श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ४६ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- “तुझ्या आईकडून समीर गेल्याचं मला समजलं त्या क्षणापासून खूप अस्वस्थ होते रे मी. तू हे सगळं कसं सहन करत असशील याच विचाराने व्याकूळ होते. घरी येताच सुचतील तसे चार शब्द लिहून पत्र पोस्टात टाकलं तेव्हा कुठे थोडी शांत झाले होते. खरं सांगू? मी काय लिहिलं होतं ते विसरूनही गेले होते. आज तू मनातलं सगळं बोललास तेव्हा ते मला नव्याने समजलं. समीरचा आजार पृथ्वीवरच्या औषधाने बरा होण्याच्या पलिकडे गेलेला आहे हे मला शप्पथ सांगते, खरंच माहित नव्हतं. ते सगळं
दत्तगुरुंनीच माझ्याकडून लिहून घेतलं हे आज माझ्या लक्षात आलंय. त्यांना दिलासा द्यायचा होता तुला आणि त्यासाठी मध्यस्थ म्हणून मी त्यांना योग्य वाटले हे लक्षात आलं आणि मी भरून पावले. हा दत्तगुरुंचाच सांगावा आहे असं समज आणि निश्चिंत रहा… !” लिलाताई म्हणाली. )
तिचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो ते मनात भरुन राहिलेलं समाधान सोबत घेऊनच. समाधानाबरोबरच क्षणकाळापुरती कां होईना पण मनात निर्माण झालेली कांहीतरी राहून गेल्याची भावनासुद्धा होतीच. कारण लिलाताईने बोलून दाखवले होते ते तिच्याच मनातले विचार. पण नेमकं तसंच घडलं असेल? दत्त महाराजांनी खरंच ते त्या शब्दांत लिहायची प्रेरणा तिच्याही नकळत तिला दिली असेल? मनात अशी शंका घेणं मला योग्य वाटेना पण त्याचं समाधानकारक उत्तरही मला सापडेना. तिचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो तेव्हा मनाला स्पर्शून गेलेल्या समाधानामुळे मन थोडं शांत होतं खरं पण या सगळ्या
अघटितामागचं गूढ मात्र उकललेलं नव्हतंच. माझ्या मनातल्या दत्तमूर्तीच्या चेहऱ्यावरील स्मितहास्यात लपून ते गूढ अधिकच गहिरं होत चाललेलं होतं.. !
मी घरी आलो. रुटीन हळूहळू सुरू झालं. आरती पूर्णपणे सावरली नसली तरी तिने आता मात्र लवकरात लवकर सावरायला हवं, तिने नव्याने सुरुवात करायला हवी असं मला मनापासून वाटतं होतं. तिच्या स्वास्थ्यासाठी ते गरजेचं होतं. ती तेव्हा आमच्या लग्नानंतर लगेचच मिळालेला युनियन बँकेतला जॉबच करीत असे. सुदैवाने कोल्हापूरमधे तेव्हा आमच्या बॅंकेच्या दोन ब्रॅंचेस असल्याने तिचं पोस्टिंग दुसऱ्या ब्रॅंचमधे सहजपणे होऊ शकले होते. तिची खरंतर शिक्षणक्षेत्रात काम करायची इच्छा होती. म्हणून तिला ही नोकरी अचानक मिळाली तेव्हा ती फारशी आवडलेली नव्हती. आता मात्र एकटेपणातून आणि पुत्रवियोगाच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी ही नोकरीच तिला मदतीची ठरणार होती. समीर गेल्यानंतर पुढे जवळजवळ एक महिना बिनपगारी रजा घेऊनही ती स्वस्थ नव्हतीच. म्हणूनच असं एकटेपणात रुतून बसणं हा आपल्या दुःखावरचा उतारा नाहीये हे तिलाही हळूहळू जाणवू लागलेलं होतं.
“चार दिवस का होईना जॉईन हो. तुझ्या प्रदीर्घ रजेमुळे स्टाफ शॉर्टेजचा त्रास ब्रॅंचमधील सगळ्यांनाच सहन करायला लागतोय. आपली गरज होती तेव्हा तेच सगळे मदतीसाठी धावून आलेले होते ना? मग निदान आता तरी त्यांचा त्रास वाढू नये याचा विचार आपण करायला हवा की नको? तुझं मन तिथं नाही रमलं तर एक महिन्याची नोटीस देऊन जॉब रिझाईन करायचं स्वातंत्र्य तुला आहेच. पण यापुढे असं अधांतरी नको राहूस. ” मी माझ्या परीने तिला वेळोवेळी हे सगळं समजावत रहायचो. अखेर तिने प्रयत्न करून पहायचं ठरवलं आणि एकटेपणाच्या खाईतून ती हळूहळू माणसात आली. वेगळं वातावरण, नवे विषय, नवी व्यवधानं यामुळे आपसूक ती नकळत सावरू लागली. तरीही मला बँकेतून घरी यायला तिच्यापेक्षा खूप उशीर व्हायचा. संध्याकाळी ती एकटी घरी आल्यानंतर बंद दाराआड समीरच्या व्याकूळ करणाऱ्या आठवणी तिच्या स्वागताला हजर असायच्याच.. ! त्या तशा रहाणारच होत्या. त्यांनी निघून जावं असं मलाही वाटत नव्हतं. पण त्या आठवणींमधे हिने रुतून बसू नये यासाठी माझे प्रयत्न असायचे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर एक दिवस नवीन बाळाची चाहूल लागली! त्या जाणिवेच्या स्पर्शाने तिचे डोळे पाणावले. पण ते दुःखाचे नव्हे तर आनंदाचे अश्रू होते! समीर नक्की परत येणार आहे ही खूणगांठ माझ्या मनात पक्की होती पण आरतीला मात्र अजून मनापासून ते सगळं स्वीकारता येत नव्हतं.
यथावकाश या खेपेलाही तिच्या काळजीपोटी तिचे आई-बाबा बाळंतपणासाठी तिला आपल्या घरी सांगलीला घेऊन गेले. इकडे मी, माझी आई आणि माझा लहान भाऊ. तिकडचाच विचार आम्हा सर्वांच्या मनात सतत ठाण मांडून असायचा. समीरच्या स्वागतासाठी मी मनोमन अतिशय उत्सुक होतो पण ते उघडपणे व्यक्त करता येत नव्हतं तर दुसरीकडे आईच्या मनात सगळं सुखरूप पार पडेल ना याचीच काळजी असे!
बँकेत कामाच्या व्यापात काही काळ माझं मन गुंतून रहायचं खरं पण ते तेवढ्यापुरतंच. सांगलीहून येणाऱ्या निरोपाची वाट पहाणारं माझं मन उत्सुक अस्वस्थतेमुळे सतत बेचैनच असायचं.
असंच एक दिवस मी कामात व्यग्र असताना कुणाची तरी चाहूल लागली म्हणून मी मान वर करुन पाहिलं तर समोर माझे सासरे उभे होते! मी क्षणभर पहातच राहिलो त्यांच्याकडे न् भानावर येताच ताडकन् उठून उभा राहिलो. ते काय सांगतायत हे ऐकण्यासाठी माझे कान आतूर झाले होते पण उत्सुक मन मात्र आतल्याआत थरथरत होतं…. !!
“तुम्ही असे अचानक?”
“हो. खूप आनंदाची बातमी घेऊन आलोय. मुलगा झालाय… “
“आरती कशी आहे? आणि बाळ… ?”
“तिनेच ‘समक्ष जाऊन सांगून या’ म्हणत मला लगोलग पाठवलंय. बाळ गोड आहे. तीन किलो वजन आहे बाळाचं. घरी आईंनाही सांगा लगेच. मला निघायला हवं… “
” नाही नाही.. असं कसं?” मी म्हणालो. “घरी नाही तरी निदान समोरच्या रेस्टाॅरंटमधे काॅफी तरी घेऊया” म्हणत मी ड्राॅवर बंद केला तसं त्यांनी मला थांबवलं.
“नाही… खरंच नको. तुम्ही कामात आहात, व्यत्यय नको. मी शाहुपूरीत माझ्या बहिणीकडे जाऊन हा निरोप सांगणाराय. तिथं खाणंपिणं होईलच. म्हणून नको ” त्यांनी मला समजावलं. जायला वळले आणि कांहीतरी आठवल्यासारखं थांबले. त्यांनी खिशात हात घालून कागदाची एक घडी बाहेर काढली आणि…
” हे तुमच्या बायकोने दिलंय तुमच्यासाठी.. ” ते हसत म्हणाले आणि ती घडी माझ्या हातात देऊन निघून गेले..
ती घडी उलगडून पाहिलं तर थरथरत्या हातानं लिहिलेली ती मोजक्या शब्दांची फक्त एक ओळ होती….
‘आपला.. समीर.. परत आलाय.. ‘
ते वाचलं आणि एक अनामिक अशी सुखसंवेदना माझ्या मनाला स्पर्शून गेली.. त्या स्पर्शाने मी शहारलो! कसाबसा खुर्चीत टेकलो. ओलसर नजरेने त्या अक्षरांवरून नजर फिरवीत त्या कागदाची अलगद घडी घातली आणि ती खिशात जपून ठेवली.. !
“आपल्याला पुन्हा मुलगा झाला तर आपला समीरच परत आलाय असंच तुम्ही म्हणणार…. पण मी.. ? तुम्हाला कसं सांगू? रात्री अंथरुणाला पाठ टेकली, अलगद डोळे मिटले कीं केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पहात दोन्ही हात पुढे पसरत झेपावत असतो हो तोss.. आहे माहित? त्याचे टपोरे डोळे’ गोरा रंग’, लांबसडक बोटं, दाट जावळ… सगळं मनात जपून ठेवलंय हो मीss. आपल्याला मुलगा झालाच तर तो आपला समीरच आहे कीं नाही हे फक्त मीच ठरवणार… बाकी कुणीही नाहीss…. ” कधीकाळी आरतीच्याच तोंडून बाहेर पडलेले हे शब्द आणि त्यानंतरचं तिचं खऱ्याखोट्याच्या सीमारेषेवरचं घुटमळणं मला आठवलं आणि पूर्णतः नास्तिक असणारी तीच आज मला ‘आपला समीर परत आलाय’ हे अतिशय आनंदाने, मनापासून सांगत होती !! यापेक्षा वेगळं मला तरी दुसरं काय हवं होतं?
ही अतिशय करूण आणि तितक्याच भयावह अशा अरिष्टाची अतिशय सूचक अशी सांगताच आहे असं मला त्याक्षणी वाटलं खरं पण ते तेवढंच नाहीये हे मात्र तेव्हा माहित नव्हतं. पुढे जवळजवळ १४-१५ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटल्यानंतर एक दिवस अतिशय अकल्पितपणे मला समजलं ते या सगळ्या अघटीतामधे लपलेलं गूढ उकलणारं एक रहस्य.. !!
तोवर ‘समीर परत आलाय’ ही भावना आमच्या निखळ समाधानासाठी आम्हाला पुरेशी होती. पण तो कसा परत आला.. सगळं कां आणि कसं घडलं याची उकल मात्र झालेली नाहीय हे माझ्या गावीच नव्हतं. १५ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटल्यानंतर अगदी अकल्पितपणे ती उकल झाली.. आणि.. मी त्यातला थरार अनुभवताना माझ्या मनातल्या ‘त्या’च्यापुढे मनोमन नतमस्तक झालो… !!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈