विविधा
☆ तारा…भाग – 10 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆
वालीच्या मरणाचे दुःखाने सुग्रीवाला, अंगद व ताराला शोकावेग आवरेनासा झाला. अखेर श्रीराम त्यांचे सांत्वन करण्यास पुढे आले. श्रीरामाची तेजस्वी मूर्ती पाहुन तारा हात जोडून म्हणाली, ” रघुनंदना ! आपण अप्रमेय जितेंद्र आहात. आपली किर्ती जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत तोपर्यत राहील. आपण क्षमाशील, पराक्रमी, बलवान, संयमी, सत्शील, दीनांचा कैवारी, ऐश्वर्यसंपन्न आहात, म्हणून माझी एक विनंती पूर्ण करावी ! ज्या बाणाने आपण वालीचा वध केला त्याच बाणाने मला मारुन मुक्ती द्यावी. स्रीहत्येचे पातक आपल्याला लागणार नाही, कारण मी व वाली एकच आहोत, आमचा आत्मा एकच आहे. वालीबरोबर मला समर्पण करुन त्याला माझं दान केल्यास मी माझ्या पतीजवळ जाऊन त्यांच्याबरोबर स्वर्गात सुखाने राहीन.”
ताराचा विलापयुक्त विचार ऐकून श्रीराम सद्गदित होऊन म्हणाले, “देवी ! तू वीरपत्नी, वीरमाता, महासती आहेस. तू एवढी विदूषी असूनसुध्दा मृत्युविषयी असे विपरीत विचार कसे करू शकतेस? विधात्याने या जगाचे काही नियम केलेले आहेत. तोच या जगाची रचना करतो. तोच पोषण करतो व संहारही तोच करतो. त्याच्या नियमांचे उल्लंघन कोणीही करु शकत नाही. वालीला वीरमरण, श्रेष्ठगती मिळाली आहे . त्याच्याबद्दल शोक न करता पुढील कर्तव्याची जाणीव ठेव ! अंगदसारख्या शूर, पराक्रमी, सद्गुणी पुत्राला राज्यावर बसवून राज्याची धुरा निष्कंटकपणे चालव. त्यातच तुझे कल्याण आणि मोक्ष आहे. विधात्याची ही आज्ञा समजून कार्य कर !”
“तू खर्या अर्थाने महासती आहेस. तू थोर पतिव्रता असल्याने वालीनंतर राज्याचे शकट हाकण्याचे नवे सतीचे वाण घेऊन हे कार्य सिध्दीस नेणे तुझे परम कर्तव्य आहे.”
श्रीरामांच्या सांत्वनपर शब्दांनी व उपदेशाने ती शांत झाली. धीराने अश्रू आवरुन अंगदला व सुग्रीवला धीर दिला. वालीचा अंत्यसंस्कार सम्राटाच्या इतमाला अनुसरुन साजरा केला.
वालीनंतर सुग्रीवचा राज्याभिषेक करुन त्याला राज्यावर बसविले. त्याची पत्नी रुमा त्याला परत मिळाली. तारा खऱ्या अर्थाने “राजमाता” झाली. प्रजेचे हित व कल्याण कसे होईल याबद्दल ती सतत दक्ष असे.
सुग्रीवाच्या राज्यभिषेकानंतर चार महिने पावसाळा असल्यामुळे रामकार्यात मदत करणे अशक्यच होते. परंतु या दिवसांमध्ये सुग्रीव ऐषारामात तुडुंब डुबून गेला, रामकार्याचा त्याला संपूर्ण विसर पडला. सतत अंतःपुरात राहून मदिरा व मदिराक्षीच्या पूर्ण आहारी गेला. राम अत्यंत अस्वस्थ व अशांत झालेले पाहून लक्ष्मणाचा संताप अनावर झाला. धनुष्याचा टणत्कार काढीतच तो सुग्रीवाकडे येऊन त्याला ललकारु लागला. लक्ष्मणाचा भयानक रोष पाहून सर्व वानरसैन्य व स्वतः सुग्रीवदेखील भयभीत होऊन घाबरले. लक्ष्मणाला शांत करण्यासाठी सुग्रीवाने ताराला पुढे पाठविले. तारा अतिशय सावध, धीरगंभीर होती. ती अत्यंत कर्तव्यदक्ष असून सगळीकडे बारीक लक्ष ठेवून होती.
क्रमशः…
संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈