श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग २८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

 (पूर्वसूत्र– माझी यापुढची उत्कर्षाची वाट वळणावळणाची असणाराय असं सर म्हणाले ते अनेक अर्थांनी खरं ठरणार होतं आणि त्या वाटेवरचं पहिलं वळण हाकेच्याच अंतरावर माझी वाट पहात तिष्ठत थांबलेलं. पण आता मी निश्चिंत होतो. मनात उत्सुकता होतीच पण ना कसलं दडपण ना अस्वस्थता. कारण सर म्हणाले तसं ‘तो’ होताच माझ्या सोबत आणि त्या वळणवाटेवरही तो असणारच होता सोबतीला.. !)

प्रमोशन प्रोसेस अपेक्षेपेक्षा लवकरच आवरलं आणि जुजबी आवरावर करायलाही पुरेसा वेळ न देताच एक दिवस अचानक मला प्रमोशन मिळाल्याची बातमी आली आणि पाठोपाठ माझी ट्रान्सफर ऑर्डर! 

माधवनगरला झालेली माझी बदली पुढच्या उत्कर्षाच्या वाटेवरचं एक छोटसं वळणंच होतं पण ते इतकं हाकेच्या अंतरावर उभं असेल असं मात्र मला वाटलं नव्हतं. इथं येऊन कसंबसं एक वर्षच होत आलेलं आणि लगेचच निरोप घेऊन बाहेर पडायचा क्षण असा पुढे ठाकलेला!

या एका क्षणाने आमच्या छोटेखानी संसाराची सगळी घडीच विस्कटून जाणार होती. पण त्याचा विचार करायलाही आता फुरसत नव्हती. माझं पोस्टिंग ‘सोलापूर कॅंप’ ब्रॅंचला झालं होतं. गुरुवा‌री ४ आॅगस्टला आॅर्डर आली आणि दोनच दिवसांत म्हणजे शनिवारी रिलीव्ह होऊन मला सोमवारी सोलापूरला हजर व्हायचं होतं!इथल्या ऑफिसरुटीनमधल्या बारीकसारीक गोष्टी मार्गी लावण्यातच दोन दिवस कापरासारखे उडून गेले आणि बॅग भरून मी सर्वांचा निरोप घेऊन बाहेर पडलो.

सोलापूर कॅम्प ब्रॅंचला अनेक आव्हाने माझी वाट पहात होती. मी तिथे जॉईन झालो ती तारीख होती ८ऑगस्ट १९८८!

८-८-८८ हा तारखेतला एकाच संख्येचा विचित्र योगायोग मला गंमतीचा वाटला होता! पण त्यामुळेच माझ्या सर्विस-लाइफ मधे बदलीनंतर विविध कार्यस्थळी मी जॉईन झालो त्या सर्वच तारखा विस्मरणात गेलेल्या असल्या तरी सोलापूर ब्रॅंचमधली ही तारीख मात्र या अपवादात्मक योगायोगामुळे जशी माझ्या कायमची लक्षात राहिलेली आहे तसेच ती 

ब्रँचसुद्धा तिथे घडलेल्या माझी कसोटी पहाणाऱ्या एका प्रसंगामुळे आणि मी त्या कसोटीला उतरल्याची प्रचिती देणाऱ्या नंतर अल्पकाळातच आलेल्या एका अकल्पित, अतर्क्य अशा गूढ अनुभवामुळे माझ्या कायमची लक्षात राहिलेली आहे! त्या अनुभवाने मला स्पर्शून गेलेल्या, चित्तवृत्ती प्रफुल्लित करणाऱ्या आनंदाचे माझ्या मन:पटलावर कोरले गेलेले अमीट ठसे आज पस्तीस वर्षांनंतरही मी आवर्जून जपून ठेवलेत!

‘सोलापूर कॅम्प’ ही पोस्टल कॉलनी, कृषीनगर, विकासनगर या रेसिडेन्शियल एरियापासून हाकेच्या अंतरावर असणारी आमची ब्रॅंच. माझं वास्तव्य कृषीनगरमधे होतं.

 माधवनगरहून सांगलीला फॅमिली शिफ्ट करून शक्यतो सलिलचं माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत तरी बदली होईल तिथे जमेल तितके दिवस मी एकट्यानेच जायचं असं, तातडीनं निर्णय घेणे आवश्यक होतं म्हणून, आम्ही ठरवलं ते सर्वांच्याच दृष्टीने सोयीचं होतं. त्यावेळी आई भावाकडे सातारला होती. रुटीन बसेपर्यंत सोबत म्हणून आमच्या सांगलीच्या बि-हाडी ती येऊन राहिल्यामुळे मला तिकडची काळजी नव्हती. कृषीनगरपासून ब्रॅंच फार तर चालत पाच मिनिटांच्या अंतरावर. रहिवासी क्षेत्रातल्या नागरिकांच्या सोयीसाठी ब्रॅंच सकाळी ८. ३० ते १२. ३० आणि दुपारी ३ ते ६ अशी दोन शिफ्टमधे कार्यरत असे. त्या भागात व्यावसायिक आणि व्यापारी वर्गाचे प्रमाण जवळपास नसल्यासारखेच. त्यामुळे ठेवी-संकलन आणि कर्ज वितरण या दोन्ही आघाड्यांवर यश मिळवणं हे ब्रॅंच-मॅनेजर म्हणून खूप अवघड आणि आव्हानात्मकच होतं. मी चार्ज घेतल्यानंतरचे चार-सहा दिवस ही पार्श्वभूमी अंगवळणी पडण्यातच गेले. स्टाफ तसा पुरेसा होता आणि चांगलाही. जवळजवळ सगळेचजण अनुभवी होते. अपवाद फक्त रिसिव्हिंग कॅशिअर म्हणून काम करणाऱ्या सुजाता बोबडेचा!

सुजाता बोबडे तशी नवीन होती. तिचा सहा महिन्यांचा प्रोबेशन पिरियड नुकताच संपलेला होता. त्यामुळे ती बँकरुटीनमधे अद्याप रुळलेली नव्हती. तरीही या अल्पकाळात अपेक्षित असणारी कार्यकुशलताही ती दाखवू शकत नव्हती. कसलंतरी दडपण असल्यासारखी सतत गप्प गप्प असायची. हेडकॅशिअर श्री. सुहास गर्दे स्वतःकडचं वर्कलोड सांभाळून तिला हातभार लावायचे म्हणून तिचं रुटीन बऱ्यापैकी व्यवस्थित सुरू असे एवढंच. त्यामुळेच सुजाताच्या वर्क-परफॉर्मन्सबद्दल मी फारसा समाधानी नव्हतो. अर्थात अशा कुठल्याच व्यक्तीबद्दलचे पूर्वग्रह मी जाणीवपूर्वक नेहमी तपासून पहात असल्यामुळे माझ्याकडून तोवर कोणतीच कडवट प्रतिक्रिया व्यक्त होणार नाही याची मला काळजी घेणे आवश्यक होते.

त्यानंतर हळूहळू मला मिळत गेलेली सुजाताबद्दलची माहिती मात्र तिच्याबद्दलचे माझे पूर्वग्रह थोडे सौम्य व्हावेत अशीच होती!

रिझर्व्हड कॅटेगरीतून निवड होऊन साधारण वर्षांपूर्वी ती या ब्रॅंचला जॉईन झाली होती. त्याआधीच तिचं नात्यातल्याच एका मुलाशी परस्पर लग्नही ठरलं होतं. मुलगा एम. बी. बी. एस करत होता. त्याचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत लग्न करून घ्यायला त्याच्या घरचे तयार नव्हते आणि तोवर वाट पहायला तिच्या घरचे. यातून काहीच मध्यममार्ग निघत नाहीय हे लक्षात येताच खूप दिवस वाट पाहिल्यानंतर या दोघांनी घरच्या विरोधाला न जुमानता नुकतंच परस्पर रजिस्टर लग्न करून टाकलं आणि दोन्ही घरच्यांनी या लग्नाला ठाम विरोध केला. प्रतिष्ठेचा प्रश्न बनवून दोघांनाही बेदखल केलं. त्यामुळे सुजाता नेहमीच दडपणाखाली असायची. तिने नवऱ्याच्या शिक्षणाची आणि घरखर्चाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेऊन वेगळं बि-हाड केलं. नवऱ्याचं शिक्षण आणि हिची नोकरी अशी तारेवरची कसरत सुरू झाली. मी जॉईन झालो त्याच दिवशी तिचा मॅटर्निटी लिव्हचा अर्ज माझ्या टेबलवर होता! 

हीच सुजाता बोबडे मला लवकरच येणाऱ्या त्या अतर्क्य अशा गूढ अनुभवाला निमित्त ठरणार होती याची त्या क्षणी मला कल्पना कुठून असायला?

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments