श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- “शांत हो. काळजी नको करू. सगळं व्यवस्थित होईल. बेबीचं तर होईलच तसं तुझंही होईल. येत्या चार दिवसात तुला दत्तमहाराजांनी ठरवलेल्या स्थळाकडूनच मागणी येईल. बघशील तू”

 बाबा गंमतीने हसत म्हणाले. कांहीच न समजल्यासारखी ती त्यांच्याकडे पहातच राहिली. )

 आज जवळजवळ पन्नास वर्षांनंतर हे सगळे प्रसंग नव्याने आठवताना त्या आठवणींमधला एकही धागा विसविशीत झालेला किंवा तुटलेला नसतो ते त्या अनुभवांच्या त्या त्या वेळी माझ्या अंतर्मनाला जाणवलेल्या अलौकिक अनुभूतीमुळे! आणि या अनुभूतीमधला मुख्य दुवा ठरली होती ती हीच लिलाताई!

 लिलाताई माझ्यापेक्षा जवळजवळ बारा वर्षांनी मोठी. अर्थातच माझ्या सर्वात मोठ्या बहिणीपेक्षाही सहा वर्षांनी मोठी. केवळ वयातलं अंतर म्हणूनच ती माझी ताई नव्हती तर तिने आपल्या सख्ख्या दहा भावंडांइतकंच आमच्यावरही मोठ्या बहिणीसारखंच प्रेम केलं होतं! मी तर तिचा तिच्या लहान भावंडांपेक्षाही कणभर जास्तच लाडका होतो. आम्ही त्यांच्या शेजारी रहायला गेलो तेव्हा मी चौथीतून पाचवीत गेलो होतो. त्याआधी मला अभ्यासात कांही शंका आली तर आईला किंवा मोठ्या बहिणीला विचारायचो. आता त्याकरता लिलाताई माझा पहिला चाॅईस असायची. तिचं शांतपणे मला समजेल असं समजावून सांगणं मला आवडायचं. माझी पुढची चारपाच वर्षे शाळेतल्या सगळ्या बौध्दिक स्पर्धांची तयारीसुध्दा तीच करुन घ्यायची चित्रकला, वक्तृत्व, कथाकथन, गद्यपाठांतर, गीतापठण, निबंधलेखन, हस्ताक्षर अशा सगळ्या स्पर्धांची तिने करुन घेतलेली तयारी म्हणजे खणखणीत नाणंच. अशा सगळ्या स्पर्धांत मला बक्षिसं मिळायची, कौतुक व्हायचं तेव्हा मिळालेलं बक्षिस, प्रमाणपत्र हातात घट्ट धरुन मी पळत घरी यायचो ते थेट शेजारी लिलाताईकडेच धाव घ्यायचो. तिला मनापासून झालेला आनंद, तिच्या नजरेतलं कौतुक आणि मला जवळ घेऊन तिने दिलेली शाबासकी हेच माझ्यासाठी शाळेत मिळालेल्या बक्षिसापेक्षाही खूप मोठं बक्षिस असायचं! तिच्यासोबतचे माझे हे भावबंध गतजन्मीचे ऋणानुबंधच म्हणायला हवेत. विशेषकरुन मला तसे वाटतात ते नंतर आलेल्या ‘अलौकिक’ अनुभवामुळेच!!

 बाबांनी सांगितल्याप्रमाणे ती बाहेर जाऊन दत्ताला नमस्कार करुन आली, बाबांनी दिलेला तीर्थप्रसाद घेतला. बाबांना नमस्कार करून झरकन् वळली आणि डोळे पुसत खालमानेनं घरी निघून गेली.

 “किती गुणी मुलगी आहे ना हो ही? दुखावली गेलीय बिचारी. तिच्या डोळ्यांत पाणी बघून बरं नाही वाटत. “

 ” ते दु:खाचे नाहीत, पश्चातापाचे अश्रू आहेत. देव पहातोय सगळं. तो तिची काळजी नक्की घेईल. बघच तू. “

 बाबांच्या तोंडून सहजपणे बाहेर पडलेल्या या सरळसाध्या शब्दांमधे लपलेलं गूढ त्यांनाही त्याक्षणी जाणवलेलं होतं की नाही कुणास ठाऊक पण त्याची आश्चर्यकारकपणे उकल झाली ती पुढे चारच दिवसांनी कुरुंदवाडच्या बिडकर जमीनदारांच्या घराण्यातून लिलाताईसाठी मागणी आली तेव्हा!!

 हे सर्वांसाठीच अनपेक्षितच नाही तर सुखद आश्चर्यकारकही होतं!

 लिलाताईच्या आनंदाला तर पारावार नव्हता. “शांत हो. काळजी नको करू. सगळं व्यवस्थित होईल. बेबीचं तर होईलच, तसंच तुझंही होईल. येत्या चार दिवसात तुला दत्त महाराजांनी ठरवलेल्या स्थळाकडूनच मागणी येईल. बघशील तू. ” बाबांच्या अगदी अंतःकरणापासून व्यक्त झालेल्या या बोलण्यातला शब्द न् शब्द असा खरा झाला होता! कारण तिला मागणी आली होती ती कुरुंदवाडच्या जमीनदार घराण्याकडून!!

 “काका, मी लग्न होऊन सासरी गेले तरी आता नित्य दत्तदर्शन चुकवायची नाही. कारण कुरुंदवाडहून नृसिंहवाडी म्हणजे फक्त एक मैल दूर. हो की नै?” तिने बाबांना त्याच आनंदाच्या भरात विचारले होते.

 “तुझी मनापासून इच्छा आहे ना? झालं तर मग. तुझ्या मनासारखं होईल. पण त्यासाठी अट्टाहास नको करू. तू सासरी जातेयस. आधी त्या घरची एक हो. तुझं कर्तव्य चुकवू नको. बाकी सगळं दत्त महाराजांवर सोपवून निश्चिंत रहा. “

 बाबांनी तिला समजावलं होतं.

 पाटील आणि बिडकर या दोन्ही कुटुंबांची कोणत्याच बाबतीत बरोबरी होऊ शकत नव्हती. पाटील कुटुंब कसंबसं गुजराण करणारं. बिडकर जमीनदार घराणं. सख्खं-चुलत असं वीस बावीस जणांचं

एकत्र कुटुंब. उदंड धनधान्य. दुभती जनावरं त्यामुळं दूधदुभतं भरपूर. ददात कशाचीच नव्हती. रोज दिवसभर डोक्यावर पदर घेऊन वावरणं मात्र लिलाताईला एक दिव्य वाटायचं. इकडच्या मोकळ्या वातावरणामुळे या कशाची तिला सवयच नव्हती. पण सासरची माणसं सगळी चांगली होती. हिच्या डोक्यावरचा पदर पहिल्या दिवशी सारखा सारखा घसरत राहिला तेव्हा सगळ्या सासवा एकमेकींकडे पाहून गंमतीने हसायच्या. तिला सांभाळून घ्यायच्या. ‘सवयीने जमेल हळूहळू’ म्हणायच्या. दारापुढं हिने काढलेल्या रांगोळ्या बघून बायकाच नव्हे तर घरातले कर्ते पुरुषही तिचं मनापासून कौतुक करायचे. मूळच्याच शांत, हसतमुख, कलासक्त, कामसू, सुस्वभावी लिलाताई त्या आपुलकीच्या वातावरणामुळे अल्पकाळातच त्या घरचीच एक कधी होऊन गेली तिचं तिलाच समजलं नाही.

 “घरचं सगळं आवरून मी नृसिंहवाडीला रोज दर्शनाला जाऊन आले तर चालेल?”

 एक दिवस तिने नवऱ्याला विचारलं. त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं.

 “एकटीच?”

 “हो. त्यात काय?”

 “घरी नाही आवडायचं. “

 “कुणाला?”

 “कुणालाच. मोठे काका नकोच म्हणणार. ते म्हणतील तीच पूर्व दिशा असते. “

 “मी विचारु त्यांना?”

 “तू? भलतंच काय?”

 “मग मोठ्या काकींना विचारते हवंतर. त्या परवानगी काढतील. चालेल?”

 तिच्या निरागस प्रश्नाचं त्याला हसूच आलं होतं.

 “नको. मी बोलतो. विचारतो काकांना. ते हो म्हणाले तरच जायचं”

 “बरं” तिने नाईलाजाने होकारार्थी मान हलवली. काका काय म्हणतील या विचाराने रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता.

 “देवदर्शनालाच जातेय तर जाऊ दे तिला. पण एकटीने नाही जायचं. तू तिच्या सोबतीला जात जा. त्यानिमित्ताने तुझंही देवदर्शन होऊ दे. ” काका म्हणाले. घरच्या इतर बायका़ंसाठी हे आक्रीतच घडलं होतं. ज्या घरच्या बायका आजपर्यंत नवऱ्याबरोबर कधी फिरायला म्हणून घराबाहेर पडल्या नव्हत्या त्याच घरची ही मोठी सून रीतसर परवानगी घेऊन रोज देवदर्शनासाठी कां असेना नवऱ्याबरोबर फिरून येणार होती याचं त्या सगळ्यांजणींना अप्रूपच वाटत राहिलं होतं!

 दुसऱ्याच दिवसापासून लिलाताईचं नित्य दत्तदर्शन सुरु झालं. पहाटे उठून आंघोळी आवरून झपाझप चालत दोघेही नृसिंहवाडीची वाट धरायचे. दर्शन घेऊन अर्ध्यापाऊण तासात परतही यायचे.

 लिलाताईच्या या नित्यनेमानेच तिला आमच्याशीही जोडून ठेवलं होते. कारण मोबाईल नसलेल्या पूर्वीच्या त्या काळात पाटील कुटुंबीयांपैकी बाकी कोणाशीच भेटीगाठी, संपर्क राहिला नव्हता. पण लिलाताई मात्र आम्हाला अधून मधून भेटायची ती तिच्या या नित्यनेमामुळेच. आईचाही पौर्णिमेला वाडीला जायचा नेम असल्याने दर पौर्णिमेला न ठरवताही लिलाताईची न् तिची भेट व्हायचीच. लिलाताई रोज तिथे आली की ‘अवधूत मिठाई भांडार’ मधेच चप्पल काढून ठेवून दर्शनाला जायची. पौर्णिमेदिवशी “लिमयेवहिनी आल्यात का हो?” अशी त्यांच्याकडे चौकशी ठरलेलीच. त्यांच्यामार्फत निरोपानिरोपी तर नेहमीचीच. कधी आईला सवड असेल तेव्हा आग्रहाने कुरुंदवाडला आपल्या सासरघरी घेऊन जायची. पुढे माझा नित्यनेम सुरु झाल्यावर आम्हीही संपर्कात राहू लागलो.

 हे सगळे घटनाप्रसंग १९५९ पासून नंतर लिलाताई १९६४ साली लग्न होऊन कुरुंदवाडला गेली त्या दरम्यानच्या काळातले. पण तिचा तोच नित्यनेम पुढे प्रदीर्घकाळ उलटून गेल्यानंतर माझ्या संसारात अचानक निर्माण झालेल्या दु:खाच्या झंझावातात मला सावरुन माझ्या दु:खावर हळूवार फुंकर घालणाराय याची पुसटशी कल्पनाही मला तेव्हा नव्हती.

 प्रत्येकाच्याच आयुष्यात घडणाऱ्या वरवर सहजसाध्या वाटणाऱ्या घटनांचे धागेदोरे ‘त्या’नेच परस्परांशी कसे जाणीवपूर्वक जोडून ठेवलेले असतात याचा प्रत्यय मात्र त्यानिमित्ताने मला येणार होता!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments