सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

तमसो मा ज्योतिर्गमय — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आषाढी अमावस्या !! दीप पूजन…. काय बरं कारण असावं? ज्या दिव्यांनी पूजा करायची त्याच दिव्याची पूजा करायची?

विचार करताना वाटले आपण ज्याचे उपकार घेत असतो त्याला वर्षातून एकदा तरी कृतज्ञतेची पावती द्यावी हा संस्कार तर यातून देत असावेत. 

म्हणजे बघा ना, वर्षभर पूजेसाठी रोज आपण ज्या ज्या दिव्यांनी देवांना औक्षण करतो, ज्या दिव्यांनी वाढदिवस, स्वागत, सण समारंभ ई. महत्वाचे दिवस आनंदी, सकारात्मक करतो त्या दिव्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज दिव्यांचीच पूजा केली जात असावी.

श्रावण महिना तर सणांचा राजाच. दररोज म्हटले तरी पूजा अर्चा चालू असते. मग अशावेळी दिवे स्वच्छ केलेले असले तर कामं सोप्प ना? मग त्या निमित्ताने दीप पूजन म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारल्या सारखेच ना?

पण मग आजीने सांगितले, समई ही घरातील कर्त्या बाईचे प्रतीक आहे. त्या मधे असलेली वात म्हणजे तिचा प्राण आणि त्यातून निर्माण झालेली ज्वाला म्हणजे दिवा. बघा सगळे त्या समईचेच कर्तृत्व… पण किती सहज ती हे कामं त्या दिव्याच्या नावाने करते? 

म्हणजे असते समई… ती 

तिच्यातली ज्योत….. ती 

तिच्यातली ज्वाला…. ती 

पण हे सगळे मिळून तो… दिवा.

समई, मशाल, निरंजनाची आरती, मेणबत्ती, मंदिरात असलेल्या हंड्या, दिवटी, कंदील हा शब्द वापरत असले तरी तो शब्द मराठी नाही, त्याला बत्तीच म्हणायचे, पणती,अजूनही दिव्यांची रूपे ही स्त्रीलिंगीच आहेत पण नाव मात्र दिव्याचे….

हेच तर आपल्या संस्कृतीचे खरे प्रतीक… संसाराच्या मंदिरात ही समई तेवत रहाते पण ती त्याचाशी एकरूप होऊन त्याच्या नावाने सगळे आनंदाने करताना घरदार उजळवून टाकते म्हणूनच घराचे मंदीर होते.

मग अशा समईला जेव्हा खरंच खूप काम असणार आहे त्या आधी थोडा आराम दिला तर नव्या दमाने नव्या जोषाने ती काम करू शकेल या भावनेतून फक्त डाळफळाचा नैवेद्य ( साधा सोपा स्वयंपाक ) म्हणजे स्वयंपाकातही तिला दिलेली ही थोडी सूट… म्हणजे तिच्या प्रती दाखवलेली कृतज्ञता…. अशा समयांचे अर्थात दिव्यांचे पूजन म्हणजे नारी कार्याची ठेवलेली जाण…. म्हणूनच काही ठिकाणी मातृका पूजनही असते.

अजूनही म्हणजे जेव्हा तो नसतो सूर्य / चंद्र हे नैसर्गिक दिवे, तेव्हा तिची रूपे त्याचे कार्य करू शकतात…. पण ती नसेल तर? देवाची किंवा इतर पुण्यकर्मे अधूरी…. ज्योतीतून ज्योत निर्माण करणे तिलाच जमते…. मग असे तिचे… पर्यायाने नारीचे महत्व जाणून तिच्या कार्याची जाण ठेऊन तिला कृतज्ञता द्यायचा आजचा दिवस…. अंधःकारातून खऱ्या अर्थाने तेजाकडे घेऊन जाणाऱ्या तिने ज्याला सर्वस्व अर्पण केले त्या दिव्याचा दिवस….

चला ते तेज तिचं महत्व खऱ्या अर्थाने जाणून घेऊ या आणि प्रार्थना करू…

ॐ असतो मा सद्गमय।

तमसो मा ज्योतिर्गमय।

मृत्योर्मामृतं गमय ॥

ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॥

– बृहदारण्यकोपनिषद् 1.3.28

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments