श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

२ ) विविधा — ( लेख श्री. पंडित पाठवणार आहेत. )

“ तो आणि मी.. “ – भाग ३८ लेखक : अरविंद लिमये

तो आणि मी

 ——-(अरविंद लिमये, सांगली)

 (क्रमश:-दर गुरुवारी)

 भाग-३८

 ————————–

(पूर्वसूत्र- तो प्रसंग लिलाताईच्या दत्तगुरुंवरील श्रध्देची कसोटी पहाणारा ठरला होता आणि माझ्या बाबांकडून तिच्या विचारांना अकल्पित मिळालेल्या योग्य दिशेमुळे ती त्या कसोटीला उतरलीही!

तो दिवस आणि ती घटना दोन्हीही माझ्या मनातील लिलाताईच्या संदर्भातील आठवणींचा अविभाज्य भाग बनून गेलेले आहेत!)

आदल्या दिवशीच्या रात्री घडलेली ती घटना! त्या कॉलनीतली आमची घरं म्हणजे मधे भिंत असलेली दोन जोडघरेच होती.

त्या रात्री निजानीज होऊन बराच वेळ झाल्यानंतर अचानक मी पलिकडून येणाऱ्या जोरजोरात बोलण्याच्या आवाजाने दचकून जागा झालो. पाहिलं तर आई-बाबाही उठून बसलेले. हलक्या आवाजात एकमेकाशी कांहीतरी बोलत होते. इतर भावंडेही झोप चाळवल्याने माझ्या आधीच जागी झाली होती. रडत, मोठ्या आवाजात बोलण्याचा पलीकडून येणारा तो आवाज लिलाताईचा होता! ती तिच्या वडलांना दुखावलेल्या, चिडलेल्या आवाजात ताडताड बोलत होती. बाकी सर्वजण गप्प राहून ऐकत असणार कारण बाकी कुणाचाच आवाज येत नव्हता.

बाबांनी दटावून आम्हाला झोपण्यास सांगितले. ते दोघे मात्र नंतर बराच वेळ जागे असणार नक्कीच.

सकाळी उठलो तसं मी हे सगळं विसरूनही गेलो होतो. पण ते तात्पुरतंच. कारण बाबांनी पादुकांची पूजा आवरली तसं नेहमीप्रमाणे तीर्थप्रसाद घेण्यासाठी बाहेर आलेल्या

लीलाताईने हात पुढे केला तेव्हा तिला प्रसाद न देताच बाबा आत निघून आले आणि त्यामुळे दुखावलेली लिलाताई रात्री घडलेल्या प्रसंगाची पुन्हा आठवण करुन द्यायला आल्यासारखी बाबांच्या पाठोपाठ खाली मान घालून आमच्या घरात आली!

“काका, कां हो असं? आज मला तीर्थ न् प्रसाद कां बरं नाही दिलात?.. ”

” का नसेल दिला?” बाबांनी तिच्याकडे रोखून पहात तिलाच विचारलं. मान खाली घालून तिथेच अभ्यास करीत बसलेल्या मी दचकून बाबांकडे पाहिलं.

“कां? कांही चुकलं का माझं?” तिने विचारलं.

“ते मीच सांगायला हवं कां? सांगतो. ही आत चहा टाकतेय. तूही घे घोटभर. जा. मी आलोच. ”

ती कांही न बोलता खालमानेनं आमच्या

स्वयंपाकघरांत गेली. आई चुलीवर चहाचं आधण ठेवत होती. लिलाताईला पहाताच आईने तिला भिंतीजवळचा पाट घ्यायला सांगितलं. “बैस” म्हणाली. तोवर बाबाही आत आले.

“चहा घे आणि बाहेर जाऊन पादुकांना रोजच्यासारखा एकाग्रतेने मनापासून नमस्कार करून ये. मघाशी तू स्वस्थचित्त नसावीस बहुतेक. त्यामुळेच असेल, आरती होताच तू

नेहमीसारखा देवाला नमस्कार न करताच तीर्थ घ्यायला हात पुढं केला होतास. आठवतंय?म्हणून तुला तीर्थ दिलं नव्हतं. ” बाबा शांतपणे म्हणाले.

तिचे डोळे भरून आले.

“गप. रडू नको. डोळे पूस बरं. ” आई म्हणाली.

“तुम्हा दोघांनाही माझंच चुकलंय असंच वाटतंय माहितीय मला. ” ती नाराजीने म्हणाली.

“तसं नाहीये” बाबा म्हणाले. “आपण चूक की बरोबर हे ज्याचं त्यानंच ठरवायचं असतं. तुझं काही चुकलंय कां हे आम्ही कोण ठरवणार? तो निवाडा काल रात्री तू स्वत:च तर करुन टाकलायस आणि तुझ्या दृष्टीने जो चूक, त्याला त्याची पूरेपूर शिक्षाही देऊन टाकलीयस. ”

“म्हणजे माझ्या बाबांना. असंच ना? मी त्यांना जे बोलले त्यातला एक शब्द तरी खोटा होता कां सांगा ना ” ती कळवळून म्हणाली.

“खोटं काहीच नसतं. पण संपूर्ण खरंही काहीच नसतं. आणि खरं असेल तेही कसं बोलावं किंवा बोलावं की नाही हे ज्याचं त्यानं ठरवायचं. तू जे आणि जसं बोललीस त्यात तुझं काही चुकलं नाही असं तुला वाटत असेल तर तू अस्वस्थ कां आहेस याचा विचार कर. तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझं तुलाच मिळेल. ”

“हो. बाबांना काल बोलले मी खूप. काय चुकलं माझं?मला खूप रागच नव्हता आला त्यांचा तर दुखावलेही गेले होते मी. अजूनही शांत नाहीये मन माझं. मीच सगळं कां सहन करायचं सांगा ना?” आवाज भरून आला तसं ती थांबली. घुसमटत रडत राहिली.

“तू शांत हो बरं आधी. असा त्रागा करुन तुलाच त्रास होईल ना बाळा?” आई म्हणाली.

“तुम्ही आज ओळखता कां काकू मला? तुम्हाला इथं

येऊन चार वर्षं होऊन गेलीयत. इतक्या वर्षात मला एकदा तरी असा इतका त्रागा केलेलं पाहिलंयत कां तुम्ही सांगा बघू…. ” ती बोलू लागली. जखमेला धक्का लागताच ती भळभळून वहात रहावी तसं बोलत राहिली. तिचा प्रत्येक शब्द ऐकणाऱ्यालाही अस्वस्थ करणारा होता. आईचे डोळेही भरुन आले होते तसे बाबाही चलबिचल झाले.

तिची कशाचबद्दल कधीच कांही तक्रार नसायची. जे तिनंच करायला हवं ते कुणी न सांगता तोवर निमूटपणे करतच तर आलेली होती. तिची आई, वडील, सगळी भावंडं ही सगळी आपलीच तर आहेत हीच तिची भावना असायची. आजपर्यंत तिने घरबसल्या स्वकष्टाने मिळवलेल्या पैशातली एक दमडीही कधी स्वत:साठी खर्च केलेली नव्हती. जे केलं ते सर्वांसाठीच तर केलं होतं. स्वत:चं कर्तव्य तोंडातून चकार शब्द न काढता जर ती पार पाडत आली होती तर तिच्या बाबतीतलं त्यांचं कर्तव्यही बाबांनीही कां नाही पार पाडायचं हा तिचा प्रश्न होता! काल रात्री हेच ती आपल्या वडलांना पुन:पुन्हा विचारत राहिली होती. खरं तर असा विचार तोपर्यंत तिच्या मनात खरंच कधीच डोकावलाही नव्हता,… पण काल… ?

काल तिच्या पाठच्या बहिणीसाठी, बेबीताईसाठी सांगून आलेल्या स्थळाला होकार कळवून तिचे बाबा मोकळे झाले होते त्यामुळे ही दुखावली गेली आणि आज तेच सगळं आठवून तिचे डोळे पाझरत राहिले होते..

“माझ्यापेक्षा फक्त दोन वर्षानं लहान असलेली माझी बहीण आहे ती. तिचं कांही चांगलं होत असेल तर मी कां वाईट वाटून घेऊ सांगा ना?फक्त बहिणीच नाही तर दोन मैत्रिणींसारख्याच आम्ही लहानाच्या मोठ्या झालोयत. तिचं लग्न होतंय, ती मार्गाला लागतेय याचा आनंदच आहे मला. त्यासाठी चिडेन कां मी? पण हा निर्णय घेताना माझ्या वडलांनी मला गृहीत कां धरायचं? मला विश्वासात घेऊन त्यांनी आधी हे कां नाही सांगायचं? खूप शिकायचं, खूप मोठ्ठं व्हायचं असं स्वप्न होतं हो माझं. पण दोघांचे फॉर्म भरायला पुरेशा पैशाची सोय झाली नाही म्हणून एकाचाच फॉर्म भरायची वेळ आली तेव्हाही मला असंच गृहितच तर धरलं होतं त्यांनी. तेव्हाही प्राधान्य कुणाला दिलं तर आण्णाला. तो हुशार नव्हता, पुढं फारसा शिकणार नव्हता तरीही प्राधान्य त्याला. कां तर तो मुलगा म्हणून. म्हणजे मी… मी मुलगी आहे हाच माझा गुन्हा होता कां?तसं असेल तर मी हुशार असून उपयोग काय त्याचा? तेव्हाही आतल्या आत सगळं गिळून तोंडातून ‘ब्र’ही न काढता मी गप्प बसलेच होते ना हो?असंच कां आणि किती दिवस गप्प बसायचं ?

मला संताप अनावर झाला त्याला हे निमित्त झालं फक्त. पण मला राग यायचं कारण वेगळंच आहे. या स्थळाकडून विचारणा आल्यापासून मला विश्वासात घेऊन एका शब्दानेही कांही सांगावं, विचारावं असं त्यांना वाटलंच नाहीय याचा राग आलाय मला. ‘हिला काय विचारायचं? हिला काय सांगायचं? ही थोडीच नाही, नको म्हणणाराय?’ असं त्यांनी गृहितच धरलं याचा राग आला मला. मीही माणूसच आहे ना हो काका? मलाही मन आहे, भावना आहेत हे जन्मदात्या वडलांनी तरी समजून घ्यायला नको कां? हे सगळं स्वतःच स्वत:च्या तोंडानं ठणकावून सांगताना कालही आनंद नव्हताच झाला हो मला. पण न बोलता होणारी घुसमटही सहन होत नव्हती… “

आवाज भरून आला तशी ती बोलायची थांबली.

अस्वस्थपणे येरझारा घालणाऱ्या बाबांनी चमकून तिच्याकडे पाहिलं.

“हे बघ, तू हुशार आहेस. मनानं चांगली आहेस. मी सांगेन ते समजून घेशील असं वाटतंय म्हणून सांगणाराय. ऐकशील?” ते म्हणाले.

तिने डोळे पुसत होकारार्थी मान हलवली.

“हे बघ. आता या सगळ्याचा तू त्यांच्या दृष्टीकोनातून विचार करुन बघ. बेबीसाठी जे स्थळ आलंय ते बिजवराचं आहे. पहिली तीन वर्षांची एक मुलगी आहे त्याला. तो शिकलेला, सुखवस्तू आहे, तरीही कमी शिकलेली मुलगी स्वीकारायला तो तयार होता कारण पहिल्या मुलीचं सगळं प्रेमानं करणारी मुलगी त्याला हवी होती. याबाबतीत काय निर्णय घ्यावा याचं दडपण आपल्या वडलांच्या मनावर असणाराय याचा विचार स्वतःबद्दलच्या एकांगी विचारांच्या गर्दीत तुझ्या मनात डोकावला होता कां? नव्हता. हो ना? खरंतर तुझ्या आधाराची खरी गरज त्या क्षणी त्यांना होती. इतकी वर्षं मी पहातोय एकही दिवस तो माणूस स्वतःसाठी जगलेला नाहीय. राबतोय, कष्ट करतोय, दिवसभर आणि रात्रपाळ्या असताना आठ आठ तास रात्रीही मशीनसमोर उभं राहून दमून भागून घरी आल्यानंतर समोर येईल तेवढा घोटभर चहा आणि शिळंपाकंही गोड मानून तो राबतोय. तरीही राग, संताप, त्रागा, आरडाओरडा यांचा लवलेश तरी आहे कां त्याच्यात? त्या माणसाची स्वत:च्या मुलीनेच केलेली निर्भत्सना निमूट ऐकून घेऊनही शांत रहाताना त्याच्या मनाची आतल्याआत किती घालमेल झाली असेल याचा विचार कर आणि मग मला सांग. शांतपणे विचार करुन सांग. कारणं कांहीही असोत पण आज तो हतबल आहे हे तुझ्यासारख्या समंजस मुलीने समजून घ्यायचं नाही तर कुणी? आणि लग्नाचं काय गं ?तू काय किंवा बेबी काय तुमची लग्नं ठरवायचा निर्णय घेणारे तुझे वडील कोण? ते तर निमित्त आहेत फक्त. या गाठी बांधणारा ‘तो’ त्या तिथे बाहेर औदुंबराखाली बसलाय हे विसरु नकोस. जा. ऊठ. त्याला नेहमीसारखा मनापासून नमस्कार कर फक्त. कांहीही मागू नकोस. जे त्याला द्यावंसं वाटेल ते तो न मागता देत असतो हे लक्षात ठेव. जा. नमस्कार करुन ये आणि मघाशी राहिलेला तीर्थ न् प्रसाद घेऊन जा” बाबा म्हणाले.

त्यांच्याकडून तीर्थ घेण्यासाठी तिने हात पुढे केला तेव्हाही तिचे डोळे पाझरतंच होते.

“शांत हो. काळजी नको करू. सगळं व्यवस्थित होईल. बेबीचं तर होईलच तसंच तुझंही होईल. येत्या चार दिवसात तुला दत्त महाराजांनी ठरवलेल्या स्थळाकडूनच मागणी येईल. बघशील तू “

बाबा गंमतीने हसत म्हणाले. काहीच न समजल्यासारखी ती त्यांच्याकडे पहातच राहिली…!

हा सगळाच प्रसंग माझ्या कायमचा लक्षात राहिलाय ते बाबांना लाभलेल्या वाचासिद्धीची यावेळीही पुन्हा एकदा प्रचिती आली म्हणूनच नव्हे फक्त तर या सगळ्या प्रसंगाचे धागेदोरे माझ्याशीही जोडले जाणार आहेत हे यथावकाश माझ्या अनुभवाला आल्यामुळेच!!

 क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments