श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- ‘आपल्यासाठी आपल्या हिताचं काय हे आपल्यापेक्षा त्याला जास्त समजतं. तो यश देतोच. क्वचित कधी अपयश आल्यासारखं वाटलं तरी त्यातच आपलं हित आहे हे नंतर जाणवतंच’ कधीकाळी बाबांच्या तोंडून कानावर पडलेल्या या शब्दांचा रोख गेल्या दोन-तीन महिन्यात घडलेल्या माझ्या संपूर्ण आयुष्याला नेमकी आणि वेगळी कलाटणी देणाऱ्या घटनांकडेच असावा असा विश्वास वाटण्याइतका या शब्दांचा नेमका अर्थ या अनुभवांनी मला समजून सांगितला होता.’त्या’ला मी इतकी वर्ष मानत आलो होतो.या सर्व घटनाक्रमांच्या निमित्ताने ‘त्या’ला जाणण्याची प्रक्रियाही माझ्या मनात नकळत सुरू झाली!)

असोशीने धरून ठेवायला धडपडत होतो ते हातातून निसटून गेलं होतं आणि जे मिळणं शक्यच नाही असं गृहित धरलं होतं ते मात्र अगदी अनपेक्षितपणे मला मिळालं होतं! स्टेट बँक आणि युनियन बँक यांच्या बाबतीतले परस्परविरोधी  असे हे दोन प्रसंग ‘सगळं सुरळीत होईल,काळजी नको.’ हे बाबांचे शब्द सार्थ ठरवणारेच होते!

समोर गडद अंधार पसरलेला असताना निरंजन साठे माझ्या आयुष्यात आले होते. आणि मला डॉ. कर्डकांकडे  सुपूर्द करून गेले होते.होय.कारण मला नेमणूकपत्र मिळालं ते होतं डाॅ.कर्डक यांच्याच अधिपत्याखालील रेक्रूटमेंटसेलला जाॅईन होण्यासाठीचं!डाॅ.कर्डक आणि निरंजन साठे यांचं हे अल्पकाळासाठी असं माझ्या आयुष्यात येणं माझ्या मनावर  अमिट ठसा उमटवणारे ऋणानुबंध जसे तसेच माझ्यावरील ‘त्या’च्या कृपालोभाची प्रसादचिन्हेसुद्धा!

युनियन बँकेत मी १३ मार्च १९७२ रोजी जॉईन झालो आणि एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. बँकिंगक्षेत्रातल्या माझ्यासारख्या नवोदितांना सुरुवातीचा सहा महिन्यांचा प्रोबेशन पिरिएड म्हणजे खूप मोठे दडपण वाटत असे.तो प्रोबेशन पिरिएड समाधानकारक पूर्ण झाला तरच नोकरीत कायम केल़ जायचं. हे सहा महिने रजाही मिळणार नव्हती. म्हणून मग जॉईन होण्यापूर्वीच मी घरी जाऊन सर्वांना भेटून यायचं ठरवलं. त्या भेटीत समाधान मात्र मिळालं नाहीच. हळूहळू परावलंबी होत चाललेले माझे बाबा अंथरुणाला खिळून होते. त्यांच्या नेमक्या गरजेच्यावेळी मला त्यांच्याजवळ रहाता येत नाहीये या विचाराने मी अस्वस्थ होत असे.त्यांचा निरोप घेऊन निघालो तेव्हा अंथरुणावर पडल्या पडल्याच त्यांनी स्वतःचा थरथरता हात क्षणभर कसाबसा  वर उचलून मला आशीर्वाद दिला. तेच हळवे क्षण सोबत घेऊन मी बाहेर पडलो आणि आयुष्यातल्या नव्या वाटेवर पहिलं पाऊल टाकलं!

लवकरच माझ्या निर्णयक्षमतेची कसोटी पहाणारं एक प्रलोभन  माझी वाट पहात दबा धरून बसलेलं होतं याची मला तेव्हा कल्पनाच नव्हती. माझा प्रोबेशन पिरिएड संपला आणि मी नोकरीत कन्फर्म झालो,त्याच दिवशी मला एक पत्र आलं आणि ते युनियन बँकेतल्या सुरळीत सुरू झालेल्या माझ्या रुटीनला परस्पर छेद देणारं ठरलं!

पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे मध्यंतरीच्या काळात मी भावाच्या सल्ल्याप्रमाणे स्टेट बँकेच्या नवीन भरतीच्या जाहिरातीनुसार पुन्हा अर्ज केला होता आणि तिथे नव्याने पुन्हा रिटन टेस्ट न् इंटरव्ह्यूही देऊन आलो होतो. अर्थात तेव्हा माझ्या दृष्टीने तो फक्त एक उपचार होता. म्हणूनच असेल मी ते विसरूनही गेलो होतो. पण नेमकी त्याचीच आठवण करून देणारं हे पत्र होतं. स्टेट बँकेकडून नवीन अपॉइंटमेंट ऑफर करणारं ते पत्र पाहून मला क्षणभर आश्चर्यच वाटलं.दुसऱ्याच क्षणी आता यापुढे कसलीच अस्थिरता नको असंच वाटत राहिलं. हातचं सोडून पळत्याच्या मागे लागणं योग्य ठरेल? पुन्हा नवीन नोकरी, पुन्हा सहा महिन्यांचा प्रोबेशन पिरियड..सगळं सुरळीत होईल? आणि नाही झालं तर? पुन्हा ती विषाची परीक्षा नकोच‌.

मी ते पत्र ड्राॅवरमधे ठेवून दिलं आणि तो विषय माझ्यापुरता मिटवून टाकला. घरी सविस्तर तसं कळवून टाकलं. माझं पत्र मिळताच भावाचा लगेच फोन आला. त्याने मला वेड्यातच काढलं.म्हणाला,

“हे बघ,असा अविचार करू नकोस. आजच तुझ्या पत्राला मी सविस्तर इन्लॅंडलेटर लिहिलंय.आईलाही कांही लिहायचंय म्हणाली म्हणून ते घरी तिच्याकडे ठेवून आलोय. तिचं लिहून झालं कि ती ते पोस्टात टाकेल. सर्वबाजूने विचार केला तरीही स्टेट बँक जॉईन करणंच तुझ्या हिताचं आहे हे लक्षात ठेव. ते कसं हे सगळं सविस्तर पत्रात लिहिलंय. ते वाच आणि तसंच कर.”

मी मनाविरुद्ध ‘हो’ म्हटलं आणि फोन ठेवला. लगेच त्याचं पत्रही आलं. पत्रातला प्रत्येक मुद्दा योग्य आणि बिनतोड होता.

एकतर त्या काळी या परिसरात युनियन बँकेच्या फक्त दोन ब्रॅंचेस होत्या. कोल्हापूर आणि जयसिंगपूर.याउलट स्टेट बँकेचं ब्रॅंचनेटवर्क मात्र तालुका  पातळीपर्यंत विस्तारलेलं होतं. त्यामुळे युनियन बँकेत बदली मिळणं शक्य नव्हतंच पण स्टेट बँकेत मात्र अल्पकाळात सोईच्या जागी सहजपणे बदली मिळू शकणार होती.पे स्केल्स आणि इतर सवलतीही  युनियन बँकेच्या तुलनेत स्टेट बँकेच्याच आकर्षक होत्या. युनियन बँकेची प्रमोशन पॉलिसी ‘स्ट्रीक्टली ऑन सिनॅरीटी बेसिस अशीच होती, त्यामुळे प्रमोशनच्या संधी जवळजवळ नव्हत्याच.स्टेट बँकेत मात्र हीच पॉलिसी मेरीटला प्राधान्य देणारी होती.

हे सगळं वाचून पुन्हा उलटसुलट विचार मनात गर्दी करू लागले. आईने लिहिलेला मजकूर वाचून तर मी हळवाच होऊन गेलो. मी लवकरात लवकर जवळचं पोस्टींग मिळून तिकडं यावं म्हणून ती अधीर झाली होती. तिने लिहिलेला शब्द न् शब्द माझ्या मनात रुतत चालला होता.

‘हे झोपूनच असतात.बोलणं जवळजवळ हवं-नको एवढंच. त्यांना त्रास नको म्हणून या विषयी मुद्दाम काही सांगितलेलं नाहीये.तू जवळ आलास, अधून मधून कां होईना भेटत राहिलास तर त्यांनाही उभारी वाटेल.’

हे वाचून बाबांच्या आठवणीने मी व्याकुळ झालो. भावनेच्या आहारी जाऊन कां होईना पण मी मन घट्ट केलं. आता ‘स्टेट बँक’ हेच आपलं नशीब हे स्वीकारलं. युनियन बँक सोडायची हा निर्णय पक्का झाला. पण तरीही मनाला स्वस्थता कशी ती नव्हतीच.

‘बाबा हिंडतेफिरते असते तर त्यांच्याशी बोलता आलं असतं. त्यांनी योग्य तो मार्ग नक्कीच दाखवला असता.’ हा विचार मनात घोळत असतानाच मी हातातल्या इन्लॅंडलेटरची घडी घालू लागलो आणि क्षणभर थबकलोच. आत दुमडायचा जो आडवा फोल्ड असतो तो उलटा धरून त्यावर गिजबीट अक्षरात कांही मजकूर लिहिला असल्याचं माझ्या लक्षात आलं. पाहिलं आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. हे बाबांनी तर लिहिलं नसेल? छे! कसं शक्य आहे?बाबांचं अक्षर आणि असं? विश्वासच बसेना. पण ते बाबांनीच लिहिलेलं होतं! थरथरत्या हाताने लिहिल्याचं स्पष्ट जाणवत होतं. आणि म्हणूनच ते वेडंवाकडं आणि केविलवाणं दिसत होतं. मात्र प्रयत्नपूर्वक एकेक अक्षर जुळवायचा आटापिटा करून मी ते वाचल्यानंतर जे कांही हाती लागलं ते मात्र खरंच लाखमोलाचं होतं!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments