल्याला सुद्धा अशी पारखी नजर लाभो हीच सदिच्छा !

© प्रमोद वामन वर्तक

ठाणे.

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest


0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments